शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : रविवार, 6 जून 2021 (19:54 IST)

कोहिनूर : मुघलांच्या दरबारातून थेट टॉवर ऑफ लंडनपर्यंत कसा पोहोचला हा मौल्यवान हिरा?

रेहान फजल
29 मार्च 1849...किल्ल्याच्या मधोमध असलेल्या आरसे महालात 10 वर्षांच्या महाराजा दलीप सिंह यांना आणण्यात आलं. त्या मुलाचे वडील महाराजा रणजित सिंह यांचं दहा वर्षांपूर्वी निधन झालं होतं. दलीप सिंह यांची आई राणी जिंदन कौर यांना जबरदस्तीने शहराच्या बाहेर असलेल्या दुसऱ्या एका महालात पाठविण्यात आलं होतं.
 
दलीप सिंह यांच्या चारी बाजूंनी लाल कोट आणि हॅट घातलेले ब्रिटीश सैनिक उभे होते. थोड्याच वेळात दलीप सिंह यांनी आपल्या दरबारातील काही सरदारांसमोर एका दस्तावेजावर सही केली. कित्येक वर्षं ब्रिटीश सरकारला या क्षणाची प्रतीक्षा होती.
 
पुढच्या काही मिनिटांमध्येच लाहोरच्या किल्ल्यावर फडकणारा शिखांचा झेंडा खाली उतरवण्यात आला आणि त्याची जागा ईस्ट इंडिया कंपनीच्या झेंड्याने घेतली. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीला केवळ शिखांच्या साम्राज्यावरच प्रभुत्व मिळालं नाही, तर जगातील सर्वांत प्रसिद्ध असा कोहिनूर हिरासुद्धा त्यांच्या ताब्यात आला.
 
अंड्याच्या आकाराचा हिरा
कोहिनूरबद्दल सांगितलं जातं की, तुर्कांनी दक्षिण भारतातील एका मंदिरातल्या मूर्तीच्या डोळ्यातून हा हिरा काढला असावा.
कोहिनूर द स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड या पुस्तकाचे लेखक विल्यम डेलरेम्पल म्हणतात, "कोहिनूर हिऱ्याचा पहिला अधिकृत उल्लेख 1750 मध्ये फारसी इतिहासकार मोहम्मद मारवी यांनी नादिरशाहच्या भारतभेटीविषयी लिहिलेल्या वर्णनात आला आहे. मारवी लिहितात की, त्यांनी आपल्या डोळ्यांनी कोहिनूर पाहिला होता.
हा हिरा त्यावेळी 'तख्ते-ताऊस' म्हणजेच मयूर सिंहासनाच्या वरच्या भागात जडवला होता. नादिरशाह तो दिल्लीहून लुटून इराणला घेऊन गेले होते. कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचा हा हिरा होता, जो विकून सगळ्या जगातील लोकांना अडीच दिवसाचं जेवण दिलं जाऊ शकतं, असं म्हटलं जायचं.
 
मयूर सिंहासन बनविण्यासाठी ताजमहालाच्या बांधकामापेक्षाही दुप्पट खर्च आला होता. त्यानंतर हा हिरा या सिंहासनामधून काढण्यात आला, जेणेकरून नादिरशाह हा हिरा आपल्या दंडावर बांधू शकेल."
 
नादिरशाहने दिल्लीत घडवल्या हत्या
नादिरशाहने कर्नालजवळ केवळ दीड लाख सैनिकांच्या जोरावर मुघल बादशाह मोहम्मद शाह रंगीलाच्या दहा लाखांच्या सैन्याचा पराभव केला होता. दिल्लीत पोहोचल्यावर नादिरशाहने प्रचंड रक्तपात घडवला. इतिहासात अशा हिंसाचाराची उदाहरणं खूप कमी आहेत.
 
प्रसिद्ध इतिहासकार सर एचएम ईलियट आणि जॉन डोसन आपल्या 'द हिस्ट्री ऑफ इंडिया एज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स' या पुस्तकात लिहितात, "नादिरशाहच्या चाळीस हजार सैनिकांनी दिल्लीत प्रवेश केल्यानंतर धान्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले होते. नादिरशाहच्या सैनिकांनी मोलभाव करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यात आणि दुकानदारांमध्ये झटापट सुरू झाली. लोकांनी सैनिकांवर हल्ला चढवला.
 
दुपारपर्यंत नऊशे इराणी सैनिक मारले गेले होते. त्यानंतर नादिरशाहने दिल्लीतील लोकांच्या हत्येचा आदेश दिला. त्यानंतर लोकांच्या शिरकाणाला सुरूवात झाली. लाल किल्ला, जामा मशीद, दरीबा आणि चाँदनी चौकाच्या आसपासच्या भागात सर्वाधिक लोक मारले गेले. एकूण तीस हजार लोकांची हत्या करण्यात आली."
 
इतिहासकार विल्यम फ्लोअर आपल्या 'न्यू फॅक्टस ऑफ नादेर शाज इंडिया कॅम्पेन' या पुस्तकात लिहितात की, "मोहम्मद शाहचे सेनापति निजामुल मुल्क डोक्यावर पगडी न घालता नादिरशाहसमोर गेले. त्यांचे दोन्ही हात पाठीमागे पगडीच्याच कापडाने बांधलेले होते. त्यांनी नादिरशाहसमोर गुडघे टेकून विनवणी केली की, दिल्लीच्या लोकांवर सूड न उगवता जी काही शिक्षा असेल ती आपल्याला द्यावी.
 
त्यावर नादिरशाहने त्यांच्यासमोर एक अट ठेवली. दिल्ली सोडण्याआधी आपल्याला शंभर कोटी रुपये दिले जावेत या अटीवर नादिरशाहने दिल्लीकरांचं शिरकाण थांबवलं. पुढच्या काही दिवसांमध्ये निजामुल मुल्कनं आपल्याच राजधानीमध्ये लुटालूट करून ही रक्कम दिली. थोडक्यात सांगायचं म्हणजे 348 वर्षांपासून मुघलांनी जमा केलेल्या संपत्तीची मालकी एका क्षणात दुसऱ्या कोणाकडे तरी गेली होती."
 
नादिरशाहनं पगडी बदलून कोहिनूर हस्तगत केला
विल्यम डॉलरेम्पल आणि अनीता आनंद यांनी कोहिनूरचा इतिहास शोधून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. डॉलरेम्पल सांगतात की, "मी मुघल रत्नांच्या तज्ज्ञांशी चर्चा करून आमच्या शोधाची सुरूवात केली. अनेकांच्या मते कोहिनूरच्या इतिहासाबद्दल ज्या गोष्टी सामान्यपणे प्रचलित आहेत, त्यात काही तथ्यं नाहीये. कोहिनूर नादिरशाहने हस्तगत केला आणि त्यानंतरच या हिऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं."
 
थिओ मेटकाफ लिहितात की, मोहम्मद शाहच्या दरबारातील एका नर्तकीनं फितुरी केली आणि नादिरशाहाला सांगितलं की, मोहम्मद शाहनं कोहिनूर आपल्या पगडीत लपवून ठेवला आहे. त्यानंतर नादिरशाहानं मोहम्मद शाहला आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून आपण पगड्यांची अदलाबदल करू असं सुचवलं.
 
अशारितीने कोहिनूर नादिरशाहला मिळाला. जेव्हा त्याने कोहिनूर पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्याची नजरच या हिऱ्यावरून हटत नव्हती. त्यानंच या हिऱ्याला 'कोहिनूर' म्हणजेच 'प्रकाशाचा पर्वत' असं नाव दिलं.
दिल्लीत मिळालेली लूट अफगाणिस्तानात घेऊन जातानाचं वर्णन फारसी इतिहासकार मोहम्मद काझिम मारवी यांनी आपल्या 'आलम आरा-ए-नादरी' पुस्तकात लिहिलं आहे. मारवी यांनी लिहिलं आहे, "दिल्लीत 57 दिवस राहिल्यानंतर 16 मे 1739 ला नादिरशाह आपल्या मायदेशी परत जायला निघाला. आपल्या सोबत त्यानं मुघलांनी पिढ्या न् पिढ्या जमा केलेली संपत्तीही नेली. यामध्येच मयूर सिंहासनही होतं. याच सिंहासनावर कोहिनूर तसंच तैमूरचं माणिक जडवलेलं होतं.
 
लुटलेला सर्व खजिना 700 हत्ती, 400 उंट आणि 17 हजार घोड्यांवर लादून इराणला नेण्यात आला. जेव्हा सर्व लष्कर चिनाब नदीचा पूल ओलांडून पलीकडे पोहोचलं, तेव्हा प्रत्येक सैनिकाची झडती घेण्यात आली. अनेक सैनिकांनी जप्त केले जातील या भीतीने स्वतःजवळचे हिरे जमिनीत गाडले. काहींनी नदीत फेकले. आपण परत येऊन ते काढून घेऊन जाऊ अशी आशा त्यांना होती."
 
महाराजा रणजीत सिंहांकडे कसा पोहोचला कोहिनूर?
नादिरशाहाकडेही कोहिनूर खूप काळ टिकू शकला नाही. त्यांच्या हत्येनंतर हा हीरा त्याचा अफगाण अंगरक्षक अहमद शाह अब्दालीकडे आला आणि त्यानंतर या राजाकडून त्या राजाकडे झालेला या हिऱ्याचा प्रवास 1813 मध्ये महाराजा रणजीत सिंहांकडे येऊन थांबला.
भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयातील माहितीनुसार, 'महाराजा रणजीत सिंह दिवाळी, दसरा यांसारख्या मोठ्या सणांच्या वेळेस आपल्या दंडावर हा हिरा बांधायचे. जेव्हा कोणी ब्रिटीश अधिकारी त्यांच्या दरबारात यायचा तेव्हा त्याला आवर्जून हा हिरा दाखवला जायचा. ते मुलतान, पेशावर किंवा दुसऱ्या शहरांच्या दौऱ्यावर जायचे, तेव्हाही कोहिनूर त्यांच्या सोबत असायचा.'
1839 मध्ये रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. सत्ता संघर्षानंतर 1843 मध्ये पाच वर्षांचे दलिप सिंह यांना राजा बनविण्यात आलं. मात्र दुसऱ्या अँग्लो-शिख युद्धामध्ये इंग्रजांनी विजय मिळवला आणि शिखांचं साम्राज्य तसंच कोहिनूर हिऱ्याची मालकीही इंग्रजांकडे गेली. दलीप सिंह यांना त्यांच्या आईपासून वेगळं करण्यात आलं. त्यांना एका इंग्रज दाम्पत्यासोबत फतेहगढ किल्ल्यावर पाठवलं.
 
लॉर्ड डलहौसी स्वतः कोहिनूर घेण्यासाठी आले होते. या हिऱ्याचं वजन होतं 190.3 कॅरेट. लॉर्ड डलहौसी यांनी कोहिनूर जहाजामार्गे लंडनला पाठविण्याचा निर्णय घेतला. 'मेडिया' या जहाजातून हा हिरा महाराणी व्हिक्टोरिया यांना पाठविण्याचं ठरलं. त्या जहाजाला वाटेत अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
 
कोहिनूर घेऊन जाणाऱ्या जहाजासमोर अनेक अडचणी
'कोहिनूर द स्टोरी ऑफ वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड' या पुस्तकाच्या सहलेखिका अनिता आनंद सांगतात, की कोहिनूर जेव्हा जहाजावर पोहोचवण्यात आला, तेव्हा जहाजाच्या चालकांना आपण काय घेऊन चाललो आहोत, याची जराही कल्पना नव्हती. "मेडिया जहाज इंग्लंडला जाण्यासाठी निघालं. प्रवासाच्या पहिल्या एक-दोन आठवड्यात कोणतीही अडचण आली नाही, पण नंतर काही लोक आजारी पडले. जहाजावर टायफॉइडची साथ आली. 'मॉरिशस जवळ येतंय, काळजी करू नका,' असं जहाजाच्या कॅप्टननं सगळ्यांना सांगितलं. तिथे आपल्याला औषधं आणि जेवण मिळेल. सर्व ठीक होईल, असं आश्वासन दिलं.
 
पण जहाज मॉरिशसला पोहोचेपर्यंत जहाजावरच्या रोगराईची बातमी तिथे पोहोचली होती.
मॉरिशसने धमकी दिली की, जहाज त्यांच्या किनाऱ्याच्या जवळ जरी आलं, तरी तोफांनी उडवून टाकू. अशापरिस्थितीत कसंतरी इंग्लंडला पोहोचूया असा विचार जहाजावरचे कर्मचारी करत होते. पण रस्त्यात त्यांना वादळालाही सामोरं जावं लागलं, ज्यामुळे जहाजाचं खूप नुकसान झालं. इंग्लंडला पोहोचल्यावर त्यांना कळलं की, आपण सोबत कोहिनूर घेऊन आलो होतो. कदाचित त्यामुळेच ही संकटं ओढावल्याचं त्यांना वाटलं."
 
लंडनमध्ये कोहिनूरचं अभूतपूर्व स्वागत
कोहिनूर जेव्हा लंडनमध्ये पोहोचला, तेव्हा क्रिस्टल पॅलेसमध्ये ब्रिटीश जनतेला पाहण्यासाठी तो ठेवण्यात आला.
 
विल्यम डलरॅम्पेल लिहितात, "कोहिनूर ब्रिटनला नेण्यात आल्यानंतर तीन वर्षं तो क्रिस्टल पॅलेसमध्ये प्रदर्शनात मांडण्यात आला. 'द टाइम्स'नं लिहिलं की, लंडनमध्ये लोकांची एवढी गर्दी कधीच पहायला मिळाली नव्हती. प्रदर्शन सुरू झालं तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता.
जेव्हा लोक इथं पोहोचले, तेव्हा त्यांना आत प्रवेश मिळविण्यासाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागलं होतं. हा हिरा पूर्वेमधल्या ब्रिटीश सत्तेचं, सामर्थ्याचं प्रतीक बनला."
 
महाराणी व्हिक्टोरिया यांना कोहिनूरची भेट
याच दरम्यान फतेहगढ किल्ल्यात राहणाऱ्या महाराज दलीप सिंह यांनी लंडनला जाऊन महाराणी व्हिक्टोरिया यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. महाराणी या भेटीसाठी तयार झाल्या. त्यावेळी दलीप सिंह यांनी महाराणी व्हिक्टोरिया यांच्याजवळ असलेला कोहिनूर हिरा त्यांनाच भेट दिला.
 
अनिता आनंद सांगतात, "महाराणी व्हिक्टोरिया सांगतात की, आपल्या साम्राज्यानं एका लहान मुलासोबत जे केलं त्याचं वाईट वाटायचं.
दलीप सिंह त्यांना मनापासून आवडायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत जे झालं, त्याचं महाराणी व्हिक्टोरिया यांना वाईट वाटलं."
 
"कोहिनूर हिरा दोन वर्षांपूर्वीच त्यांच्याकडे आला होता. मात्र त्यांनी सार्वजनिकरित्या तो परिधान केला नव्हता. त्यांना वाटायचं की, दलीपनं तो पाहिला, तर त्याला काय वाटेल," असं पुढे अनिता आनंद सांगतात.
 
फ्राँझ जेवर विंटरहॉल्टर हा त्याकाळचा एक प्रसिद्ध चित्रकार होता.
महाराणीने त्यांना दलीप सिंह यांचं एक चित्र बनवायला सांगितलं. हे चित्र त्यांना आपल्या महालात लावायचं होतं. दलीप सिंह जेव्हा बकिंगहॅम पॅलेसमधल्या व्हाइट ड्रॉइंग रुममधल्या मंचावर उभे राहिले, तेव्हा महाराणी व्हिक्टोरिया यांनी एक पेटी मागवली. त्यामध्ये कोहिनूर ठेवलेला होता.
 
त्यांनी दलीप सिंह यांना म्हटलं की, मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. दलीप यांनी कोहिनूर पाहिल्याबरोबर आपल्या हातात घेतला. खिडकीजवळ जाऊन उन्हात धरून पाहिला. कोहिनूर बदलला होता, त्याला तासण्यात आलं होतं.
पंजाबचे महाराज असताना दलीप सिंह जो कोहिनूर परिधान करायचे, तसा हा कोहिनूर अजिबातच दिसत नव्हता. थोडावेळ त्या कोहिनूरकडे पाहिल्यानंतर दलीप सिंह यांनी महाराणी व्हिक्टोरिया यांना म्हटलं की, 'युअर मॅजेस्टी, हा हिरा तुम्हाला भेट म्हणून देणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल.' व्हिक्टोरिया यांनी तो हिरा दलीप यांच्याकडून घेतला आणि आपल्या मृत्यूपर्यंत त्या तो घालत होत्या.
 
दलीप सिंह आईला भेटण्यासाठी भारतात पोहोचले
व्हिक्टोरियाचे अत्यंत निकटवर्तीय असताना सुद्धा काही वर्षांनी दलीप सिंह यांनी इच्छा बोलून दाखवली की, आपली खरी आई जिंदन कौर यांना भेटण्यासाठी भारतात जाऊ इच्छित आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना भारतात जाण्याची परवानगी दिली. जिंदन कौर तेव्हा नेपळमध्ये राहत होत्या. मुलासोबत भेट घडवून देण्यासाठी जिंदन कौर यांना कोलकात्यात आणलं गेलं.
 
अनिता आनंद सांगतात की, "दलीप तिथं आधीच पोहोचले होते. राणी जिंदन कौर यांना त्यांच्यासमोर आणलं गेलं. जिंदन कौर यांनी म्हटलं की, त्या आता कधीच त्यांची सोबत सोडणार नाहीत."
ते जिथे कुठे जातील, तिथे त्या सोबत जातील. तोपर्यंत जिंदन यांना नीट दिसत नव्हतं. त्यांनी जेव्हा दलीप सिंह यांच्या डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा त्यांना धक्का बसला की, त्यांनी केस कापले आहेत. दु:खानं त्या ओरडल्या. त्याचवेळी शिख सैनिक अफूच्या युद्धातील सहभागानंतर चीनहून परतत होते.
 
त्यांना जेव्हा कळलं की, जिंदन कलकत्त्यामध्ये आहेत, तेव्हा ते स्पेन्स हॉटेलबाहेर पोहोचले. त्यांनी मोठमोठ्याने 'बोलो सो निहाल, सत् श्री अकाल' अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यामुळे घाबरून जात इंग्रजी सैनिकांनी दोघा मायलेकांना जहाजात बसवून इंग्लंडला रवाना केलं.
 
दलीप सिंह यांची नाराजी
हळूहळू दलीप सिंह हे महाराणी व्हिक्टोरिया यांच्याविरोधात होत गेले. त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, अशी त्यांची धारणा होत गेली.
 
आपण आपलं साम्राज्य पुन्हा मिळवायचंच असं त्यांनी मनाशी ठरवलं. ते भारताकडे यायलाही निघाले. पण एडनच्या पुढे येऊ शकले नाहीत.
 
21 एप्रिल 1886 मध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पोर्ट सईदमध्ये अटक करण्यात आली. नंतर त्यांना सोडण्यात आलं, पण त्यांच्याकडून सर्व काही जप्त केलं गेलं होतं.
 
21 ऑक्टोबर 1893 ला पॅरिसच्या एका सामान्य हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातलं कोणीही नव्हतं. अशारीतीने महाराजा रणजित सिंह यांचा वंश नष्ट झाला.
 
कोहिनूर कुठे आहे?
महाराणी व्हिक्टोरिया यांच्यानंतर त्यांचे पुत्र महाराजा एडवर्ड सातवे यांनी कोहिनूर आपल्या मुकूटात लावला नाही. मात्र त्यांची पत्नी महाराणी अलेक्झांड्राच्या मुकुटात मात्र या हिऱ्याला स्थान मिळालं.
 
कोणत्याही पुरूषानं कोहिनूर वापरला तर तो उद्धवस्त होतो, अशी एक अंधश्रद्धाही या हिऱ्यासोबत जोडली गेली. मात्र महिला हा हिरा परिधान करू शकतात.
 
नंतर राजे पंचम जॉर्ज यांची पत्नी मेरी यांनीही आपल्या मुकुटात कोहिनूर वापरला. महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी मात्र कोहिनूर नाही वापरला. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडनच्या ज्वेल हाऊसमध्ये ठेवला आहे.