1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (17:32 IST)

आहार: जपानमधल्या गांधीलमाशा खाणाऱ्या 'या' गावाबद्दल ऐकलं आहे?

पिढ्यानुपिढ्या जपानमधील अनेक कुटुंबांनी गांधीलमाश्यांची शिकार केलेली आहे, त्यांचे संगोपन केलेले आहे व त्यांनी या माश्यांचा आहारातही समावेश केलेला आहे. परंतु, हा जुन्या काळापासून चालत आलेला खाद्यपदार्थ लवकरच लुप्त होईल का?
 
"मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय."
 
गांधीलमाश्यांची शिकार करणाऱ्या एका गावकऱ्याने मला शेताच्या कडेला असणाऱ्या छोट्याशा मंडपापाशी बोलावलं. त्याने एक खडबडीत, तपकिरी रंगाचं गांधीलमाशीचं घरटं उघडून दाखवलं. त्यातल्या सुंदर विविधरंगी आतल्या भागात विपुल अळ्या होत्या. मला एक स्थानिक रूचकर खाद्यपदार्थ देऊ केला जात होता.
 
फक्त नोव्हेंबर महिन्यातच उपलब्ध होणाऱ्या या घरट्याच्या एका किलोची विक्री 9 हजार येनला (64 पौंड) होते. त्या वळवळणाऱ्या अळ्या मी तोंडापाशी आणल्या आणि तशाच चटकन खाऊन टाकल्या.
 
पातळ, क्रिमी नि एकदम रुचकर लागलं. शिकारी आणि मी बोलत राहिलो, अधेमधे मिठाई खाल्ल्यासारखे अळ्यांचे तोबरे भरले जात होते.
 
जपानमधील गिफू प्रांतात सर्वांत मोठा गांधीलमाशी महोत्सव भरवला जातो- 'कुशिहारा हेबो मत्सुरी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात मला हा शिकारी भेटला. काळ्या गांधीलमाश्यांच्या दोन प्रजातींसाठी 'हेबो' हा स्थानिक शब्द वापरला जातो. या दोन प्रजाती तुलनेने अनाक्रमक, आणि म्हणूनच पकडायला सोप्या असतात. दर वर्षी, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी या प्रदेशाच्या विविध भागांवरून लोक गांधीलमाश्यांची घरटी घेऊन इथे येतात.
 
आसपासच्या जंगलातून गोळा केलेल्या या घरट्यांची स्पर्धा इथे घेतली जाते. सर्वांत जड घरटी असलेल्या शिकाऱ्यांना एक ट्रॉफी मिळते, त्याच सोबत बरीच प्रतिष्ठाही मिळते. बहुतांश उपस्थित लोकांना एखाद्-दुसरी नांगी टोचतेच, आणि काही जण घरी जाऊन शिजवण्यासाठी घरटं विकत घेतात.
 
हा महोत्सव म्हणजे आधीच्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मालिकेचा शेवट असतो. उन्हाळ्याच्या आरंभी शिकारी डोंगरांच्या दिशेने जातात. जंगलात अगदी आतल्या बाजूला ताज्या माशाचा एक काप काढून पांढरा कागद त्याला जोडला जातो आणि मग शिकारी वाट पाहत राहतात. लगेचच एक गांधीलमाशी तिथे येते, आणि घरट्याकडे उडत जाताना पांढऱ्या खुणेवर एक टोचा मारते. शिकारी तिचा पाठलाग करतात, झुडपांमधून वाटा काढत, ओढे पार करत, खाचाखोचांमधून पुढे जातात.
 
शेवटी जमिनीतली घरच्याची प्रवेशाची जागा त्यांना सापडते, तिथे ते खणायला लागतात, मग तिथून एका लाकडी खोक्यात माश्या भरतात. मग शरद ऋतूपर्यंत या माश्या 'वाढवल्या' जातात. या माश्यांना शिकारी लोक साखर, पाणी व कच्च्या मांसाचा आहार देतात, जेणेकरून नोव्हेंबरच्या महोत्सवापर्यंत प्रौढ माश्या नि अळ्याही मोठ्या प्रमाणात घरट्यात तयार झालेल्या असतात.
 
संपूर्ण जपानभर गांधीलमाश्या खाल्ल्या जात असत. पण आजकाल हा आहार बहुतांशाने लुप्त झाला आहे. केवळ गिफूमधील एना जिल्ह्यातील जुन्या पिढीपुरताचा हा आहार मर्यादित राहिला आहे. या जिल्ह्यातच कुशिहारा गाव आहे आणि नकात्सुगावा हे ठिकाण तिथून ईशान्येला आहे.

टोकयोतील रिक्क्यो विद्यापीठामध्ये आंतरविद्याशाखीय संस्कृतीअभ्यासाचे प्राध्यापक असलेले केनिची नोनाका यांनी गेली तीसहून अधिक वर्षं या प्रदेशाचा अभ्यास केला आहे. या अनन्यसाधारण पदार्थाची परंपरा कशी सुरू झाली, हे गूढच आहे, असं ते सांगतात. एकेकाळी दुर्गम भागातील या समुदायासाठी गांधीलमाशा प्रथिनांचा मूल्यवान स्त्रोत ठरत असत, असं काहींनी सुचवलं आहे. पण नोनाका यांनी याबाबती असहमती व्यक्त केली: "100 ग्रॅम हेबो माश्या तुलनेने जास्ती प्रथिनं राखून असतात, पण वास्तवात कोणीच एका वेळी इतक्या प्रमाणात या माश्या खात नाही."
 
जपानामधील ज्या ठिकाणांवर काळ्या गांधीलमाश्या खाण्याची पद्धत रूढ होती त्या ठिकाणांचं सर्वेक्षण करत असताना नोनाका यांना असं आढळलं की, लोकांना योगायोगाने या माश्या दिसायच्या तेव्हाच त्यांचं संगोपन केलं जात असे आणि पूरक अन्न म्हणून खाल्लं जात असे. काळ्या गांधीलमाश्यांची उपज घेणं हा ब्लॅकबेरी गोळा करण्यासारखाच कीटकांच्या बाबतीतला प्रकार होता.
 
पण जपानच्या इतर प्रांतांमध्ये व्यक्ती केवळ घरट्यांची उपज घ्यायचे, तर कुशिहारा व आसपासच्या भागांमधील स्थानिक लोक सामाजिक कामकाज म्हणून सक्रियपणे गांधीलमाश्या शोधायचे आणि मग आपल्या घरांबाहेर त्यांना वाढवायचे. परिणामी, स्थानिक उत्सवांमध्ये हेबो माश्या आहाराला असायच्या. यातूनच स्थानिक संस्कृती व अस्मितेमध्ये गांधीलमाशीच्या शिकाराची प्रथा दृढपणे रुजली.
 
कुशिहारामधील हेबोची सामुदायिक अर्थपूर्णता लक्षात घेता, जुन्या पिढीतील शिकाऱ्यांची संख्या कमी झाल्यानंतर 1993 साली ही परंपरा वाचवण्यासाठी एक मोठा सार्वजनिक महोत्सव सुरू झाला, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. इतर प्रांतांमध्ये लहान स्वरूपात गांधीलमाश्यांच्या स्पर्धा होतात, पण केवळ कुशिहारातील स्पर्धेचंच वार्तांकन माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात व्हायचं, यातून त्यांना ख्याती प्राप्त झाली.
 
परंतु, जपानला एकंदरितच ज्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे, त्या समस्या एना जिल्ह्यातही आहेत. रोडावती लोकसंख्या व ग्रामीण भागांतून शहरांकडे होणारं स्थलांतर, यामुळे ग्रामीण भागांमध्ये निर्जन रस्ते व ओसाड घरं दिसतात.
 
कुशिहारा आता स्वतंत्र नगरपालिका उरलेली नाही, तिथली स्थानिक लोकसंख्या कमी झाल्यामुळे या शहराचा समावेश एना शहराच्या प्रशासनाअंतर्गत करण्यात आला आहे (2000 ते 2015 या काळात एनाची लोकसंख्या 12 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 51,073 पर्यंत आली). आणि 2010 साली महोत्सवातील ज्येष्ठ संयोजकांनी हा उपक्रम थांबवण्याबद्दल बोलायला सुरुवात केली, तेव्हा काही मोजके तरुण गावकरी मशाल पुढे नेण्यासाठी उभे राहिले.

"हेबोवर प्रेम करणारा एक माणूस जिवंत असेपर्यंत ही परंपरा सुरू ठेवण्याची प्रेरणा आमच्यात आहे," असं स्थानिक फॉरेस्ट रेंजर दाइसुके मियाके (वय 42) सांगतात. "हेबोच्या माध्यमातून लोकांशी जोडून घेता येतं."
सहा वर्षांपूर्वी मियाके व इतर तरुण गावकऱ्यांनी या महोत्सवाचं व्यवस्थापन हातात घेतलं. त्यांच्यातील खूपच थोडे लोक स्वतः गांधीलमाश्या गोळा करतात अथवा वाढवतात, पण जुन्या पिढीला हेबोचं किती महत्त्व वाटतं, हे या तरुणांनाही समजतं.
महोत्सवाच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मियाके कामाला लागले होते. बॅनर लावण्यासाठी ते एका झाडावर चढत होते. तिथे संयोजकांपैकी नसलेली थोडीच मंडळी होती त्यांच्याशी मी बोलायला गेले. चार वयस्क पुरुष कॅम्पिंग स्टूल घेऊन तिथल्या हिरवळीवर शांतपणे वाट बघत उभे होते. अजून तासभर तरी कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता नव्हती, पण विक्रीला असणारी घरटी पहिल्यांदा आपल्याला मिळावीत, यासाठी या चौघांना पहिल्या रांगेत जागा पकडायची होती.
 
त्यांनी स्वतःची जागा निश्चित केल्यानंतर आम्ही महोत्सवातील स्टॉलच्या दिशेने एकत्र चालायला लागलोत. तिथे गांधीलमाश्यांशी निगडीत विविध पदार्थ होते. माझी नजर लावलेल्या चॉकलेट हेबो स्टिकवर खिळली होती, इतक्यात या चौघा वृद्धांपैकी एकाने तळलेल्या गांधीलमाश्यांचं मडकंच आणलं. कुशिहारामधल्या इतर मोजक्या काही वृद्धांप्रमाणे हेदेखील मोठ्या जपानी गांधीलमाशीची (Vespa mandarinia japonica) शिकार करणारे होते. या माश्या प्रचंड आक्रमक असतात व त्यांचा दंश तीव्र दुखण्याला कारणीभूत ठरू शकतो. हे घरातल्या घरात वाढवलेले कीटक नव्हेत.
 
"तुम्ही गांधीलमाशी खाता, होय ना?" त्याने विचारलं. त्याच्या प्रश्नाचा सूर काहीसा आव्हानात्मक होता.
 
"खा, खा! मोठी घे!" दुसरा एक जण म्हणाला.
 
चौघेही आजोबा मोठ्यांदा हसायला लागले. मी मध्यम आकाराची माशी काडी टोचून उचलली आणि शांतपणे खाल्ली. थोडीशी कुरकुरीत आणि खरं सांगायचं तर आणखी हवीहवीशी वाटणारी चव होती. बीअरसोबत चकणा म्हणून खायला अगदी सोयीचा पदार्थ होता हा. त्यातले एक आजोबा लगेच स्टुलावर जाऊन बसले, त्यांच्या सोबत प्यायला कॅन होता आणि चेहऱ्यावर मोठं हास्य होतं.
नंतर लगेचच आम्ही या महोत्सवातला लोकप्रिय पदार्थ- hebo gohei mocha खायला लागलो. यात भाजलेला चिकट भात होता, त्यासोबत मिसो, शेंगदाणा व अर्थातच गांधीलमाश्या यांच्यापासून बनवलेला घट्ट, गोड सॉस होता. यात आधी भारत कालवून घ्यावा लागतो, मग त्यात हेबोच्या अळ्या चेपून घालाव्यात लागतात. हा पदार्थ तयार करायला काही तास लागतात, पण या प्रदेशात कित्येक शतकं उत्सवावेळी हा पदार्थ दिला जातो. काउन्टरपाशी एक लांबच्यालांब रांग जमा झाली.
 
'हेबो गर्ल्स' असं लिहिलेले एकसारखेच टी-शर्ट घातलेल्या तरुणींचा एक गट हेबो गोहन विकत होता. यात भात व गांधीलमाशी एकत्र कालवलेले असतात. काही वृद्ध महिलांनी महोत्सवातील अन्न शिजवण्यातून माघार घेतल्यावर हा तरुणींचा गट पुढे आला. शेकडो मूठ भात तयार करण्यासाठी या महिला पहाटे चार वाजल्यापासून उठलेल्या होत्या.
 
दुसऱ्या दिवशीही त्यांनी हेबो गोहेई मोची तयार केला. "मी लहान असतानापासून हेबो खातेय. नेहमीच्या पदार्थांसारखाच हा एक पदार्थ आहे. पण मी स्वतः गोहेई मोची करायला लागल्यापासून मला ही संस्कृती इतरांशीही वाटून घ्यावंसं वाटतं," असं दाइसुके यांची पत्नी शोको मियाके म्हणाल्या.
 
अलीकडच्या वर्षांत कीडे खाण्यासंदर्भात जपानमध्ये व आंतरराष्ट्रीय पातळीवर बराच रस घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे या महोत्सवासाठी अनेक जण इथे भेट देत असतात. या भागाच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी, शिवाय स्थानिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी पुन्हा जोडून घेण्याची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
महोत्सवाचा भाग बाजूला ठेवला तरी तरुण पिढ्या त्यांच्या आईवडिलांप्रमाणे किंवा आजीआजोबांप्रमाणे गांधीलमाश्यांची शेती करतील का, हा मुद्दा अस्पष्टच आहे. महोत्सवाच्या आयोजनाला मदत करण्यासाठी अनेक जण आनंदाने पुढे आले असले, तरी काही स्वयंसेवकांना गांधीलमाश्या खाण्यामध्ये तितका काही आनंद वाटत नाही, त्यामुळे या माश्या वाढवण्याची तर गोष्टच दूर.
 
या शिकारीचं तंत्र पुढील लोकांना कोण शिकवणार, हा सर्वांत कळीचा प्रश्न आहे. अनेक तरुण स्थानिकांना अजून हे तंत्र येत नाही आणि त्यांनी याबाबतीत फारसा उत्साहही दाखवलेला नाही. अधिकाधिक लोक कामाच्या शोधात हा भाग सोडून दूरदूर जात असल्यामुळे कुशिहारामधील रहिवाशांना गांधीलमाशांची शिकार करण्यासाठी फावला वेळही मिळत नाही.
 
या समस्येची जाणीव असलेले महोत्सवाच्या कार्यकारी समितीचे प्रमुख फुमिटाका अन्दो यांनी पुढच्या जुलै महिन्यात शिकाह मोहिमेचं आयोजन केलं असून 'हेबो गर्ल्स'सह इतरही थोडे गावकरी यामध्ये सहभागी होणार आहेत. स्वतः अन्दो यांनी जेमतेम तीन वर्षांपूर्वीच या शिकारीला सुरुवात केली. पण अलीकडच्या काळात या महोत्सवाला मिळत असलेली लोकप्रियता आश्वासक आहे, असं ते म्हणाले. "तरुण स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे, आणि या वर्षी या मुलीही सहभागी झाल्या आहेत. कुशिहारा हे गावच एक संघासारखं काम करतंय."
 
महोत्सव संपल्यानंतर मी दाइसुके व शोको यांच्या घरी गेले. त्यांच्या तीन मुलींसोबत जेवणाच्या टेबलापाशी बसले. शोको शेगडीजवळ उभं राहून गोड सॉसमध्ये हेबो ढवळत होत्या. नुकत्याच शिजवलेल्या भातासोबत हे दिलं जाणार होतं. लहान असताना त्यांचे आईडील हा पदार्थ करायचे, हे त्यांच्या आठवणीत आहे.
 
जेवत असताना आम्ही मोकळेपणाने गप्पा मारल्या, मुलं एकाग्रतेने जेवत होती. शेवटी हेबोची शेती कीटक खाण्यासोबतच कुटुंब, मित्रमंडळी व स्थानिक अस्मितेशीही जोडलेली आहे.