शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (17:21 IST)

म्युच्युअल फंड : लहानशी गुंतवणूही महिलांना देऊ शकते मोठं उत्पन्न

कमलेश
गृहिणींना दर महिन्याला स्वतःचा पगार मिळत नसला, तरी घराच्या एकूण मिळकतीतून घरखर्च भागवून पैसे कसे वाचवायचे, हे नेमकं माहित असतं.
 
बचत केलेली थोडी-थोडी रक्कम बँकेत ठेवून किंवा वेगळी ठेवून मग अडीअडचणीसाठी पैसे साठवले जातात. यामुळे त्यांचा हातात थोडा पैसा येतो, तो स्वतःसाठी खर्च करता येतो किंवा मग अडचणीच्या वेळी वापरता येतो.
 
अशीच लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड.
ज्या प्रकारे आपण दरमहा एक विशिष्ट रक्कम जाणीवपूर्वक बाजूला ठेवतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातल्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही एक ठराविक रक्कम दरमहिन्याला गुंतवता येते. यात परतावा चांगला मिळतो.
ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत किंवा ज्यांना शेअरबाजारातलं कळतं, अशांसाठी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक चांगली असते, असं कदाचित तुम्हाला जाहिरातींवरून वाटू शकतं. पण असं नाहीये.
 
जर हा पर्याय व्यवस्थित समजून घेतला तर तो तुमच्यासाठीही गुंतवणुकीचं चांगलं माध्यम ठरू शकतो. म्हणूनच म्युच्युअल फंड आणि SIP अधिक सखोलपणे समजून घेऊयात.
 
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंडात दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी काही पैसे गुंतवता येतात.
 
मग हा पैसा म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात आणि यातून जो परतावा मिळतो, तो तुम्हाला दिला जातो. जर तुम्ही व्याज देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला व्याजही मिळतं.
पण तुमचा पैसा व्यक्तिगतरित्या गुंतवला जात नाही. या सगळ्या पैशांचा मिळून एक फंड बनवला जातो.
 
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना असेट मॅनेजमेंट कंपनी - AMC म्हटलं जातं.
 
या AMC गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून एक फंड तयार करतात. यामध्ये समान गरज आणि हेतू असणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून विविध ठिकाणी गुंतवले जातात. एक फंड मॅनेजर हा फंड सांभाळतो. तुम्ही सांगितल्यानुसार तो फंड गुंतवतो.
 
उदाहरणार्थ, एका गुंतवणूकदाराकडे 500 रुपये आहेत, दुसऱ्याकडे 5 लाख आणि तिसऱ्याकडे 5 कोटी रुपये आहेत, आणि या तिघांनाही एकाच प्रकारची गुंतवणूक करायची आहे. अशावेळी हा फंड मॅनेजर हे सगळे पैसे एकत्रच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो.
 
पण यातून मिळणारा परतावा व्यक्तिगतरित्या दिला जातो. पैशांच्या मोबदल्यात पैसेच मिळतात. पैशांच्या बदली इन्शुरन्स, मेडिक्लेम वगैरे दिला जात नाही.
 
तुमच्या गुंतवणुकीसाठी अगदी हजार रुपये असले तरी तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीशी संपर्क साधा आणि ते पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा.
 
म्युच्युअल फंडात अनेक प्रकारे गुंतवणूक करता येऊ शकते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्कीम - योजना निवडू शकता. जर तुम्हाला पुरेशी माहिती नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची मदत घेऊ शकता.
यामध्ये NAV पद्धतीने रिटर्न म्हणजेच परतावा मिळतो. त्या दिवशीचा खर्च कापून मग कंपन्या NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू जाहीर करतात आणि तुम्हाला पैसे देतात.
 
कमी रकमेपासून सुरुवात
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी भरपूर पैसे असण्याची गरज नाही. 500 रुपयांपासूनही तुम्ही सुरुवात करू शकता.
 
जसे एखाद्या भिशीसाठी दर महिन्याला हजार वा दोन हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे रोज, दर महिन्याला, तर तिमाहीला, सहामाहीला वा वर्षातून एकदा तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे घालू शकता.
 
आरडी इन्व्हेस्टमेंटचे संचालक राजेश रोशन सांगतात, "साधारणपणे गृहिणी किंवा कमी मिळकत असणाऱ्या महिला लहान लहान रकमेची बचत करतात. भिशीसाठी दरमहा हजार रुपये दिल्यावरही तुम्हाला वर्षभरानंतर 12 हजारच मिळतात. तिथे पैसे वाढत नाहीत. पण म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर व्याजही मिळू शकतं. यावर बचत खात्यापेक्षाही चांगला परतावा मिळतो."
 
फक्त गृहिणीच नाही, तर नोकरी करणाऱ्या महिलांसाठीही हा चांगला पर्याय असल्याचं राजेश रोशन म्हणतात. पैसे गुंतवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहता डिस्ट्रीब्युटर आणि फंड मॅनेजरच्या मदतीने पैसे गुंतवता येतात. आपल्या निवृत्तीनंतरच्या पैशांसाठीही महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
चार्टर्ड अकाऊंटंट रचना रानडे सांगतात, "एकाच प्रकारची गुंतवणूक कधीपर्यंत करत राहणार...म्हणजे एफडीवर जितकं व्याज मिळतं त्याचपटीने महागाई वाढते. मग यात तुमचा काय फायदा झाला? पण म्युच्युअल फंडात जास्त परतावा मिळतो. पण यामध्ये जास्त फायदा असला तरी धोकाही तुलनेने जास्त असतो, हे लक्षात ठेवून गुंतवणूक करायला हवी."
 
म्युच्युअल फंड कंपन्या या सेबीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करतात. या सगळ्या कंपन्या खासगी असतात.
 
म्युच्युअल फंड मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात.
 
इक्विटी म्युच्युअल फंड
यामध्ये शेअरबाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्यातल्या चढउतारांनुसार तुम्हाला परतावा मिळतो.
 
यात धोका जास्त आहे पण फायदाही तितकाच आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय मानला जातो. गुंतवलेले पैसे जर तुम्हाला लगेच नको असतील तर तुम्ही 5-6 वर्षांसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकता.
पण शेअर बाजारात थेट पैसे गुंतवणं शक्य असताना म्युच्युअल फंड कंपनीची काय गरज?
 
पण इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा काहीसं वेगळं आहे.
 
कारण तुमच्याकडे थोडेसे पैसे असतील तर मग जास्त सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पण महाग शेअर्स असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येत नाही.
 
पण म्युच्युअल फंडाद्वारे मात्र हे करता येऊ शकतं. कारण इथे तुमचा एकट्याचा नाही, तर मोठा फंड गुंतवला जात असतो.
डेट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund)
याद्वारे बाँड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल आणि नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली जाते.
 
यामध्ये तुम्ही लहान किंवा दीर्घ कालावधीसाठीही गुंतवणूक करू शकता. अगदी 1 दिवसासाठीची गुंतवणूकही यात करता येऊ शकेल, ज्यावर एका दिवसाचं व्याज मिळेल. याला ओव्हरनाईट फंड म्हणतात.
 
या डेट म्युच्युअल फंडात फारसा परतावा मिळत नाही, पण यातली जोखीमही कमी असते. यात एक ठरलेला परतावा असतो. पण यातही पैशांचं नुकसान होण्याची काही जोखीम पत्करावी लागतेच.
 
तुम्हाला जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही इक्विटी फंडात करू शकता. पण कमी कालावधी आणि सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी डेट फंडाचा पर्याय चांगला आहे.
रचना रानडे सांगतात, "टॅक्स वाचवण्यासाठीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते. याला टॅक्स सेव्हर फंड म्हणतात. हा इक्विटी ओरियंटेड म्युच्युअल फंड असतो. म्हणजे यातले किमान 65 टक्के पैसे इक्विटी फंडात गुंतवले जातात आणि उरलेले 35 टक्के डेट फंडात गुंतवले जातात. पण यामध्ये 3 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. पण कुठे, किती पैसे गुंतवायचे याची चिंता गुंतवणूकदाराला करावी लागत नाही. ते सगळं फंड मॅनेजर करतो."
हायब्रिड म्युच्युअल फंड
हा फंड म्हणजे इक्विटी आणि म्युच्युअल फंडाचं मिश्रण असतो. यामध्ये दोन्ही प्रकारची गुंतवणूक करता येऊ शकते.
 
तुमचे काही पैसे शेअर्समध्ये आणि काही बाँड्समध्ये गुंतवण्यात यावेत असं वाटत असेल, तर मग तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.
 
यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडापेक्षा कमी जोखीम आणि परतावा असतो, पण डेट म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त असतो.
 
म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गोल्ड फंडमध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. गोल्ड फंडात सोन्याच्या विविध रूपांमध्ये गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक प्रत्यक्ष सोन्यात किंवा सोनं खणून काढणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये असू शकते.
एसआयपी (SIP) म्हणजे काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा शब्द म्युच्युअल फंडाबाबत तुम्ही ऐकला असेल.
 
ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या म्युच्युअल फंडात ठराविक कालावधीने एक ठराविक रक्कम गुंतवते.
 
म्हणजे एखादी महिला हजार रुपयांची बचत करत असेल आणि तिला भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसे हवे असतील किंवा दर तीन वर्षांनी तिला दागिने किंवा मोठी वस्तू घ्यायची असेल तर मग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून हे पैसे गुंतवून त्यात वृद्धी करता येऊ शकते.
म्युच्युअल फंडाविषयी...
गुंतवणूक तज्ज्ञ म्युच्युअल फंडाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात.
 
म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लवचिक असते. म्हणजे तुम्ही इक्विटीत गुंतवणूक केलीत तरी नंतर तुम्ही ती डेट फंडात वळवू शकता. तुमच्याकडे 2000 रुपये जरी असले तरी तुम्ही 4 फंडांमध्ये 500 रुपये घालू शकता किंवा मग सगळे 2000 एकाच फंडात गुंतवू शकता.
म्युच्युअल फंडाचा फायदा म्हणजे विविध फंडांत गुंतवणूक केल्याने तुमचं नुकसान होण्याची भीती कमी असते.
गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत, ते किती काळासाठी गुंतवायचे आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या किती दिवसांनी वा महिन्यांनी किती पैसे लागतील याचा अंदाज घ्या.
काही अॅप्सच्या माध्यमातूनही तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.