शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (08:27 IST)

कलम 370 : पाकिस्तानने केली भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी, हवाई हद्दही अंशतः बंद

कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली असून भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई हद्दीचा एक कॉरिडोअर बंद केला आहे.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, यांच्यासह महत्वाच्या संस्थांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाची चर्चा केली. जम्मू-काश्मीरसह प्रत्यक्ष ताबारेषेवरील परिस्थितीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. समितीने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना परत भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला.
 
एआरआय टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटलं की ते आपल्या उच्चायुक्तांना लवकरच पुन्हा बोलावतील आणि भारतीय उच्चायुक्तांना पुन्हा भारतात जाण्यास सांगतील.
 
या मुद्द्याला संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे.
 
पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्टला साजरा होता. हा दिवस काश्मिरी जनतेसोबत ऐक्य दाखवण्यासाठी साजरा करण्याचा निर्णय पाकिस्तानते घेतला आहे. तर 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन पाकिस्तान काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे.
'उच्चायुक्तांना परत बोलावणे ही काही नवी गोष्ट नाही'
पाकिस्तानच्या या निर्णयावर प्रतिक्रियेसाठी पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त राहिलेले जी. पार्थसारथी यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.
 
पार्थसारथी म्हणाले, "ही काही नवी गोष्ट नाही. जेव्हा भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. त्यामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असल्याचं समोर आलं होतं. तेव्हा आपणही आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावलं होतं. त्यांनीही हे केलं. पण संपर्क असतो. उप -उच्चायुक्त तिथं असतात. दुसरेही माध्यमं आहेत संपर्क साधण्यासाठी."
 
अमित शाह यांनी कशी तडीस नेली आपली योजना?
"ही सगळी ड्रामेबाजी आहे. ते काहीच करू शकले नाहीत. त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्ससमोर पुन्हा त्यांच्यावर सँक्शन लावण्यात येणार आहेत म्हणून ते घाबरलेले आहेत. त्यांची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. अमेरिका असो किंवा सौदी अरेबिया किंवा अरब अमिरात अशा देशांकडून तसंच जगभरातून मदत मागत आहेत."
 
ते पुढे म्हणाले, "यूएनमध्ये जाण्याबाबत तर मागच्या तीस वर्षांपासून बोलत असतात. त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्यासमोर इतर कोणताच पर्याय उपलब्ध नाही. "
 
इम्रान खान यांना मी 1982 पासून ओळखतो. त्यांचं कालचं वक्तव्य म्हणजे काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना केली होती. इम्रान खान यांना मी पाक लष्कराचा एक हस्तक समजतो. जे काही जनरल बाजवा सांगतात. ते इमरान खान करतात."
 
भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद
या दरम्यान पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई हद्दीचा एक कॉरिडोअर बंद केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. एक कॉरिडोअर बंद झाल्यानं भारतीय विमानांच्या उड्डाणाच्या कालावधीत 12 मिनिटांची वाढ झाल आहे.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विमानांना आता वेगळ्या रूटनं जावं लागत आहे. पण, त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचं फारसं नुसकान होणार नाही असं या अधिकाऱ्याचं म्हणण आहे.
 
पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून एअर इंडियाची जवळपास 50 विमानं रोज उडतात. जी अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेत जातात.
 
याआधी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं 26 फेब्रुवारी 2019 पासून त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी पूर्णतः बंद केली होती. 16 जुलैनंतर मात्र ती पूर्णतः उघडण्यात आली होती.