शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (16:17 IST)

दवेंद्र फडणवीस आणि भाजपची महाराष्ट्रात या 6 चुकांमुळे झाली पिछेहाट - विश्लेषण

बुधवारी भाजप विधानसभेमध्ये बहुमत सादर करणार असंच चित्र मंगळवार सकाळपर्यंत होतं. पण काही तासांतच चित्रं पालटलं आणि भाजपच्या सोबत गेलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
 
यानंतर तासाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आपण विरोधी पक्षात बसायला तयार असल्याचं जाहीर केलं.
 
यानंतर देवेंद्र फडणवीस ताबडतोब राजभवनावर गेले आणि त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे सोपवला.
 
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हेच महाराष्ट्रातल्या या दर मिनिटाला बदलणाऱ्या घटनाक्रमावरून लक्षात आलं. पण गोवा, मणीपूर आणि हरियाणामध्ये सरकार स्थापन करणाऱ्या भाजपकडून नेमकं काय चुकलं असा प्रश्न मग उभा राहतो.
 
बीबीसीच्या प्रतिनिधी मानसी दाश यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यामते भाजपकडून या चुका झाल्या.
 
प्रदीप सिंह यांचं विश्लेषण
 
भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाल्याचं निवडणूक निकालांनंतर सगळ्यांनाच माहीत होतं. पण शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने स्वतःच्या बाजूने कोणतंही पाऊल उचललं नाही आणि आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचं थेट राज्यपालांना जाऊन सांगितलं.
 
यानंतर भाजपबाबत संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात एक सहानुभूतीची भावना होती. कारण तोपर्यंत पक्षाची वागणूक ही सन्मानजनक होती. पण अजित पवारांना सोबत घेत भाजपने जे केलं त्यामुळे त्यांनी लोकांकडून मिळणारी ही सहानुभूती आणि सन्मान गमावला.
 
सोबतच चाणक्य, अभेद्य रणनीती आखणारे तज्ज्ञ म्हणून असलेल्या अमित शाह यांच्या प्रतिमेलाही तडा गेला.
 
भाजपची सध्याची स्थिती 'न खुदा ही मिला न विसाले सनम' म्हणजे ना या बाजूला ना त्या बाजूला अशी झालीय. साध्य काहीच झालं नाही पण नुकसान मात्र मोठं झालं. आणि या नुकसानाची भरपाई इतक्यात होणार नाही.
पहिली चूक - NCP पासून फारकत
निवडणुकीनंतरची परिस्थिती पाहता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या विरुद्ध एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटची नोटीस पाठवणं ही भाजपची पहिली चूक होती.
 
सरकार हे सूड उगवण्यासाठी करत नसून यामागे सरकारचा हात नसल्याचं शेवटी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीडियासमोर येऊन सांगावं लागलं होतं.
 
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात एखाद्या 'बफर' सारखा काम करत होता. शिवसेनेने दबाव टाकल्यानंतर भाजपला राष्ट्रवादीकडून मदत मिळत होती.
 
भाजपला 2014 मध्ये बहुमत सिद्ध करायचं होतं तेव्हा राष्ट्रवादीने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल
 
एकूण जागा 288
सरकार स्थापनेसाठी जागा 145
भाजप 105
शिवसेना 56
राष्ट्रवादी काँग्रेस 54
काँग्रेस 44
अपक्ष 12
इतर 17
दुसरी चूक - अजित पवारांवर विश्वास ठेवणं
ज्या अजित पवारांच्या नावे पाच वर्षं भ्रष्ट म्हणून ओरड केली, त्यांच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचारी कोणी नाही, असं म्हणत ज्यांच्या विरुद्ध तपासणी सुरू केली त्यांच्यावरच विश्वास ठेवणं ही भाजपची दुसरी चूक होती.
 
त्यांनी अशा एका कागदावर विश्वास ठेवला जो एकप्रकारे चोरून आणण्यात आला होता.
 
त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याविषयी अजित पवारांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. भाजपला याचा अंदाज घेता आला नाही.
 
आता असं वाटतंय की भाजपने फक्त बोलण्यावरूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.
 
पक्षाकडे कोणताही 'प्लान बी' तयार नव्हता. जितके आमदार आणण्याची गोष्ट अजित पवारांनी केली होती, तसं घडलं नाही तर काय करायचं याची तयारी भाजपने केली नव्हती.
 
तिसरी चूक - पवार कुटुंबाला समजू न शकणं
शरद पवार आणि अजित पवार यांचं नातं योग्यपणे समजून न घेणं, ही भाजपंची मोठी चूक होती. हे दोघंही एकाच कुटुंबातले आहेत.
 
सत्तेत येण्याच्या प्रयत्नात या कुटुंबात फूट पडेल, असं भाजपने गृहित धरलं होतं.
 
पण कुटुंबामधले भावनिक बंध आणि कुटुंबातून विलग होणाऱ्या माणसावर असणारा मानसिक दबाव भाजपने लक्षात घेतला नाही.
 
कुटुंबातल्या लोकांसाठी अजित पवारांची समजूत काढणं सोपं होतं. कारण राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसच्या महाविकास आघाडीतही त्यांना उप-मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. आणि भाजपंसोबत जाऊनही तेच मिळत होतं. यापेक्षा जास्त त्यांच्या हाती पडणार नव्हतं.
 
म्हणूनच मग पक्ष भेदत, कुटुंबात दुफळी निर्माण करत हाती येणारी गोष्ट फारशी मोठी ठरत नव्हती. अजित पवारांसाठी हा फायद्याचा सौदा नव्हता. कदाचित हेच समजावण्यात त्यांच्या कुटुंबाला यश आलं.
 
चौथी चूक - शरद पवारांच्या ताकदीला कमी लेखणं
शरद पवारांना कमी लेखणं ही भाजपची आणखी एक मोठी चूक.
 
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ईडीची नोटीस आल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी पलटवार केला त्यामुळे भाजपचं किमान 15 ते 20 जागांचं नुकसान झालं.
 
महाराष्ट्रात, विशेषतः मराठा राजकारणातले अजूनही शरद पवार हेच सर्वांत मोठे नेते आहेत. आणि हेच शरद पवारांनी पूर्णपणे सिद्ध केलं, यात वादच नाही. पण भाजपच्या हे लक्षात आलं नाही.
 
भाजप आणि पंतप्रधान मोदींचं खूप पूर्वीपासून शरद पवारांशी एक वेगळंच नातं आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांना फोन करून त्यांच्याकडून कामकाजाविषयी वा राजकारणाविषयी सल्ला घेत असू, असं खुद्द मोदींनी मान्य केलं होतं.
 
पण या मैत्रीत फूट का पडली, नेमकं काय झालं हे कळणं कठीण आहे.
 
शरद पवार एका वेगळ्याच प्रकारच्या राजकारणासाठी ओळखले जातात. 1978मध्ये त्यांनी त्यांचे राजकीय गुरू असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्याविरोधात बंड केलं आणि काँग्रेसपासून वेगळं होत वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले.
 
त्यानंतर त्यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं स्थान ध्रुव ताऱ्यासारखं झालं. काँग्रेसमध्ये परत आले, बाहेर पडले, आणि महाराष्ट्राचे तीनदा मुख्यमंत्रीही झाले.
 
त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्यालाही दोन दशकं उलटून गेली आहेत. त्यांचा पक्ष आज महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षाही मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. लोकांना आपल्या बाजूने ठेवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत.
 
राजकारणातली खेळी आधीच ओळखणाऱ्या दिग्गजांपैकी एक शरद पवार आहेत. काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे त्यांना पक्कं कळतं.
 
निवडणूक प्रचारादरम्यान 80 वर्षांच्या पवारांनी आपल्यातला लढवय्या राज्याला दाखवला. कोसळत्या पावसात उभं राहून प्रचाराचं भाषण करणाऱ्या पवारांच्या फोटोने साऱ्या निवडणुकीचा नूर पालटला.
 
पाचवी चूक - अवसान गाळणं
राज्यातल्या सरकार स्थापनेमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सहभागी करणं चूक होतं.
 
जर हे काम नेहमीच्या पद्धतीने झालं असतं, म्हणजे - कॅबिनेटची बैठक झाली असती, त्यामध्ये राष्ट्रपती राजवट मागे घेण्याचा निर्णय झाला असता आणि त्यानंतर शपथविधी झाला असता तर कदाचित भाजपची इतकी नाचक्की झाली नसती.
 
पण मध्यरात्री हे सगळं करण्याची इतकी घाई का करण्यात आली, याचीच सध्या चर्चा आहे. पंतप्रधानांना आणीबाणीच्या कालातील तरतुदी वापराव्या लागल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पण पक्षाची यासाठी तयारीच नसल्याचं नंतर लक्षात आलं.
 
जर हे नियमित पद्धतींनी झालं असतं, तर कदाचित प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलंच नसतं. सरकारला चुकीच्या पद्धतीने शपथ देण्यात आली असल्याने हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मागणी होती.
 
त्यांचा प्रश्न होता, "अशी कोणती आपत्ती आली होती की देवेंद्र फडणवीस यांना सकाळी 8 वाजता शपथ देण्यात आली? जर हे बहुमताचा दावा करत आहेत तर मग ते सिद्ध करण्यापासून पळ का काढत आहेत?"
 
सहावी चूक - काँग्रेस - शिवसेना - राष्ट्रवादीला स्वतःच एकमेकांच्या जवळ आणणं
आपापसांतले मतभेद मिटवत एकत्र येत आपल्या विरुद्ध लढण्याची संधी भाजपने या तीन्ही पक्षांना दिली.
 
मतभेद विसरून एकत्र येण्याखेरीज या पक्षांकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण हा त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न होता.
 
भाजपला जर राष्ट्रवादीचा हात धरायचा होता तर त्यांनी थेट शरद पवारांशी बोलणी करायला हवी होती.
 
त्यांच्या अटींवर जर भाजपने ही आघाडी केली असती तर सरकार टिकलं असतं आणि शिवसेनेलाही धडा शिकवता आला असता. भाजपकडे ही संधी होती.
 
चूक कोणाची, फडणवीसांची की पक्षाची?
महाराष्ट्रात जे काही घडलं त्यासाठी एकट्या देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवता येणार नाही. याला भाजपचं राष्ट्रीय नेतृत्त्वंही जबाबदार आहे.
 
सगळ्यात पहिली बाब म्हणजे महाराष्ट्र हे काही लहान राज्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने कर्नाटकमध्येही हीच चूक केली होती.
 
जर शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीचं सरकार होऊ दिलं असतं तर अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार फार काळ टिकलं नसतं, आणि भाजपला त्याचा फायदा झाला असता. पुन्हा निवडणुका झाल्या असत्या तर ते भाजपच्या पथ्यावरच पडलं असतं आणि निवडणुका झाल्या नसत्या, तरी त्यात भाजपचाच फायदा होता.
 
पण आता जे काही झालं, त्यात भाजपचं फक्त नुकसानच झालं.
 
देवेद्र फडणवीसांच्या प्रतिमेला हा मोठा धक्का आहे. कारण भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत होतं.
 
भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपैकी तेच दिल्लीच्या सर्वाधिक जवळ असल्याचं मानलं जात होतं. त्यांना पक्षाच्या हायकमांडचा जो पाठिंबा मिळाला तसा इतर मुख्यमंत्र्यांना मिळाला नाही.
 
पण जे काही घडलं त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि राजकीय जाण याला तडा गेलाय. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणालाही हाताशी धरत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून आता त्यांची छबी निर्माण झालीय.
 
(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मंत ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांची वैयक्तिक मतं आहेत)