सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (17:25 IST)

जयंत पाटील हे शरद पवार यांचे सगळ्यांत विश्वासू सहकारी म्हणून पुढे येत आहेत का?

दीपाली जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी सरकारवर संकट आलं की हल्ली जयंत पाटील हा एकच चेहरा पक्षाचं आणि सरकारचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे येताना दिसतो.
मग तो सचिन वाझे यांच्या अटकेचा विषय असो किंवा धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण असो. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की बड्या नेत्यांची रांग लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील उडी मारून पुढे येऊन बसलेत का?
"गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते गृहमंत्री म्हणून व्यवस्थित काम करत आहेत," राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा फेटाळताना दिलेली ही प्रतिक्रिया.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू ठामपणे मांडली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणातही जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीआधीच राजीनाम्याचे वृत्त फेटाळले होते.
"जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणे योग्य ठरणार नाही," असं जयंत पाटील म्हणाले होते.
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्येही जयंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषत: अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे शरद पवार यांचे सर्वाधिक विश्वासू नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं.
जयंत पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदामंत्री आहेत. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते आहेत. शिवाय, विधानसभेचे गटनेते पदही त्यांच्याकडे आहे. यावरूनही त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थान स्पष्ट होते.
जानेवारी महिन्यात 'राष्ट्रवादी परिवार संवाद' असा दौरा काढला होता. अठरा दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी 14 जिल्हे आणि 82 मतदारसंघ असा दौरा केला. पक्ष संघटनावाढीसाठी हा दौरा होता असंही ते म्हणाले होते.
तेव्हा जयंत पाटील हे आताच्या घडीला शरद पवार यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत का? महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर त्यांचे पक्षांतर्गत महत्त्व कसे वाढले? अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचे संबंध कसे आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. याचाच आढावा आपण घेणार आहोत.
 
शरद पवार यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी?
जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आघाडी सरकारच्या काळात ते ग्रामविकासमंत्री होते.
2008 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार आला
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी स्पर्धेत अनेक नेते होते. धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील अशा नेत्यांची नावं चर्चेत होती. पण जयंत पाटील यांनी निवड झाली.
राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तसंच निवडणुका तोंडावर असल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान होते.
विधानसभा निकालानंतर राजकीय गणितं बदलली आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. पण सत्तास्थापनेच्या घडामोडीतही जयंत पाटील वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडत होते.
 
अजित पवारांच्या बरोबरीचे नेते?
आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील हे बरोबरीचे नेते आहेत असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात.
"आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या फळीत अनेक नेत्यांचे वर्चस्व होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील अशी अनेक नावं आहेत. पण आता परिस्थिती बदलली आहे. शरद पवार यांच्या सर्वाधिक जवळ असणारे नेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले जाते," असंही विजय चोरमारे सांगतात.
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वेळी एक घटना घडली आणि त्याचाच जयंत पाटील यांना फायदा झाला असंही जाणकार सांगतात.
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अजित पवार यांनी 80 तासांसाठी शरद पवार यांची साथ सोडली. हा पवार कुटुंबासाठी धक्का होता. यामुळे दोघांमध्ये विश्वासाची एक गॅप आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जी गॅप तयार झाली त्याचा फायदा जयंत पाटील यांना झाला. त्यांनी ती पोकळी भरून काढली असं म्हणता येईल."
ते पुढे सांगतात, "जयंत पाटील हे हुशार, चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत डॅमेज कंट्रोल कसं करायचं हे त्यांना चागलं ठाऊक आहे. पूर्वी आर. आर. पाटील सुद्धा अशीच भूमिका मांडायचे."
 
'बॅलेन्सिग पॉवर'चे राजकारण?
24 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महिन्याभरातच अजित पवार यांनी आपल्याच 'राष्ट्रवादी'विरुद्ध बंड केलं आणि पवार कुटुंबात उभी फूट पाडली.
या घटनेनंतर शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न वारंवार विचारला जातो.
23 नोव्हेंबर 2019 रोजी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, "सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे आणि राष्ट्रीय राजकारणातच त्यांना रस आहे."
ही पक्षाची रचना आहे असं वेळोवेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी पक्षातले सुप्रिया सुळे यांचे महत्त्वाचे आणि ताकदीचे स्थान नाकारता येणार नाही.
"जयंत पाटील यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघांशीही चांगले संबंध आहेत. विशेषत: सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात चांगला समन्वय आहे," असं सुधीर सूर्यवंशी सांगतात.
शरद पवार यांचे राजकारण कायम 'बॅलेंन्सिग पॉवर'चे राहिले आहे असंही ते सांगतात.
"म्हणजे सत्ताकेंद्र केवळ एक नेता असू नये याकडे त्यांनी कायम लक्ष दिले. पक्षातला एखादा नेता अधिक ताकदवर असेल तर तेवढ्याच ताकदीचा दुसरा पर्यायी नेता उभा करायचा. तेव्हा जयंत पाटील यांचे स्थान सुद्धा असेच आहे. ते पक्षातील एक ताकदीचे नेते बनतील याकडे शरद पवार यांनीही लक्ष दिले," सूर्यवंशी सांगतात.
माध्यमं आणि जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यासाठी म्हणूनही जयंत पाटील आघाडीवर असतात. गेल्या वर्षभरात सरकार आणि पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेषत: अडचणीच्या काळात जयंत पाटील यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते.
"याचे कारण म्हणजे शरद पवार जेवढे खंबीर दिसतात तेवढेच जयंत पाटीलही संयमी आणि खंबीर दिसतात. ते पक्षाची बाजू ठामपणे मांडतात. त्यात अजित पवार यांचा स्वभाव. ते माध्यमांशी जास्त बोलत नाहीत. जयंत पाटील तुलनेने पक्षाची बाजू चांगली मांडतात. शरद पवारांच्या अपेक्षेनुसार पक्ष नेतृत्वाने जसं वागायला आणि बोलायला पाहिजे तसे जयंत पाटील आहेत. ही त्यांच्या आणखी एक जमेची बाजू आहे," असं सूर्यंवंशी सांगतात.
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पदाधिकारी, महामंडळ यांच्या नियुक्त्या जयंत पाटील करतात.
"अशा नियुक्त्या करत असताना अनेकदा नेत्यांकडून, मंत्र्यांकडून नावांच्या शिफारशी येत असतात. पण जयंत पाटील यांनी अजित पवारांनी सुचवलेली नावंही नाकारली आहेत असंही सांगितलं जातं," असं सूर्यवंशी यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील हे एकमेव नेते आहेत ज्यांच्याकडे पक्षातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार आहेत. विशेषत: प्रदेशाध्यक्षपद असताना त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदही आहे.