बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (14:33 IST)

हशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी केली...

हा प्रसंग आहे तेरा वर्षांपूर्वीचा. दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या संघात हशीम अमला नावाचा प्लेयर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावत होता. चौथ्या दिवशी शॉन पोलॉकने कुमार संगकाराला आऊट केलं. हशीम अमलाने कॅच पकडला. कॉमेंटेटर डीन जोन्स यांनी अमलाला उद्देशून 'टेररिस्ट टेक्स अनादर विकेट' असं म्हटलं.
 
उंच आणि काटक शरीरयष्टी, डोक्यावर एकही केस नाही, मात्र चेहऱ्यावर मोठी दाढी. डोळे आपलसं करणारे आणि चेहऱ्यावर तपश्चर्येतून येणारी शांतता हे अमलाला पाहिल्यावर जाणवणाऱ्या गोष्टी जोन्स यांनी पाहिल्या. मात्र त्यांच्या मुखातून अत्यंत अपमानकारक आणि आक्षेपार्ह शब्द बाहेर पडले. टेन स्पोर्ट्स वाहिनीने तत्क्षणी जोन्स यांची हकालपट्टी केली. जोन्स यांनी अगदी लगेचच माफी मागितली. त्यावेळी अमलाचं वय होतं २३.
 
जोन्स यांच्या उद्गाराने रागावण्याचं, चिडण्याचं, विचलित होण्याचं, टोकाची भूमिका घेण्याचं वय. पण मोठं क्षितिज खुणावणाऱ्या अमलाने जोन्स यांना माफ केलं. याप्रकरणाला कोणतंही नवं वळण लागून गोष्टी हाताबाहेर जाणार नाही याची काळजी अमलाने घेतली.
 
खेळाडू म्हणून चाहत्यांची मने जिंकण्याआधीच अमलाने आपल्या वागण्याने लोकांच्या मनात ठाम जागा निर्माण केली. मुस्लीम धर्माचं काटेकोर पालन करणाऱ्या अमलाने संपूर्ण कारकीर्दीत धावा करण्याचा धर्म प्राणपणाने जपला. आणि म्हणूनच अमलाने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर जगभरातले क्रिकेटरुपी खेळधर्माचे चाहते मनापासून हळहळले.
 
अमला आणि भारताचं कनेक्शन जुनं. अमलाचे पूर्वज गुजरातमधल्या सुरतचे. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी दक्षिण आफ्रिका गाठलं. हशीम आणि अहमद हे दोघं भाऊ. त्यांचा जन्म डरबानचा. दोघंही क्रिकेट खेळायचे.
 
डरबान हायस्कूल या क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळेत हशीमचं शिक्षण झालं. याच शाळेत बॅरी रिचर्ड्स, लान्स क्लुसनर शिकले आणि मोठे झाले.
 
शालेय पातळीवर धावांच्या राशी ओतल्यामुळेच हशीम दक्षिण आफ्रिकेच्या U19 टीमचा भाग होता. तिथेही धावांचं तत्व कायम होतं. आफ्रिकेतल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या डॉल्फिन्स संघाचा तो कणा झाला.
 
राष्ट्रीय संघात आगेकूच करण्यासाठी आवश्यक सर्व पायऱ्या हशीमने धावांच्या भरगच्च पोतडीसह पार केल्या. योगायोग म्हणजे २००४च्या आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी हशीमची निवड झाली. कोलकाताच्या भव्य इडन गार्डन्सवर अमलाने पदार्पण केलं.
 
तेव्हापासून अमलाची धावांची मैफल अनुभवणं हा सुरेख अनुभव जगभरातले चाहते घेत आहेत.
 
सन्मान द्या, सन्मान कमवा
अमलाचा सगळा खेळ सन्मान द्या, सन्मान कमवा या प्रणालीवर आधारलेला. जिवंत पिच, अव्वल दर्जाचे बॉलर आणि त्यांच्या भात्यातून सुटणारे बॉल यांना अमलाने नेहमी सन्मान दिला.
 
आपण ज्या ठिकाणी खेळणार आहोत त्या पिचचा आणि प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास हे अमलाच्या खेळाचं वैशिष्ट्य. ३६० डिग्री वळणारं अमलाचं मनगट आणि त्याबळावर रचलेले ठेवणीतले फटके चिरंतन आनंद देणारे.
 
अमलाने खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या तंत्रात काही उणीवा होत्या. तो कर्तृत्वाने मोठा होत गेला तसतसं या उणीवा गायब झाल्या. करकरीत बॅकफूट पंच असेल, नजाकतभरा फ्लिक किंवा दोन्ही पाय उंचावून खेचलेला वर्चस्ववादी पूल- हिंसक, आक्रमक न होताही भरपूर धावा करता येतात ही शिकवण अमलाने दिली. अमलाची प्रत्येक खेळी म्हणजे संयम कसा बाळगावा याचा डेमो आहे.
 
असं म्हणतात की घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या अनेक बॅट्समनची परदेशात भंबेरी उडते. अमलाचं श्रेष्ठत्व यात आहे. भारतात प्रचंड उकाड्यात, स्पिनर्स दोन्ही बाजूंनी आक्रमण करत असतानाही अमला शतकी खेळी करत असे.
 
इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात स्विंग होणाऱ्या पिचवर अमलाच्या नावावर त्रिशतक आहे. ऑस्ट्रेलियात चांगले गोलंदाज आणि बक्कळ बोलंदाजी यांच्याविरुद्ध अमलाच्या नावावर दीडशतकी खेळी आहे.
 
अभ्यास करायचा, चुका सुधारायच्या आणि कंटाळा येईपर्यंत धावा करत राहायच्या हा मंत्र अमलाने अख्खी कारकीर्दभर जपला. शतकानंतर आपण सेलिब्रेट केलं तर बॉलरला वाईट वाटेल, असं वाटावं इतकं अमलाचं शतकी सेलिब्रेशन संयत असायचं. हेल्मेट काढायचं, उलट्या बॅटने प्रेक्षक आणि पॅव्हिलियनला अभिवादन - झालं.
 
आक्रस्ताळे हातवारे, सूड उगवल्यासारख्या मर्कटलीला यातलं काहीही अमलाने कधीच केलं नाही. धावा करण्याच्या जबाबदारीला न्याय दिल्याने अमलाकडे कर्णधारपदाचा काटेरी मुकूट सोपवण्यात आला. त्याने तोही सांभाळला. ही जबाबदारी हाताळण्यासाठी चांगले पर्याय असल्याचं लक्षात आल्यावर अमला बाजूला झाला.
 
शैलीदार, कलात्मक आणि काहीशा पुस्तकी खेळामुळे अमलावर टेस्टचा शिक्का बसला. वनडे संघात घेत नाहीत म्हणून त्याने एकदाही निवडसमिताला बोल लावले नाहीत. २००८ मध्ये बांगलादेश दौऱ्यात वनडेसाठी मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने अमलाला खेळवण्यात आलं. टेस्ट पदार्पणाच्या चार वर्षांनंतर अमला वनडे खेळू लागला.
 
अविश्वसनीय वाटेल परंतु वनडेतली अमलाची कामगिरी विराट कोहलीला टक्कर देणारी आहे. उशीरा मिळालेल्या संधीचं सोनं करत अमलाने सगळ्यांत जलद २,०००-३,०००-४,०००-५,०००-६,०००-७,००० धावांचा टप्पा गाठला. वनडे अमला आणि सातत्य हे समानार्थी शब्द झाले होते. वनडेत दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम अमलाच्या नावावर आहे.
 
अमलाच्या त्या भरघोस दाढीची क्रेझ चाहत्यांमध्ये पसरली होती. आफ्रिकेच्या मॅचवेळी मुंडावळ्यांप्रमाणे गळ्यात दाढी अडकवलेले चाहते हटकून दिसायचे.
 
अमला ट्वेन्टी-२० आणि नंतर आयपीएलही खेळला. ओल्ड स्कूल थॉट पद्धतीचा माणूस भक्कम बेसिक्सच्या जोरावर स्वत:ला कुठेही सिद्ध करू शकतो हे अमलाने दाखवून दिलं. धर्मनियमांमध्ये बसत नाही म्हणून अमला दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं स्पॉन्सर असलेल्या कंपनीचा लोगो वापरत नसे.
 
धर्माचरणाचा बाऊ न करता विविधांगी संस्कृतीचं प्रतीक असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा अविभाज्य भाग होत अमलाने सहिष्णूतेचा वस्तुपाठ सादर केला.
 
बहुतांश क्रिकेटपटू स्वॅग आणि पॉप्युलर कल्चरचा भाग होत असताना अमला नीरव शांततेचं प्रतीक होतं. म्हणूनच जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या लाटेत तो सहभागी झाला नाही. त्याच्या खेळात, वागण्याबोलण्यात आणि एकूणच व्यक्तिमत्वात लोभसवाणी शांतता भरून राहिली आहे, असं वाटायचं.
 
गेल्या दोन वर्षांपासून अमला नावाचा बुरुज ढासळू लागला होता. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेच्या अनुनभवी संघाने आफ्रिकेला कसोटी मालिकेत धूळ चारली. त्यावेळी अमला संघाला तारू शकला नाही.
 
वर्ल्ड कपसाठी त्याला घेऊ नये, असा सूर असताना त्याचा समावेश करण्यात आला. वर्ल्ड कपदरम्यान जोफ्रा आर्चरचा बॉल अमलाच्या हेल्मेटला जाऊन थडकला. तत्क्षणी हा आपला अमला राहिला नाही हे चाहत्यांच्या लक्षात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या भरकटलेल्या वर्ल्ड कपवारीसह अमला नावाचं चिंतनशील पर्व इतिहासाचा भाग झालं.