सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (20:42 IST)

ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी यांना संताप का अनावर झाला?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संताप अनावर झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड उपस्थित होते.
 
पीएम मोदी यांच्या भाषणाआधी ममता बॅनर्जी यांना मंचावर बोलावण्यात आलं तेव्हा उपस्थितांमधून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आले. घोषणा देणाऱ्यांना थांबवून आता मुख्यमंत्र्यांना बोलू द्या असं आवाहन करण्यात आलं तेव्हा ममता बॅनर्जी यांचे
 
"ना बोलबे ना...आमी बोलबे ना..." हे शब्द कानावर आले.
 
त्यानंतर त्यांनी मंचावर येत सरकारी कार्यक्रमाची एक विशिष्ट मर्यादा असली पाहिजे. हा सरकारी कार्यक्रम आहे. हा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम कोलकात्यात घेतल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्र्याचीं आभारी आहे. मात्र आमंत्रण देऊन असे अपमानित करणं आपल्याला शोभत नाही. मी याच्याविरुद्ध आणखी काही बोलू इच्छित नाही असं मी तुम्हा लोकांना सांगते. जय हिंद. जय बांगला असं म्हणून त्या जागेवर जाऊन बसल्या.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतात चार राजधान्यांची आवश्यकता व्यक्त केली असून, त्यात पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यालाही स्थान देण्याची मागणी केलीय.
 
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला वाटतं की, भारताला चार राजधान्या हव्यात. इंग्रजांनी कोलकात्यातून संपूर्ण देशावर सत्ता गाजवली. देशात केवळ एकच राजधानी का असावी?"

सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिन आहे. हे निमित्त साधत तृणमूल काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या सर्व कार्यक्रमांना काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीही आहे.
 
अशाच एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी देशाला चार राजधान्यांची गरज व्यक्त केली.
 
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, "नेताजींनी जेव्हा आझाद हिंद सेनेची स्थापना केली, तेव्हा गुजरात, बंगाल, तामिळनाडू अशा सर्व ठिकाणच्या लोकांना त्यात स्थान दिलं. 'तोडा आणि राज्य करा' या ब्रिटिशांच्या नियमा विरोधात ते उभे राहिले."
 
"आजचा दिवस 'देशनायक' दिवस आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नेताजींना 'देशनायक' म्हटलं होतं," असंही त्या म्हणाल्या.
 
यावेळी ममता बॅनर्जी यांनी आझाद हिंद सेनेचा पुतळा उभारण्याची घोषणा केली.
 
ममता बॅनर्जी या सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जन्मदिनाचे औचित्य साधत कोलकात्यातील श्याम बाजार ते रेड रोड या मार्गावर पायी चालल्या.