मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (18:26 IST)

शेतकरी आंदोलन : शिवसेनेचा एकही नेता आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनात सहभागी का झाला नाही?

मुंबईतल्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकरी मोर्चात शिवसेनेचे नेते दिसले नाहीत.
 
केंद्र सरकारने केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबईपर्यंत शेतकरी मोर्चा निघाला.
 
23 जानेवारीला निघालेला जवळपास 1500 शेतकऱ्यांचा मोर्चा 24 जानेवारीला मुंबईत दाखल झाला. आज आझाद मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
 
या सभेमध्ये आदित्य ठाकरेही सहभागी होणार असल्याचं किसान सभेकडून सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात शिवसेनेकडून कोणीही या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेलं दिसलं नाही.
 
याबाबत बीबीसी मराठीने किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "शिवसेनेने आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मुख्यमंत्री काही कामांमध्ये व्यग्र आहेत. आदित्य ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ते काही कारणांमुळे येऊ शकले नसले तरी शिवसेनेने या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे."
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज नियोजित कार्यक्रम होते. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कल्याणच्या पत्रीपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसले. शिवसेनेच्या काही नेत्यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही.
 
शिवसेनेने संधी गमावली?
शेतकऱ्यांचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख अजेंड्यावर असतो. शिनसेना नेते तसंत उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शेतकऱ्यांचा उल्लेख सतत होत असतो. मग आज शिवसेनेनं त्यांचा एकही नेता या आंदोलनासाठी का पाठवला नाही.
 
याबाबत ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर सांगतात, "याआधी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक शेतकरी मोर्चा आला होता. मातोश्रीच्या दारात असून तेव्हाही शिवसेनेचे कोणी प्रतिनिधी त्यात सहभागी झाले नाहीत. आज मुंबईत इतका भव्य शेतकरी मोर्चा आला."
 
"मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देण्याची चांगली संधी शिवसेनेला होती ती त्यांनी गमावली," असं शिवडेकर यांना वाटतं.
 
शिवडेकर पुढे सांगतात, शिवसेनेला त्यांचा प्रतिनिधी पाठवता आला असता, पण तो त्यांनी पाठवला नाही. त्यामुळे शिवसेना शेतकरी आंदोलनांबाबत गंभीर नसल्याचं दिसतय. जरी शिवसेना सांगतेय आमचा जाहीर पाठिंबा आहे. मग तो पाठिंबा कशातून दाखवणार? हा सुध्दा प्रश्न आहे. आज शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित होते. मग यावेळी शिवसेनेला सांगितलं नाही की बोलवलं नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो.