टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या काही महत्त्वाच्या मागण्या
करोनाच्या संकटाशी राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था दोन हात करत असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचं नवं संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजारामुळे आणि त्यावरच्या महागड्या उपचारांमुळे नागरिकांमध्ये देखील भितीचं वातावरण निर्माण झालेलं असताना महाराष्ट्र सरकराने या आजारावर राज्यात मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे आधीच करोनाशी लढा देणाऱ्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, या आजारावरच्या औषधांचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीविषयी हर्ष वर्धन यांना माहिती दिली. “महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजाराचे सुमारे १५०० रुग्ण असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढताहेत. त्यावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. तसेच, या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा. ज्या कंपन्या त्याचे उत्पादन करतात त्यांना ते वाढविण्याचे निर्देश द्यावेत”, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासन मोहिम हाती घेईल, केंद्रशासनाने देखील त्यामध्ये सहभागी होऊन जनजागृतीसाठी मोहीम घेण्याचे आवाहन यावेळी केले.