शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (18:58 IST)

आदित्य ठाकरेंचे मित्र झिशान सिद्दिकी अचानक शिवसेने विरोधात एवढे आक्रमक का झालेत?

मयांक भागवत
मातोश्रीच्या अंगणातच कोरोना लसीकरणाच्या राजकारणावरून ठाकरे सरकारमध्ये वादाची ठिणगी पडलीय. लसीकरण केंद्रावर शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या पोस्टरबाजीमुळे, शिवसेना विरुद्ध कॉँग्रेस वाद पेटायला.
 
शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी नाराज झालेत. "कोरोनाविरोधी लस शिवसेना नेते घरी बनवतात का?" अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
वांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा हा बालेकिल्ला त्यांच्या हातातून निसटलाय. त्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेली पालिका निवडणूक पहाता, मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेने जोर लावायला सुरूवात केलीय.
शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस वाद आहे काय?
हा वाद पेटला तो कोरोना लसीकरण केंद्राबाहेर शिवसेनेने केलेल्या पोस्टरबाजीमुळे. गुरूवारी वांद्रे पूर्व भागात लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक कॉंग्रेस आमदार झिशान सिद्धीकी नाराज झाले.
 
ते म्हणाले, "लसीकरण केंद्रावर लस कमी आणि नेत्यांचे पोस्टर्सच जास्त आहेत."
 
शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते.
"शिवसेनेने पार्टी फंडमधून लस खरेदी केली आहे का? महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाव कुठे आहेत? सगळीकडे फक्त शिवसेनाच का," असा सवाल झिशान यांनी उपस्थित केला.
 
'पोस्टरबाजी कशाला हवी'
मुंबईत कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून शिवसेना नेते, कार्यकर्ते आणि महापौर किशोरी पेडणेकर शहरातील विविध भागात लसीकरण केंद्राचं उद्घाटन करताना दिसून येत आहेत. झिशान यांनी लसीकरणाच्या या श्रेय्यवादावरही प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणतात, "ही पोस्टरबाजी हवीच कशाला. महामारीशी लढण्याची वेळ आहे. लोकांचा मृत्यू होतोय. पण, वांद्रेपूर्वमध्ये उत्सवासारखे पोस्टर्स लावण्यात आले आहेत."
 
कोरोनासंसर्गावर नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलाय. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. पण, शिवसेना नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते घराबाहेर पडत आहेत. "लसीकरण केंद्रावर 50-100 लोक एकत्र होतात. फोटो काढतात. हे कायद्याचं उल्लंघन नाही का," असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
 
अनिल परब कामात अडथळा आणतात - झिशान सिद्दिकी
झिशान यांनी शिवसेना नेत्यांवर लसीकरणाच्या मुद्यावरून केलेली ही पहिली टीका नाही.
 
काही दिवसांपूर्वी, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलं. स्थानिक आमदार असूनही मला बोलावण्यात आलं नाही, असं म्हणत झिशान यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती.
"अनिल परब माझ्या कामात अडथळा निर्माण करतात. माझ्या कामात दबाव आणला जातो. पालिकेकडून मदत केली जात नाही. लोकांचा पाठिंबा मला आहे, हे अनिल परब यांनी समजावं," असा थेट आरोप झिशान यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
 
झिशान यांनी अनिल परबांवर थेट आरोप करण्यामागचं कारण सांगताना, महानगरचे संपादक संजय सावंत म्हणतात, "अनिल परब मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं म्हणजे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं आहे."
 
शिवसेनाची भूमिका
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी झिशान प्रकरण माहीत नाही, असं म्हणत प्रतिक्रिया देण्यास टाळलं.
तर, शिवसेना आमदार मनिषा कायंदे म्हणतात, "शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पालिकेच्या कार्यक्रमांना त्यांना बोलावलं जातं. त्यामुळे स्थानिक नगरसेवक त्याठिकाणी हजेरी लावतात."
 
"झिशान लोकप्रतिनिधी आहेत. मुंबई महापालिका स्तुत्य उपक्रम करत आहे. त्यांनीदेखील पालिकेला हातभार लावून सहकार्य करावं. ही वेळ मानापमानाची नाही," असं त्या पुढे म्हणाल्या.
 
वांद्रेपूर्व मतदार संघाचं राजकारण
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान वांद्रेपूर्व मतदारसंघात आहे. एकेकाळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.
 
दिवंगत शिवसेना नेते बाळा सावंत यांनी 2009 आणि 2014 मध्ये वांद्रेपूर्वची विधानसभा निवडणूक जिंकली होती. 2015 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी तत्कालीन कॉंग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव करत निवडणूक जिंकली.
 
पण, 2019 मध्ये शिवसेनेने तृप्ती यांना तिकीट दिलं नाही. माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांना निवडणुकीत उभं केलं. तृप्ती विरोधात उभ्या राहिल्या. शिवसेनेच्या मतांचं विभाजन झालं आणि कॉंग्रेसचे झिशान सिद्धीकी आमदार म्हणून निवडून आले.
 
हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून निसटलाय. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे. राजकीय जाणकार सांगतात, "ज्या भागात मुख्यमंत्री रहातात. त्याठिकाणी आमदार आपला असावा अशी राजकीय धारणा असते." त्यामुळे शिवसेना जोरदार प्रयत्न करतेय.
2019 नंतर तृप्ती सावंत आणि नारायण राणेंनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजपच्या कात्रीत सापडली असल्याचं राजकीय जाणकारांच मत आहे.
 
राजकीय जाणकार सांगतात, वांद्रेपूर्व मध्ये मुस्लिम आणि दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. 1999 आणि 2004 मध्ये कॉंग्रेसचा आमदार या ठिकाणहून निवडून आला होता.
 
झिशान एवढे आक्रमक का?
शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये मातोश्रीच्या अंगणात सुरू झालेल्या वादावर बोलताना संजय सावंत पुढे म्हणतात, "झिशानच्या टिकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. कॉंग्रेसचे इतर नेते, मंत्री वारंवर शिवसेनेविरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत."
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या आरोपांचं टायमिंग महत्त्वाचं आहे.
 
"आत्ताच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना आणि महापालिकेच्या कार्यपद्धतीवर घटकपक्ष नाराज आहेत. आघाडीच्या नेत्यांमध्ये घुसपूस वाढलीये. मतहापालिकेतही नाराजीचा सूर वाढतोय. त्यामुळे झिशान यांच्या आरोपांना बळकटी येते," असं संजय सावंत पुढे सांगतात.
झिशान सिद्धीकी आणि युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. असं असूनही झिशान शिवसेनेविरोधात उघडपणे नाराजी का व्यक्त करत आहेत. यावर मुक्त पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रृती गणपये म्हणतात, "झिशान सिद्धीकी यांची नाराजी हा स्थानिक राजकारणाचा भाग आहे."
 
"हे तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे, प्रत्येक आमदार मतदारसंघ टिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे, नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे."