शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (16:57 IST)

नागपुरात लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या आनंदात केलेल्या पार्टीमुळे 180 जणांना कोरोना

प्रवीण मुधोळकर
लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या आनंदाची पार्टी आयोजित करणा-या एका व्यक्तीमुळे नागपुरात तब्ब्ल 180 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
 
या एका व्यक्तीच्या चुकीमुळे उत्तर नागपुरामधील नाईक तलाव परिसरातील 700 लोकांना सध्या कोरंटाईन करण्यात आले आहे.
 
ही पार्टी आयोजित करणा-या व्यक्तीमुळे ज्या 180 लोकांना लागण झाली, आहे त्यांच्या संपर्कातील 700 जणांना संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात आलं असून ही संख्या आणखी वाढत असल्याचं नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीबीसी मराठीला सांगितले आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
एका व्यक्तीमुळे नागपुरात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या दोन भागांना आता उत्तर नागपुरातील नाईक तलाव ह्या परिसराने मागे टाकले आहे. आता नवा हॉटस्पॉट बनलेल्या या भागात सहा दिवसात 180 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
 
अचानक एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाईक तलाव भागात का आढळून येताहेत याचा नागपूर महापालिकेच्या वतीने तपास करण्यात आला. त्यात एकाच कुटुंबातील 16 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच निष्पन्न झाले.
 
या कुटुंबियांची चौकशी करण्यात आल्यानंतर याच कुटुंबातील एका तरुणाने मित्रांसोबत पार्टी केल्याचं उघड झालं. अडीच महिन्यांनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी या तरुणाने ही पार्टी नाईक तलाव परिसरातील आपल्या घरीच आयोजित केली होती. याच पार्टीसाठी मटण घेण्यासाठी हा तरुण नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमिनपुरा भागात गेला होता. या पार्टीत पाच जण सहभागी झाले होते.
 
या पार्टीनंतर पार्टीच्या आयोजकाची तब्येत अचानक खराब झाली आणि त्याला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आल्यावर तो पॉझिटिव्ह आढळला.
 
प्रकरण उघडकीस कसं आलं?
यासंदर्भात बीबीसी मराठीने नागपूर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण घंटावार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर नागपुरातील नाईक तलाव परिसरातून मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आल्यावर आम्ही चौकशी सुरु केली.
 
ज्या एकाच परिवारातील 16 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यापैकी सुरवातीला लक्षणे आढळलेल्या व्यक्तीची चौकशी आम्ही केली. तो व्यक्ती तरुण होता आणि त्याने पार्क मध्ये सकाळी फिरायला गेलो असतांना लागण झाली अशी उडवाउडवीची उत्तरं महापालिकेच्या कर्मचा-यांना दिली.
 
नंतर सखोल तपास केला असता हाच तरुण पार्टी केल्यानंतर आजारी पडला होता ह्या निष्कर्षापर्यंत पोहचलो. या सर्व बाबी आम्ही जोडून पाहिल्या. पुन्हा त्या व्यक्तीला ही माहिती सांगितल्यावर आपण पार्टीसाठी मटण आणण्यासाठी मोमीनपुरा या कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात गेल्याच त्याने मान्य केले. लोक कोरोनाची माहिती लपवितात त्यामुळे अनेकांना संसर्ग होऊ शकतो आणि तोच धोका सध्या सर्वाधिक असल्याच महापालिकेचे आरोग्य अधिकारी सांगत होते.
 
महापालिकेपुढे आता आव्हानं काय?
या प्रकरणी आम्ही नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
लॉकडाऊनमध्ये अनेक शिथिलता देण्यात आल्याच्या निर्णयाचं स्वागतच आहे आणि हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर यावी हाच प्रयत्न आहे. पण लॉकडाऊनमधील सुट हा स्वैराचार नव्हे असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
 
उत्तर नागपुरातील नाईक तलाव हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नाईक तलाव परिसरात तरुणाने पार्टी करणे किती मोठा विध्वंस ठरू शकतो याचं हे उधाहरण आहे. आता दुचाकीवर फक्त एकच व्यक्तीला परवानगी असतांना तीन - तीन लोक एकाच दुचाकीवर बसून काही ठिकाणी प्रवास करताहेत असे वागणे योग्य नाही असंही मुंढे म्हणाले.
 
लोकांनी जर लॉकडाऊनमध्ये चुका केल्या नसत्या तर जनजीवन पुर्णपणे आतापर्यंत सुरळीत झाले असते. कोरोनाच्या काळात एका व्यक्तीच्या चुकीमुळे यापुर्वी नागपुर शहराचे मोठे नुकसान झाल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
 
एका व्यक्तीमुळे नागपुरात किती आणि कुठे कोरोनाचा प्रसार?
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सतरंजीपुऱ्यातील एका व्यक्तीने कोरोनाची माहिती लपविली त्याचा मृत्यू सध्या परिसरात 120 पॉझिटिव्ह पेशंट आहे मोमीनपुरा येथेही एकाचा मृत्यु कोरोनामुळे झाला होता त्यानेही माहिती लपविली.
 
तिथे आज 200 केसेस आहेत. आणि आता नाईक तलाव येथे तरुणाने पार्टी करून माहिती लपविली तिथे सध्या कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची संख्या 180 च्या पुढे गेली आहे.