शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (08:08 IST)

हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट- शरद पवार

“राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेनं दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधान परिषदेतील १२ रिक्त जागांसाठी नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मात्र, यावर राज्यपालांकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही. यावर शरद पवार यांनी राज्यपालावर निशाणा साधला आहे. 
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते, हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं, हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायेत आणि असे असताना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे,” असं शरद पवार म्हणाले.