मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (15:39 IST)

प्रिन्स हॅरी आणि मेगन 'वरिष्ठ' रॉयल पदाचा करणार त्याग

'द ड्युक' आणि 'डचेस ऑफ ससेक्स' यांनी आपण 'सीनिअर रॉयल'पदाचा त्याग करणार असल्याची घोषणा केली आहे. यापुढे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
 
लंडनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी नुकतंच यासंबंधीचं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यापुढे आपण युके आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
 
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी घेतलेल्या या निर्णयाची महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स विल्यम किंवा राजघराण्यातल्या कुठल्याच व्यक्तीला कल्पना नव्हती. दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बंकिंगहॅम पॅलेस नाराज असल्याचंही कळतंय. या निर्णयामुळे सीनिअर रॉयल्स दुखावल्याची माहितीही बीबीसीला मिळाली आहे.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाहीर कबुली दिली होती.
 
बुधवारी त्यांनी अचानक हा निर्णय जाहीर केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेक महिने विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुनही जाहीर केलं.
 
प्रसारमाध्यमांसमोर या निर्णयाचा खुलासा करताना ते म्हणाले, "राजघराण्याच्या 'वरिष्ठ सदस्य'पदाचा त्याग करण्याचा आमचा विचार आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने आम्ही काम करु. मात्र, असं करत असताना महाराणी एलिजाबेथ यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल."
यूके आणि उत्तर अमेरिका दोन्हीकडे वेळ देता येईल, याची काळजी घेऊ असं म्हणत 'महाराणी, राष्ट्रकूल आणि आमच्या रक्षकांबद्दलच्या आमच्या कर्तव्यात आम्ही कसूर करणार नाही' असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
पत्रकात पुढे म्हटलं आहे, "हे भौगोलिक संतुलन आम्हाला राजघराण्यात जन्म झालेल्या आमच्या मुलाचं राजपरंपरेनुसार संगोपन करण्यात मदत करेल. तसंच यातून आमच्या कुटुंबाला नवा अध्याय सुरू करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची संधी मिळेल. आम्ही एक नवी सेवाभावी संस्था सुरू करत आहोत, त्याकडे लक्ष देता येईल."
 
शाही जोडपं आणि राजघराण्यात फूट
प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांच्या निर्णयामुळे 'निराश' झाल्याची प्रतिक्रिया राजघराण्याकडून देण्यात आली आहे. हेच खूप आहे, असं बीबीसीचे रॉयल करस्पॉंडंट जॉनी डायमंड यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणतात, "राजघराणं आज काय विचार करत असेल याचे हे संकेत असावेत असं मला वाटतं. जे घडलं ते फार महत्त्वाचं नाही. तर ज्या पद्धतीने घडलं ते महत्त्वाचं आहे."
 
राजघराण्यातल्या एका प्रवक्त्यांनुसार, "ड्युक अँड डचेस ऑफ ससेक्सशी सुरुवातीला चर्चा होत होती. एका वेगळा मार्ग स्वीकारण्याची त्यांची इच्छा आम्ही समजू शकतो. मात्र, हे सर्व खूप गुंतागुंतीचं आहे आणि सगळं सुरळित होण्यासाठी वेळ लागेल."
 
राजघराण्याचे माजी प्रेस अधिकारी डिक्की ऑर्बिटर यांच्या मते प्रिन्स हॅरी यांनी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला.
ऑर्बिटर सांगतात की या जोडप्याला मुलगा झाला तेव्हा प्रसार माध्यमांनी त्यांना दिलेली वागणूक हेदेखील हा निर्णय घेण्यामागचं एक कारण असू शकतं.
 
ऑर्बिटर प्रिन्स हॅरी यांच्या या निर्णयाची तुलना 1936 सालच्या एडवर्ड-8 यांच्या त्या निर्णयाशी करतात ज्यात त्यांनी दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या वॅलिस सिंपसन यांच्याशी लग्न करण्यासाठी सिंहासनावर पाणी सोडलं होतं.
 
प्रिन्स हॅरी यांचा खर्च
हे शाही जोडपं आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करणार, असा प्रश्नही उपस्थित होतोय.
 
ऑर्बिटर याच्या मते, "हॅरी गरीब व्यक्ती नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये स्वतःचा जम बसवणं, कुटुंबाचा सांभाळ करणं आणि आपलं काम करणं अवघड आहे. या सगळ्यांसाठी पैसा कुठून येणार?"
 
या शाही जोडप्याला सुरक्षा कोण देणार आणि त्याचा खर्च कोण उचलणार, असा प्रश्नही ते विचारतात.
 
ऑर्बिटर म्हणतात जनता हेदेखील विचारले की वर्षातून काही महिने हे जोडपं परदेशात राहणार असेल तर तेवढ्या काळात त्यांच्या ब्रिटनमधल्या घराच्या देखभालीसाठी 24 लाख पाउंड एवढा जनतेचा पैसा का खर्च करायचा.
 
मात्र, बीबीसीचे रॉयल करस्पाँडंट जॉनी डायमंड म्हणतात या शाही जोडप्याने बरेच पैसे साठवले आहेत.
 
ते सांगतात की प्रिन्स हॅरी यांना त्यांची आई प्रिन्सेस डायना यांच्याकडून गडगंज संपत्ती मिळाली होती. शिवाय मेगन यांनीही अभिनेत्री म्हणून बरेच पैसे साठवले आहेत.
 
जॉनी डायमंड यांच्या मते या दोघांना काम करणंही जरा अवघड असणार आहे. मात्र, हे नवं मॉडेल यशस्वी ठरतंय की नाही आणि हे जोडपं राजघराण्याचा पूर्णपणे त्याग तर करणार नाहीत ना, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सध्यातरी जरा वाट बघायला हवी.
 
राजसिंहासनाच्या शर्यतीत प्रिन्स सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याआधी प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विल्यम आणि त्यांची तीन मुलं आहेत.
 
प्रिन्स हॅरी यांनी यापूर्वी त्यांचे थोरले बंधू प्रिन्स विल्यम यांच्याशी असलेले आपले मतभेत जाहीर केले आहेत. दोन्ही भाऊ केन्सिंग्टन महालात एकत्र राहायचे. मात्र, 2018 साली प्रिन्स हॅरी त्या घरातून वेगळे झाले आणि त्यांनी विंडसरमध्ये स्वतःचं नवीन घर उभारलं.
 
दोन्ही भाऊ मिळून जी सेवाभावी संस्था चालवायचे त्यातूनही 2019 मध्ये दोघं वेगळे झाले.