मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

माझ्या जागी महिला आली तरी चालेल पण ती आकर्षक असावी: दलाई लामा

- रजनी वैद्यनाथन
दलाई लामा हे नि:संशय या पृथ्वीवरील सर्वांत प्रसिद्ध लोकांपैकी एक आहेत. ज्या जमान्यात सेलिब्रिटींची पूजा केली जाते, त्याच जमान्यात दलाई लामा हे अध्यात्मिक जगतातले सुपरस्टार झाले आहेत.
 
दलाई लामांची मी नुकतीच भेट घेतली आणि अनेक विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारल्या. तुमच्यानंतर एखादी महिला दलाई लामा बनू शकते असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं, का नाही? पण ती आकर्षक असायला हवी.
 
याच मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे नैतिक मूल्यंच नाहीत. त्यांच्या या वाक्याची सर्व माध्यमांमध्ये चर्चा झाली. गप्पाच्या ओघातच दलाई लामांनी सांगितलं की, "मला चीनच्या एका अधिकाऱ्याने दैत्य म्हटलं होतं. मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मी म्हटलो हो मी दैत्य आहे आणि मला शिंगं देखील आहेत."
 
"राजकीय विचारशक्ती खूप संकुचित असणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची मला कीव येते", असं ते सांगतात.
 
दलाई लामा आणि चीनचं वैर खूप जुनं आहे. 1959 मध्ये दलाई लामांनी तिबेट सोडलं आणि भारतात आश्रय घेतला. चिनी फौजा तिबेटमध्ये घुसल्यानंतर त्यांना तिबेट सोडणं भाग पडलं. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच जवळपास 6 दशकं झाली दलाई लामा हे हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे राहतात.
 
त्याचबरोबर 10,000 तिबेटियन लोकही सध्या त्या ठिकाणी राहत आहेत. हिमालयाच्या कुशीत मॅकलॉडगंज या ठिकाणी दलाई लामांचा मठ आहे. तुम्ही पुन्हा तिबेटला जाणार का असं विचारलं असता ते सांगतात, "तिबेटच्या लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते मला बोलवतात. असं बोलल्याबरोबरच दलाई लामा म्हणतात की भारतच आता माझी अध्यात्मिक भूमी बनली आहे. "
 
तिबेटला जाण्याचं स्वप्न हे सत्यात उतरण्यापासून शेकडो योजनं दूर असल्याच्या कल्पनेतूनच ते असं सूचित करतात. 2011 मध्ये त्यांनी सर्व राजकीय जबाबदारीपासून निवृत्ती घेतली आहे पण ते अद्यापही तिबेटियन लोकांच्या आदराचं स्थान आहेत यात काही दुमत नाही.
 
चीन आणि दलाई लामांच्या प्रतिनिधींमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून काही संपर्क नाही.
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अद्याप त्यांची भेट घेतली नाही. चीनमधल्या काही निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचं दलाई लामांनी बीबीसीला सांगितलं पण त्यापुढे गोष्ट काही सरकली नाही हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
 
ज्या वेळी दलाई लामांनी तिबेट सोडलं त्या काळात हा प्रदेश अतिशय गरीब होता. तेव्हापासून ते आतापर्यंत या प्रदेशाची आर्थिक भरभराट झाली आहे. याकारणामुळे दलाई लामांचं उद्दिष्टही झाकोळलं गेल्याचं बोललं जातं.
 
एकेकाळी दलाई लामांची ऊठ-बस ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर होत असे. जॉर्ज बुश यांनी त्यांचा सत्कार देखील केला होता. तर बराक ओबामा यांनी त्यांची अनेकदा भेट घेतली. ओबामांनी 2017मध्ये त्यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती.
 
पण आता समीकरणं बदलल्याचं ते सांगतात. डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित करून देखील त्यांना भेट मिळाली नसल्याचं ते सांगतात.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी जेव्हा पदभार स्वीकारला होता तेव्हा दलाई लामांनी म्हटलं होतं, ट्रंप आले तरी काही चिंता नाही पण आता ट्रंपविषयीचं त्यांचं मत बदललं आहे. ट्रंप यांच्या कार्यालयाकडे नैतिक मूल्यचं राहिली नाहीत असं ते म्हणाले.
 
जेव्हा अमेरिकेनं पॅरीस करारातून माघार घेतली तो क्षण तसेच अमेरिकेने निर्वासितांचा प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला आहे ती परिस्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर असलेल्या लहान मुलांचे फोटो आपण पाहिले आणि दुःख झाल्याचं लामांनी म्हटलं. अमेरिकेने पू्र्ण जगाची जबाबदारी घ्यावी असं ते म्हणाले.
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबतचं नातं किंवा त्या नात्याच्या अभावाबद्दल दलाई लामा बोलायचं टाळतात. अमेरिकेचे इतर नेते आणि दोन्ही सभागृहांनी तिबेटियन लोकांना पाठिंबाच दिल्याचं ते सांगतात.
 
चीनसोबत असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून डोनाल्ड ट्रंप हे दलाई लामांशी जवळीक साधत नसल्याचं सांगितलं जातं.
 
चीन नाराज होऊ नये म्हणून भारताने देखील दलाई लामांचा एक कार्यक्रम रद्द केला होता. भारतातल्या त्यांच्या आश्रयाला 60 वर्षं पूर्ण झाल्यानंतर एक मोठा कार्यक्रम करावा अशी तिबेटियन लोकांची इच्छा होती पण भारताने हा कार्यक्रम रद्द केला. 2012मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दलाई लामांची भेट घेतली होती. त्यानंतर चीन आणि ब्रिटनमध्ये कटुता निर्माण झाली होती.
 
दलाई लामांना ब्रेक्झिटविषयी विचारलं असता ते सांगतात की ब्रिटननं युरोपियन युनियनमध्येच राहावं असं मला वाटतं. अर्थात हा त्या देशाचा निर्णय आहे हे बोलायला ते विसरले नाहीत.
 
युरोपियन देशांमध्ये जर निर्वासित येत असतील तर त्यांनी ते काही प्रमाणात येऊ द्यावेत. त्यांना शिक्षण द्यावं आणि ते आत्मनिर्भर झाले त्यांच्याजवळ कौशल्यं आली तर त्यांना पुन्हा आपल्या मायदेशी जाण्यास सांगावं.
 
जर निर्वासितांनी म्हटलं की आम्हाला हाच देश बरा वाटतो तर काय करायचं असं विचारलं असता ते सांगतात, काही प्रमाणात थांबले तर हरकत नाही पण जर खूप लोक राहिले तर युरोपच अफ्रिका बनून जाईल. हे अशक्य आहे.
 
चर्चेच्या शेवटी मी त्यांना त्यांच्याच एका वाक्याची आठवण करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, "माझ्यानंतर दलाई लामा जर एखादी महिला झाली तर हरकत नाही पण ती सुंदर असावी."
 
त्यांना मी पुन्हा विचारलं, "बौद्ध धर्मात तर आत्मिक शांती आणि आंतरिक सौंदर्याला महत्त्व आहे तेव्हा दलाई लामा सुंदर असण्याची अट कशासाठी?" त्यावर ते म्हणाले मनाची शांतता आणि शरीराचं सौंदर्य दोन्ही महत्त्वाचं आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळणं आणि पुरुषांच्या तुलनेत पगार मिळणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
 
त्यांनी त्यांच्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तर दिली. आदल्या दिवशी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की भारतात राहण्याचा हाच फायदा आहे की हा स्वतंत्र देश आहे आणि इथं मी हवं ते बोलू शकतो.
 
दलाई लामांचा एकतेचा संदेश हा सार्वत्रिक आहे. पण जी व्यक्ती जगभर दयाळू म्हणून प्रसिद्धी पावली आहे ती व्यक्ती तितकीच वादग्रस्तही ठरू शकते हेच त्यांच्या भेटीतून जाणवतं.