सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (16:21 IST)

प्लास्टिक पिशव्या, अंडरवेअर खाल्ल्याने हरणाचा मृत्यू?

थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या नॅशनल पार्कमध्ये मरण पावलेल्या हरणाच्या पोटामध्ये तब्बल 7 किलो कचरा आढळल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
 
पुरुषांच्या अंडरवेअर, प्लास्टिक बॅग्स, इंस्टंट कॉफीचे सॅशे आणि प्लास्टिक रोपचे तुकडे या मृत हरणाच्या पोटातून काढण्यात आले.
 
मृत्यूआधी 'बराच काळ' या हरणाने प्लास्टिक खाल्लं असल्याचं खन सथान नॅशनल पार्कच्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय.
 
याचवर्षी थायलंडमध्ये लहान डुगाँगचाही (मध्यम आकाराचा जलचर सस्तन प्राणी) प्लास्टिक खाल्ल्याने मृत्यू झाला होता.
 
मरियम नावाच्या या डुगाँगच्या रेस्क्यूचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या पिल्लाने अनेकांचं मन जिंकून घेतलं. पण त्यानंतर काहीच महिन्यांनंतर या पिलाचा मृत्यू झाला. प्लास्टिकमुळे या पिलाच्या पोटात गुंतागुंत निर्माण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात उघडकीला आलं होतं.
 
25 नोव्हेंबरला थायलंडच्या उत्तरेकडील ना नॉय जिल्ह्यातल्या खन सथान नॅशनल पार्कमध्ये गस्त घालणाऱ्या एका अधिकाऱ्याला 10 वर्षांचं हे हरीण मृतावस्थेत आढळलं.
 
या हरणाच्या पोटामध्ये रबर ग्लोव्हज, इन्स्टंट नूडल्स आणि लहान टॉवेलही सापडलाय.
 
"मरणाआधी या हरणाने बराच काळ हे प्लास्टिक खाल्लं असावं असा आमचा अंदाज आहे," असं नॅशनल पार्कचे संचालक क्रिंगसाक थानोमपन यांनी बीबीसी न्यूज थाईशी बोलताना सांगितलं.
 
"या हरणाच्या महत्त्वाच्या नलिकांमध्ये प्लास्टिक अडकलं असावं असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे पण याबाबतची संपूर्ण तपासणी करण्यात येईल."
 
नॅशनल पार्कमध्ये जाऊन कचरा करणाऱ्यांवर यानंतर सोशल मीडियातून टीका होतेय.
 
"जेव्हा तुम्ही नॅशनल पार्कला भेट देता, तेव्हा स्वतःचा कचरा परत घेऊन या. जरा जबाबदारीने वागा," एकाने फेसबुकवर म्हटलंय.
 
लोकांना स्वतःचा कचरा उचलायला लावणं कठीण असल्याचं दुसऱ्याने म्हटलंय.
 
"ही गोष्ट अशी गोष्ट आहे जी लहानपणापासूनच शिकवावी आणि वळण लावावी लागते. मोठं झाल्यानंतर हा बदल घडणं कठीण आहे."
 
यासाठी तीन टप्प्यांमध्ये एका योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं क्रिंगसाक म्हणतात. नॅशनल पार्क परिसराकतून प्लास्टिक आणि इतर कचरा स्थानिकांमार्फत वेचण्याचा त्यांचा उद्देश्य आहे.
 
याशिवाय या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल आणि लोकांनी कचरा करू नये म्हणून जागरूकता मोहीमही राबवली जाईल.
 
थायलंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
ग्रीनपीस या पर्यावरणविषयक संघटनेनुसार दर वर्षी थायलंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे 75 अब्ज तुकडे फेकून दिले जातात.
 
जानेवारी 2020पासून थायलंडमधील बहुतेक दुकानदार फक्त एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या देणं बंद करणार असल्याचं थायलंडच्या पर्यावरण मंत्र्यांनी सप्टेंबरमध्ये म्हटलं होतं.
 
या बातमीसाठी वाचिरनॉट थाँगस्टेप आणि स्मितनन यँगस्टर यांनीही माहिती पुरवली आहे.