सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

महेंद्रसिंग धोनी हा सचिन तेंडुलकर आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना?

- अभिजीत श्रीवास्तव
भारतीय उपखंडात निवृत्तीबाबत क्रिकेटपटूंना फारच स्वातंत्र्य आहे, असं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांना वाटतं.
 
PTI वृत्तसंस्थेच्या एका मुलाखतीत त्यांना निवृतीच्या धोरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, "हे सगळं फार रंजक आहे. ऑस्ट्रेलियात तुम्ही कोण आहात, याबद्दल कुणालाच काही फरक पडत नाही. तुम्हाला जावंच लागतं."
 
चर्चेतला विषय होता तो धोनीच्या निवृत्तीचा. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला नि तेव्हापासूनच महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.
 
पण त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकाच तराजूत तोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "भारतीय उपखंडात तुम्हाला बरंच स्वातंत्र्य मिळतं. कारण इथे 140 कोटी लोक तुम्हाला फॉलो करत असतात. इथे क्रिकेटर एक खेळाडू न राहता अगदी देवच होतो. त्यानंतर त्याच्या निवृत्तीचा निर्णय सोपा नसतो."
 
वॉ म्हणाले, "एका विशिष्ट वयापर्यंत पोहोचल्यानंतर खेळणं हे आव्हानात्मक असतं. महेंद्रसिंग धोनीबद्दल तुम्ही बोलताय. तो एक महान खेळाडू आहे."
 
आता प्रश्न असा उपस्थित होतो की भारतीय उपखंडात खेळाडूंनी निवृत्तीबाबत इतकं स्वातंत्र्य खरंच आहे? धोनीच्या निवृत्तीची वेळ खरंच आली आहे का?
 
धोनीच्या संथ फलंदाजीवर लोक प्रश्नं उपस्थित करत आहेत. त्याने निवृत्ती घ्यायला हवी, असंही लोक बोलत आहेत.
 
नुकताच 7 जुलैला धोनीचा 38 वा वाढदिवस साजरा झाला. धोनीने 2014 मध्ये टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वन डे आणि टी20 मध्ये अजूनही खेळतो.
 
वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने सांगितलं की धोनी त्याच्या निवृत्तीबद्दल काही बोलला नाही.
 
टी 20 मध्ये धोनीने 98 सामन्यात 1,617 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 37.60 असून स्ट्राईक रेट 126.13 आहे. वन डे मध्ये त्याने 10773 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 50.58 असून स्ट्राईक रेट 87.56 आहे.
 
वर्ल्ड कपमध्ये धावांच्या बाबतीत तो 27व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत त्याचा चौथा क्रमांक आहे. त्याचा स्ट्राईक रेट 87.78 होता. कोहलीचा स्ट्राईक रेट 94.06 होता.
 
धोनीचा स्ट्राईक रेट 87.56 आहे. 2016 मध्ये त्याच्या धावांची सरासरी 27.80 होती आणि 2018 मध्ये ही सरासरी 25.00 होती. तर 2017 मध्ये 60.62 तर 2019 मध्ये आतापर्यंत त्याने 60.00च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
 
धोनीचा खेळ बिघडतोय हे दिसत असलं तरी निवृत्ती घेण्यासाठी तो आणखी कमी होण्याची वाट पाहतोय का, हा खरा प्रश्न आहे.
 
पहिलं उदाहरण: सचिन तेंडुलकर
धोनीसमोर सगळ्यात मोठं उदाहरण सचिन तेंडुलकरचं आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला होता.
 
सचिन तेंडुलकर सहा वर्ल्ड कप खेळला. त्यादरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. 2007च्या वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार होतो, अशी कबुली सचिनने दिली होती.
 
मात्र विवियन रिचर्डसचा सल्ला मानून त्याने तसं केलं नाही. 2011च्या वर्ल्ड कप नंतर सचिनची कामगिरी अधिकाधिक खराब होत गेली. त्याने 21 मॅचेसमध्ये 39.43च्या सरासरीने धावा केल्या तर 15 टेस्ट मॅचमध्ये त्याने फक्त 633 धावा केल्या.
 
दुसरं उदाहरण: कपिल देव
भारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव सगळ्यात उत्तम ऑल राऊंडर मानले जातात. मात्र एक विक्रम करण्यासाठी ते बराच काळ टीममध्ये थांबले आणि त्यांची प्रगती अगदीच साधारण राहिली.
 
1988 मध्ये वनडे मध्ये त्यांनी सर्वांत जास्त विकेट घेतल्या होत्या. तेव्हा टेस्ट मॅचेसमध्ये न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली खेळायचे. त्या दोघांमध्ये इयान बॉथमचा सगळ्यांत जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोडण्याची स्पर्धा लागली होती.
 
1988 मध्ये हेडलीने हा विक्रम मोडला आणि वर्षांच्या शेवटपर्यंत विकेटची संख्या 391वर पोहोचली. हेडली आणखी दोन वर्षं खेळले. 1990 मध्ये निवृत्ती घेईपर्यंत त्यांनी 431 विकेट घेतल्या होत्या. तेव्हापर्यंत कपिल देवने 365 विकेट घेतल्या होत्या. हेडलीचा रेकॉर्ड तोडायला ते चार वर्षं खेळले आणि त्यासाठी 23 टेस्ट मॅच जाव्या लागल्या.
 
कपिल देव टीममध्ये असल्यामुळे जवागल श्रीनाथला बराच वेळ वाट पहावी लागली, असंही बोललं जातं.
 
मियांदादचंही एक उदाहरण
जेव्हा जावेद मियांदादने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा त्याच्यावर निवृत्ती घेण्यासाठी बराच दबाव होता, असं त्यांनीच एकदा सांगितलं होतं.
 
1996च्या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव पत्करल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली होती. 1992 मध्ये जेव्हा पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मियांदादचा तो सहावा वर्ल्ड कप होता. पाकिस्तानने तो वर्ल्ड कप जिंकला होता आणि मियांदाद त्यापैकी एक हिरो होता.
 
अंतिम सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीला काही विकेट गमावल्या होत्या. तेव्हा इमरान खान आणि जावेद मियांदादने त्यांचा डाव सांभाळला होता.
 
1992चा वर्ल्ड कप निवृत्ती घेण्यासाठी सगळ्यात उत्तम संधी होती असं त्यांनी नंतर कबूल केलं. त्यानंतर टेस्ट मॅच खेळत राहिले आणि 11 टेस्ट मॅचेसमध्ये 578 धावा केल्या.
 
1992 नंतरही त्यांनी एकही वन डे खेळले नाही. तरीही 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी एकूण स्पर्धेत 54 धावा केल्या.
 
सुनील गावस्कर, इयान बॉथम, किंवा वेस्टइंडिज चे गारफिल्ड सोबर्स यांनी जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा ते आणखी काही वर्षं क्रिकेट खेळू शकले असते अशी चर्चा झाली होती. अशा दिग्गजांप्रमाणे निवृत्ती घ्यायची की नाही ते आता धोनीवर अवलंबून आहे.