शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2020 (14:39 IST)

Oscar Nominations 2020: जोकर चित्रपटाला ऑस्करची 11 नामांकनं

हॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
यावर्षी क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' आणि टोड फिलिप्सचा 'जोकर' ऑस्करच्या स्पर्धेत सर्वांत पुढे आहे.
 
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वाधिक नामांकनं मिळवणारा हा 'जोकर' ठरला आहे. 'जोकर'ला तब्बल 11 कॅटेगरींमध्ये नामांकन मिळालं आहे. 10 फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार) ऑस्कर सोहळा रंगणार आहे.
 
'जोकर'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेतासोबतच आणखी आठ नॉमिनेशन मिळाली आहेत. जोकर हा चित्रपट रिलीज होत असताना अनेकांनी त्याची तुलना हिथ लिजरच्या 'डार्क नाइट'मधील जोकरशी केली होती, मात्र यंदाचा जोकरही प्रेक्षकांना भावून गेला.
 
त्यासोबतच '1917' आणि 'वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड', द आयरिश मॅन' या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या कॅटेगरिमध्ये 10 नॉमिनेशन्स मिळाली आहेत.
 
'जोजो रॅबिट'ला 5, तर 'लिटिल मॅन' आणि 'पॅरासाईट' या दोन चित्रपटांची सहा कॅटेगरीत निवड झाली आहे. तर 'फोर्ड व्हर्सेस फरारी' हा चित्रपट 4 मुख्य कॅटेगरिमध्ये निवडला गेला आहे.
 
ऑस्कर नॉमिनेशन्स 2020 - सर्वोत्कृष्ट चित्रपट
 
फिल्म नॉमिनेशन्स
जोकर 11
वन्स अपोन अ टाइम.. इन हॉलीवुड 10
द आईरिश मॅन 10
1917 10
जोजो रॅबिट 6
पॅरासाइट 6
लिटिल वुमेन 6
मॅरिज स्टोरी 6
फॉर्ड वर्सेस फरारी 4
 
सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी 'जोकर'च्या हॉकिन फीनिक्स व्यतिरिक्त मॅरेज स्टोरीसाठी अॅडम ड्रायव्हर 'वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड'साठी लियोनार्डो डिकॅप्रियो, जोनाथन प्राईस यांना 'द टू पोप्स' या चित्रपटासाठी नॉमिनेशन मिळालं आहे.
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी सिन्थिया एरिवो, स्कारलेट जोहानसन, साइओर्स रोनेन, चार्लीज थेरॉन आणि रेने जेल्वेगर स्पर्धेत आहेत.
 
भारताकडून ऑस्करसाठी झोया अख्तरचा 'गली बॉय' हा सिनेमा पाठवण्यात आला होता. तो स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र, भारताला अजूनही एक संधी आहे.
 
शेफ ते फिल्ममेकर प्रवास करणाऱ्या विकास खन्नाचा 'द लास्ट कलर' हा पदार्पणातील सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांची यात प्रमुख भूमिका आहे. बेस्ट फिचर फिल्म कॅटेगरीत हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.