शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (16:49 IST)

कोरोना इफेक्ट: पाकिस्तानात पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त, भारतात का नाही?

प्रशांत चाहल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत म्हणून आपल्या देशातले इंधनाचे दर कमी करावेत अशी शिफारस पाकिस्तानच्या ऑईल अॅंड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटीने ऊर्जा मंत्रालयाने केली होती, असं वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
पाकिस्तानात 1 मे पासून नवीन दर लागू झाले आहेत. यात पेट्रोल 15 रुपये, हाई स्पीड डिझेल 27.15 रुपये, रॉकेल 30 रुपये आणि लाईट डिझेल ऑईल 15 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे.
म्हणजेच एक लीटर पेट्रोल पूर्वी 96 रुपयांना मिळायचं ते आता 81 रुपयांना मिळणार. तर हाई स्पीड डिझेलची किंमत पूर्वी 107 रुपये लीटर होती. ती आता 80 रुपये प्रती लीटर करण्यात आली आहे.

निर्णयावर दोन मतप्रवाह
पाकिस्तानी सोशल मीडियावर काही जण या निर्णयाचं स्वागत करत आहेत. काहींचं म्हणणं आहे, "कोव्हिड19 च्या संकटामुळे त्यांच्यावर जो अतिरिक्त आर्थिक दबाव येत होता तो इंधनाचे दर कमी केल्याने काही प्रमाणात कमी झाला आहे."
मात्र, आर्थिक विषयांचे काही जाणकार पाकिस्तानी सरकारचा हा निर्णय 'दुर्दैवी' असल्याचं म्हणत आहेत.
पाकिस्तानचे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. कैसर बंगाली म्हणतात, "तेलाच्या किमती कमी केल्यानंतर महागाई किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या किमती कधीच कमी झालेल्या नाहीत. ग्राहकांना फायदा होतो, हा प्रचार खोटा आहे. तेल विकणाऱ्या कंपन्या आपली विक्री वाढवण्यासाठी असा प्रचार करतात."
डॉ. कैसर बंगाली बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार होते आणि सिंध सरकारचे आर्थिक विकास सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
डॉ. कैसर बंगाली यांनी एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, "इंधनाचे दर कमी केल्याने केवळ तेल विकणाऱ्या कंपन्यांचा नफा होतो. तेलाच्या किंमती कमी करू नये. उलट सरकारने जुन्या दरानेच इंधनविक्री केली तर जो नफा होईल त्यातून सरकारने कर्ज फेडावं. जीएसटी कमी करावा. यातून उद्योग आणि रोजगारांना प्रोत्साहन मिळेल."

आंतरराष्ट्रीय बाजारात उलथापालथ

जागतिक तेल उत्पादकांच्या अंदाजानुसार कोव्हिड 19 मुळे जगभरात इंधनाच्या वापरात 35 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सर्वांत आधी चीन आणि त्यानंतर युरोपातल्या अनेक देशांनी टाळेबंदी केल्याने तेलाच्या विक्रीवर सर्वांत जास्त परिणाम झाला.
मात्र, असं काय घडलं, ज्यामुळे कच्च्या तेलाचे दर शून्याच्याही खाली गेले आणि जे देश भरघोस ऑईल रिझर्व्ह असल्याचा गर्व बाळगत होते तेच तेल त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागलं. हे जाणून घेण्यासाठी आम्ही भाजप नेते आणि इंधन विषयक जाणकार नरेंद्र तनेजा यांच्याशी बातचीत केली.