रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मँचेस्टर येथील सामन्यात कुणाचं पारडं जड?

सेमी फायनलचं तिकीट पक्कं करण्यासाठी आतूर टीम इंडियाचा मुकाबला आता वेस्ट इंडिजशी आहे.
 
टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नमवलं आहे. तर न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती.
 
टीम इंडियाला सेमी फायनलसाठी अजूनही दोन विजयांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे. मात्र अन्य संघांची सेमी फायनलची वारी अद्याप पक्की झालेली नाही.
 
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रवास मॅचगणिक अवघड होत चालला आहे. वेस्ट इंडिजने सहापैकी केवळ एक मॅच जिंकली आहे. चार मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांची यापूर्वीची मॅच ते अवघ्या पाच धावांनी हरले होते. सेमी फायनल त्यांच्यासाठी अवघड आव्हान आहे.
 
राहुल-विराट-रोहितवर भिस्त
लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटावर टीम इंडियाची मोठी भिस्त आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची मधली फळी ढेपाळली होती.
 
राहुलने चांगली सुरुवात केली मात्र रिव्हर्स स्वीपचा मोह त्याला आवरला नाही आणि तो आऊट झाला. रोहित शर्मा मुजीबच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला होता. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. तो मोठी खेळी साकारणार अशी चिन्हं असतानाच तो आऊट झाला.
 
वेस्ट इंडिजविरुद्ध या तिघांची भूमिका मोलाची आहे. मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर या तिघांना मोठी खेळी साकारावी लागेल.
 
धोनी-केदार वेगवान होणार का?
अफगाणिस्तानविरुद्ध महेंद्रसिंग धोनीने 52 चेंडूत 28 धावांची संथ खेळी केली होती. धोनी आणि केदार जाधव एकत्र खेळत असताना दहा ओव्हर्सच्या कालावधीत एकाही चौकाराची नोंद झाली नाही. हे दोघे खेळत असताना स्ट्राईक रोटेट होणंही कठीण झालं होतं.
 
सचिन तेंडुलकरने या दोघांच्या खेळावर टीका केली होती. मधल्या फळीला आणखी आश्वासक खेळ करावा लागेल असं सचिनने म्हटलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये या दोघांवर चाहत्यांचं लक्ष असेल.
 
विजय शंकर स्थान टिकवणार का ऋषभ पंतला संधी मिळणार?
चौथ्या स्थानासाठी विजय शंकरच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीने त्याला बॉलिंग दिली नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगचा विचार करता विजय शंकर संघात स्थान टिकवण्याची शक्यता आहे.
 
शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला. ऋषभ पंतला संधी मिळावी अशी चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. मात्र केवळ पाच वनडेंचा अनुभव असणाऱ्या ऋषभला दडपणाच्या लढतीत खेळवण्यात येणार का हा प्रश्न आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ऋषभ प्रसिद्ध आहे.
 
कुलदीपऐवजी रवींद्र जडेजा?
कुलचा अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या जोडीपैकी चहलने सातत्याने विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र कुलदीपच्या गोलंदाजीवर बॅट्समन रन घेताना दिसत आहेत. कुलदीपच्या तुलनेत बॅटिंग आणि फिल्डिंग या दोन्ही आघाड्यांवर रवींद्र जडेजा अव्वल आहे. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी रवींद्र जडेजाला संघात संधी मिळू शकते.
 
आंद्रे रसेलची उणीव भासणार
दुखापतीसह खेळणाऱ्या ऑलराऊंडर आंद्रे रसेलचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात आला आहे. रसेलच्या जागी सुनील अंबरीसची संघात निवड करण्यात आली आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध रसेल यंदाच्या स्पर्धेत खेळताना दुखापतीसह खेळत असल्याचं स्पष्ट झालं होतं. रसेल फिट होईल अशी संघव्यवस्थापनाला आशा होती. मात्र दुखापत बरी होणार नसल्याने रसेल वर्ल्ड कप बाहेर गेला आहे.
 
वेगवान गोलंदाजी वेस्ट इंडिजला तारणार का?
शेल्डॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच आणि जेसन होलडर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना या वेगवान माऱ्यापासून सावधान राहावं लागेल. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागू शकतो.
 
वेस्ट इंडिजने सहा मॅच खेळल्या असून आतापर्यंत केवळ एक मॅच जिंकली आहे. चार मॅचेसमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांचे फक्त 3 गुण झाले असून, सेमी फायनलमध्ये स्थान त्यांच्यासाठी दुरापास्त आहे. सन्मान वाचवण्यासाठी ते उर्वरित मॅचेस खेळू शकतात.
 
चांगला खेळ करून सेमी फायनलच्या शर्यतीत असणाऱ्या टीम्सना ते दणका देऊ शकतात.
 
या वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा ख्रिस गेलने केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गेलला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. शेवटच्या काही लढतींमध्ये दिमाखदार कामगिरी करण्यासाठी गेल उत्सुक आहे. गेलच्या बरोबरीने हेटमेयर, शे होप, कार्लोस ब्रेथवेट, एव्हिन लुईस, निकोलस पूरन हे जोरदार फटकेबाजी ओळखले जातात. त्यांना रोखणं टीम इंडियासमोरचं आव्हान आहे.
 
हेड टू हेड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आठ मॅचेस झाल्या आहेत. यामध्ये भारतीय संघ 5-3 असा आघाडीवर आहे.
 
खेळपट्टी आणि वातावरण
वातावरण कोरडं आणि लख्ख सूर्यप्रकाशमय असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची आहे.
 
संघ
भारत:
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
 
वेस्ट इंडिज:
जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिस, शे होप, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, फॅबिअन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रेथवेट, ख्रिस गेल, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस, अॅशले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, ओशाने थॉमस.