मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'हाफिज सईदची अटक फक्त आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करणारी'

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावानंतर जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला पाकिस्ताननं अटक केली आहे. सईद बरोबर आणखी 12 जणांवर दहशतवादी संघटनांसाठी आर्थिक निधी गोळा करण्याचा ठपका ठेवला गेला आहे.
 
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकानं पाकिस्तानधील पंजाब प्रांतात ही कारवाई केली आहे. हाफीज सईद आणि इतर 12 जणांविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत 23 खटले दाखल करण्यात आलेत.
 
पण भारताने मात्र ही कारवाई दिशभूल करणारी असल्याचं म्हटलं आहे.
 
लाहोर, गुजरनवाला आणि मुलतान या तीन शहरांत दहशतवादी गटांसाठी आर्थिक सहाय्य उभारण्याचं आणि त्यांना पैसे पुरवण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद, सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की, आमीर हम्जा आणि मोहम्मद याह्या अझीझ यांना दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे.
 
अटकेची कारणं
हाफीज सईद पाकिस्तानच्या कोठडीत होता पण पुराव्यांअभावी त्याला सोडण्यात आलं होतं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 ला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हाफीज सईदच्या जमात उद दावा संघटनेवर बंदी घातली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये जमात उद दावा आणि त्यांची फायनॅन्शियल विंग फला-ए-इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली.
 
दहशतवादविरोधी कायद्यात बदल करून राष्ट्रपतींच्या अध्यदेशाद्वारे ही कारवाई केली गेली होती. पण 6 महिन्यांत म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये अध्यादेशाचा कालावधी संपल्यानंतर ही बंदी उठली होती. तर 21 फेब्रुवारी 2019 ला इम्रान खान यांच्या सरकारनं या दोन्ही संघटनांवर पुन्हा एकदा बंदी घातली. आणि आता पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईनंतर हाफीज सईदला आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
 
या अटकेनंतर पत्रकार परिषदेला संबोधताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान अशा कारवाया करत असतं. या कारवाईत काही दम नाही. कट्टरतावादाशी लढण्यात त्यांना किती रस आहे हे पाकिस्तान अशा गटांविरुद्ध काय कामगिरी करू शकतात यावरून कळेलच."