इंग्रज नसते तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य असतं : शशी थरूर
"इंग्रज भारतात आले नसते, तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं," असं वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केरळमधील थिरूवअनंतपुरमधल्या 'मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ लेटर्स' या कार्यक्रमात शशी थरूर यांनी भाषण केलं होतं.
यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जर व्यापारी बनून आलेले इंग्रज भारतात आलेच नसते, तर भारत आजच्यासारखाच राहिला असता का?
एका विद्यार्थिनीने भाषणानंतर हा प्रश्न थरूर यांना विचारला होता.
त्यावर उत्तर देताना शशी थरूर यांनी म्हटलं की, "इंग्रज नसते तर भारतावर आज छत्रपतींचं शासन अन् मराठ्यांचं राज्य असतं. मराठ्यांचं सामाज्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर ते पार दिल्लीपर्यंत पसरलं होतं."
"मी जेव्हा जगाच्या आणि भारताच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा भारतीय उपखंडावर मराठ्यांचंच नियंत्रण होतं, तेच कारभार पाहत होते, हे लक्षात येतं. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांमधील महान राजे होते," असंही त्यांनी म्हटलंय.