बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (15:15 IST)

महाशय धरमपाल गुलाटी: एकेकाळी टांगा चालवणारा तरुण कसा बनला मसाल्याचा शहेनशाह?

-ओंकार करंबेळकर
मसाला किंग या नावाने प्रसिद्ध असलेले MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी निधन झाले.
 
अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करत त्यांनी MDH मसाला कंपनीचे नाव सर्वदूर पोहचवले होते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
महाशयान दि हट्टी (MDH) हे नाव भारतापुरतेच मर्यादित राहिले नव्हते तर विदेशातही या ब्रॅंडचा प्रसार झाला होता.
 
'एकेकाळी चालवत होते टांगा'
 
दिल्लीमध्ये काही शतकांपूर्वी पाण्यासाठी बावली म्हणजे पायऱ्या पायऱ्या असलेल्या विहिरी असत. आजही शहरात अग्रसेन की बावली, फिरोजशहा कोटला बावली सारखी ठिकाणं शाबूत आहेत. त्यातल्याच खारी बावलीवर तयार झालेलं हे मार्केट मसाल्याचं केंद्र म्हणून विकसित झालं.
 
देशातल्या कानाकोपऱ्यात तयार होणारे सर्व मसाल्याचे पदार्थ इथं मिळतात. इथं मसाला विकणाऱ्यांच्या आणि त्या घेणाऱ्यांच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या.
 
यातला एक मसाला व्यापारी मात्र वेगळा होता. 27 मार्च 1923 रोजी आजच्या पाकिस्तानातील सियालकोटमध्ये त्यांचा जन्म झाला. 5 वीत असताना एकदा मास्तर रागावले म्हणून या पट्ठयानं शाळा सोडण्याचा थेट निर्णय घेऊन टाकला.
 
सरळ पतंग हातात घेतला, कबुतरं उडवायला सुरुवात केली. तो मुलगा म्हणजेच महाशय धर्मपाल गुलाटी आणि त्यांच्या कंपनीचं नाव 'एमडीएच'. एमडीएच हे नाव 'महाशियान दि हट्टी' यावरून आलं आहे. पंजाबी लोक दुकानाला हट्टी म्हणतात.
 
हे पतंग, कबुतर उडवणं वगैरे खेळ असं किती वर्षं चालेल म्हणून त्याच्या वडिलांनी घरचा मसाल्याचा व्यापार करायला सुरुवात केली. मग हा मुलगा मुलतान, कराची, रावळपिंडी, पेशावर असं गावोगाव फिरून मसाले विकू लागला आणि त्या काळात प्रत्येक दिवशी 500 ते 800 रुपये मिळवायचा.
 
कसे बनले मसाल्यांचे शहेनशाह?
 
1947 साली भारताची फाळणी झाली आणि त्याच्या कुटुंबाला भारतात यावं लागलं. भारतात आल्यावर अचानक आलेल्या दारिद्र्यानं चांगलेच चटके द्यायला सुरुवात केली. दिल्लीसारख्या नव्या शहरात कसं जगायचं म्हणून हा तरूण सैरभैर झाला.
 
हातामध्ये फक्त 1500 रुपये घेऊन तो भारतात आला होता. याच विचारात तो चांदनी चौकात गेला आणि तिथं 650 रुपयांना चक्क टांगा विकत घेतला. 'करोलबाग दोन आना', 'करोलबाग दोन आना' असं इतर टांगेवाल्यांसारखं ओरडून ओरडूनही त्याला गिर्हाइक काही मिळेना, शेवटी लवकरच टांगा देऊन टाकावा लागला.
 
काहीच चालेना म्हटल्यावर त्यांना वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सियालकोटचे मसाले मिळतील असं जाहीर करून टाकलं. नंतर एक लाकडी दुकानातून ते मसाले विकू लागले. काही काळानंतर याच खारी बावलीमध्ये त्यांचं दुकान सुरू झालं.
 
एक दुकान 'गफ्फार मार्केट'मध्येही सुरू झालं. ('गफ्फार मार्केट' सरहद्द गांधी 'खान अब्दुल गफ्फार खान' यांच्या नावानं तर 'खान मार्केट' त्यांचे भाऊ 'खान अब्दुल जब्बार खान' यांच्या नावानं सुरू करण्यात आलं)
 
मग ते दिवसातले 12 -15 तास ते काम करू लागले. खारी बावलीमध्ये जम बसल्यावर दिल्लीच्या इतर भागांमध्येही त्यांची दुकानं झाली. आज त्यांचा व्यवसाय 1000 कोटींच्या वर गेला आहे. देशातल्या कंपन्यांच्या सीईओंमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी होते.
 
त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नावचं मुळी 'टांगेवाला कैसे बना मसालोंका शहेनशाह?' असं ठेवलंय.