शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (12:21 IST)

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन

93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.
 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो या संमेलनाचे अध्यक्ष असून दुपारी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात शुक्रवारी म्हणजे आज ग्रंथदिंडीने होत आहे. त्यानंतर ध्वजारोहण होणार आहे.
 
आज उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहाणार आहेत. त्याचप्रमाणे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितिन तावडे उपस्थित राहातील.
 
राज्यभरातून येणाऱ्या विविध प्रकाशनगृहांसाठी येथे दालनं उभी करण्यात आली आहेत. वाचक आणि ग्रंथप्रेमींना ग्रंथ पाहाण्याची आणि विकत घेण्याची संधी त्या निमित्ताने मिळणार आहे.
फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्षीय भाषणात काय बोलणार?
संमेलनाचे अध्यक्ष पादर फ्रान्सिस दिब्रिटो आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर काही संघटनांनी त्यावर आक्षेपही नोंदवले होते.
 
साहित्यामध्ये धर्मकारण येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासर्व मुद्द्यांना दिब्रिटो कसे संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरू असल्यामुळे त्यावरही संमेलनाध्यक्ष व्यक्त होतील अशी शक्यता आहे.
 
'माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल तर माझा नाईलाज आहे'
माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल तर माझा नाईलाज आहे, अशा शब्दांमध्ये दिब्रिटो यांनी बीबीसी मराठीशी बोलताना भूमिका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो, की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरिबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाईलाज आहे."
 
"मी धर्मगुरू असल्याचं कधीही नाकारलेलं नाही. ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाच्या अडचणीही मी स्वीकारलेल्या आहेत. पण धर्मगुरूने चर्चच्या कंपाऊंडमध्ये राहता कामा नये, अशी माझी भूमिका आहे. लोकांच्या सुखदुःखाच्या प्रश्नांशी आमचं नातं आहे."
 
"इतर धर्मांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका. बाहेर पडा. तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित होईल," असंही ते म्हणाले होते.
 
कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो?
फादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं.
 
1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं.