शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (20:49 IST)

कोरोना रशिया : देशात वाढतोय कोव्हिड मृत्यूंचा आकडा, पण लस घेणाऱ्यांची संख्या तरीही कमीच

कोव्हिड - 19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा रशियातला आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय.
डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग देशात झपाटयाने पसरत असल्याने रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाल्याचं रशियन प्रशासनाने म्हटलंय.
 
जगातला सर्वांत मोठा देश असणाऱ्या रशियामध्ये गेल्या 24 तासांत एकूण 679 जणांचा कोव्हिड -19 मुळे मृत्यू झालाय.
 
कोरोनाची जागतिक साथ सुरू झाल्यापासून रशियामध्ये आतापर्यंतचा एका दिवसांतल्या मृत्यूंचं हे सर्वात जास्त प्रमाण असल्याचं सांगण्यात येतंय.
 
रशियाच्या कोव्हिड टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 23 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
 
सगळ्यात जास्त रुग्ण राजधानी मॉस्कोमध्ये आढळले आहेत. ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय ते पाहता येत्या काही दिवसांमध्ये मोठं संकट उभं राहण्याची भीती असल्याचं मॉस्कोच्या उप-महापौर अॅनास्टासिया राकोवा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
येत्या काळामध्ये हॉस्पिटल बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
 
पण असं असलं तरी अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून लॉकडाऊन टाळण्याचे सर्व प्रयत्न आपण करत असल्याचं रशियन प्रशासनाने म्हटलंय.
 
रशियातली लसीकरण मोहीम ही अगदी संथगतीने सुरू असल्याचं काही माध्यमांनी म्हटलं होतं. रशियात लशीचे डोस उपलब्ध आहेत, पण लस टोचून घ्यायला लोक उत्सुक नाही. सव्वा कोटींची लोकसंख्या असणाऱ्या मॉस्को शहरामध्ये आतापर्यंत फक्त 26 लाख लोकांनीच लशीचा एक डोस घेतलेला आहे.
 
खरंतर लस विकसित करून ती वापरात आणणारा रशिया हा पहिला देश होता.
 
स्पुटनिक -व्ही ही लस रशियातल्या गामालयाने तयार केली आहे आणि जगातल्या इतर देशांच्या आधी रशियामध्ये कोरोनावरच्या या लशीला परवानगी देण्यात आलेली होती.
 
रशियात तयार करण्यात आलेल्या या स्पुटनिक- व्ही लशीच्या आणीबाणीच्या काळातल्या वापराला भारतानेही परवानगी दिली असून भारतात डॉ. रेड्डीज लॅबने यासाठीचा करार केलेला आहे.