रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (16:46 IST)

मनसुख हिरेन मृत्यू : सचिन वाझे NIA समोर हजर

मयांक भागवत
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे जबाब नोंदवण्यासाठी NIA च्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता वाझे तिथं पोहोचले आहेत.
याआधी सचिन वाझे यांची अंतरिम अटकपूर्व जामिनाची मागणी ठाणे सेशन्स कोर्टानं फेटाळली आहे.
नियमित अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर मात्र 19 मार्चला सुनावणी होणार आहे. हा अर्ज त्यांनी 12 मार्चला केला आहे.
दुसरीकडे सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची सध्या चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटसमध्ये त्यांनी 'माझे सहकारी या प्रकरणात मला गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचा' आरोप केला आहे.
दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दिलेल्या जबाबात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने "माझ्या पतीची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय असल्याचं" म्हटलं आहे.
एटीएसने मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एटीएसने 2 वेळा त्यांची चौकशी केली आहे.
दुसरीकडे, शुक्रवारी (13 मार्च) सचिन वाझे यांची मुंबई क्राइम ब्रांचमधून विशेष शाखेत बदली करण्यात आली.
 
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.
स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.
मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत,

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
या प्रकरणाशी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
"सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून याप्रकरणी नेमलं. पण तीन दिवसांपूर्वी त्यांना काढलं आणि दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ओलामध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वाझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वाझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वाझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
मी घटनास्थळी सर्वांत आधी गेलो नव्हतो - सचिन वाझे
मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो," असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.
 
सचिन वाझे कोण आहेत?
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत आहेत.
 
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
 
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती.
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
 
माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत-विमला हिरेन
या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
 
"माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे," असं विमला हिरेन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
विमला हिरेन यांनी सांगितलं, "पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीला जात होते. दिवसभर त्यांना तिथं बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही (4 मार्च) त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. रात्री दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला."
कांदिवलीहून क्राईम ब्रॅंचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी घोडबंदरला भेटायला बोलावलं होतं, असाही दावा विमला यांनी केलाय.
मनसुख हिरेन हे कोणत्याही दबावात नव्हते असंही त्यांनी सांगितलं.
 
मनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप
 
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.
"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला.
विमला पुढे म्हणतात, "26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."
"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो," असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.
या जबाबात विमला पुढे आरोप करतात, "माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे."
एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
 
वाझेंच्या अटकेची मागणी
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी वाझेंवर हत्येचा संशय व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात वाझेंच्या अटकेची मागणी केली.
"सचिन वाझेंना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? पुरावे असतानाही सरकार वाझेंवर का कारवाई करत नाही? ते एका पक्षात होते म्हणून? असं म्हणत सचिन वाझेंना अटक करा," ही मागणी फडणवीस यांनी लावून धरली.
तर, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी "अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझेंनी अटक केली म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येतंय," अशी प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी करताच. सत्ताधारी शिवसेनेने अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधीमंडळात गोंधळ सुरू झाला.
सगळ्या गदारोळानंतर वाझे यांची क्राईम ब्राँचमधून अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.