मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (20:36 IST)

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष : गाझा सीमेवर इस्रायलने तैनात केलं अधिक सैन्य आणि रणगाडे

इस्रायलने गाझा सीमेवर रणगाडे आणि सैन्य तैनात केलंय. पॅलेस्टाईनसोबतचा संघर्ष अजूनही सुरूच असल्याने जमिनीवरूही हल्ले सुरू करावेत का, याचा विचार करण्यात येतोय.
 
गुरुवारीही  दिवसभर पॅलेस्टाईन कट्टरवादी आणि इस्रायलमधला संघर्ष सुरूच होता. पॅलेस्टाईन कट्टरतावाद्यांनी रॉकेट्सचा मारा केला तर इस्रायलच्या सैन्यानेही त्याला हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर दिलं.
या हल्ल्यांमुळे गाझामध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले असून इस्रायलमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय.
 
इस्रायलमध्ये ज्यू आणि अरब गटांमध्येही दंगली सुरू आहेत आणि यामुळे देशांतर्गत यादवी युद्ध पेटण्याची शक्यता असल्याचा इशारा राष्ट्रपतींनी दिलाय.
ही अंतर्गत अशांतता मिटवण्यासाठी संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी सुरक्षा यंत्रणांची मोठी कुमक तैनात केली असून आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे.
 
तर गुरुवारी इस्रायलने गाझा सीमेजवळ पायदळाच्या दोन तुकड्या आणि एक सशस्त्र दल तैनात केलं. यासोबतच सैन्याच्या राखीव दलातल्या 7,000 जणांना बोलवून घेण्यात आल्याचंही वृत्त आहे.
हा संघर्ष सध्या हवाई हल्ल्यांद्वारे होतोय आणि जमीन पातळीवरहूनही हल्ले सुरू करायचे का याविषयीचा निर्णय अजून झालेला नाही.
 
अशा प्रकारचे हल्ले आक्रमकपणे लगेच करावेत, असा प्रस्ताव इस्रायली सैन्याकडून मांडला जाण्याची अपेक्षा आहे, पण याला लष्कर प्रमुख आणि सरकारी पातळीवरील विविध मंजुरी मिळावी लागेल.
 
गेले 4 दिवस गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष हा 2014 पासूनचा सर्वांत भयानक आहे. पूर्व जेरुसलेममध्ये इस्रायली आणि पॅलेस्टाईन गटांमध्ये झालेल्या झटापटींपासून याला सुरुवात झाली होती. त्याचं रूपांतर पॅलेस्टाईनकडून होणारा रॉकेट्सचा मारा आणि इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये झालेलं आहे.