मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:16 IST)

पी. व्ही. सिंधू : BBC Indian Sportswoman of the Year पुरस्कारासाठी नामांकन

- दिप्ती बत्थिनी
हैदराबादच्या पी. गोपीचंद अकादमीत जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. तिथे आत जाताच एक वेगळीच अनुभूती होते. एकापाठोपाठ एक आठ बॅडमिंटन कोर्ट इथे आहेत. इथूनच प्रशिक्षण घेतलेल्या अनेक भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि अनेक सुपर सीरिज जिंकल्या आहेत.
 
विचारांची ही साखळी तेव्हा तुटली जेव्हा पी. व्ही. सिंधू आपली कीट घेऊन आत आली. येताच तिने थेट बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. 5 जुलै 1995 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली जवळपास सहा फूट उंच सिंधूने ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलं आहे.
 
कोर्टवर चार तास प्रॅक्टिस करत असताना एकदाही तिचं लक्ष विचलित झालं नाही. एकदाही तिने मोबाईलला हात लावला नाही. फक्त सराव सुरू होता. मधे-मधे मित्रांसोबत गमती-जमती सुरू होत्या.
 
जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या सिंधूची कहाणी एक अनोखी यशोगाथा आहे. मात्र, हे यश एका रात्रीतून मिळालेलं नाही. अनेक तास वाट बघितल्यानंतर सिंधूची मुलाखत घेण्याची संधी मिळाली तेव्हा मनात पहिला प्रश्न हाच आला, "बॅडमिंटनच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?"
 
आपलं ट्रेडमार्क स्मितहास्य देत सिंधू म्हणाली, "मी आठ वर्षांची असताना बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. माझे आई-वडील वॉलीबॉल खेळाडू आहेत. वडिलांना वॉलीबॉलसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ते रेल्वे ग्राउंडवर वॉलीबॉल खेळायला जात तेव्हा शेजारच्या कोर्टवर बॅडमिंटन कोर्ट होता. मी तिथे खेळू लागले आणि आवड निर्माण झाली. मेहबूब अली माझे पहिले प्रशिक्षक होते. 10 वर्षांची असताना मी गोपीचंद अकादमीत आले आणि आजवर इथेच आहे."
 
पी. व्ही. सिंधू चाईल्ड प्रॉटेजी आहे. चाईल्ड प्रॉटेजी म्हणजे विलक्षण मूल. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर दहा वर्षांच्या आतलं असं मूल जे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे मिनिंगफुल आउटपुट देऊ शकतं. 2009 साली सिंधूने सब ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आणि मग तिने मागे वळून पाहिलं नाही.
 
ऑलिम्पिकची तयारी कशी सुरू झाली?
वयाच्या 18 व्या वर्षी ती वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. तेव्हापासून आजवर सिंधूने अनेक पकदं पटकावली आहेत. मात्र, तिला सर्वांत जास्त आवडणारं मेडल कोणतं?
 
चार वर्षं लोटली असली तरी ऑलिम्पिकचा विषय काढताच तिच्या चेहऱ्यावर हास्य खुललं.
 
ती म्हणाली, "रियो ऑलिम्पिक माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी मला दुखापत झाली होती. सहा महिने कोर्टच्या बाहेर होते. काय करावं, कळत नव्हतं. मात्र, माझे प्रशिक्षक आणि पालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की ही माझी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे. मग एकापाठोपाठ एक सामने जिंकत गेले. फायनलमध्येही मी 100 टक्के दिलं. मात्र, तो दिवस कुणाचाही असू शकला असता. मी सिल्वर मेडल जिंकलं. मात्र, तेही कमी नाही. मी भारतात परतले तेव्हा गल्ली-बोळात माझं स्वागत करण्यात आलं. विचार करून आजही अंगावर रोमांच उभा राहतो."
 
चर्चा रंगत होती तसं माझ्या लक्षात आलं सिंधू त्या लोकांपैकी आहे जे सदैव आशावादी असतात - इटर्नल ऑप्टिमिस्ट
 
मी सिंधुला विचारलं ऑलिम्पिक फायनलमध्ये पराभूत झाल्याचं शल्य कधी वाटलं का? त्यावर ती ताबडतोब म्हणाली, "मी हरले तेव्हा थोडं वाईट तर वाटलंच होतं. मात्र, प्रत्येकाला दुसरी संधी मिळतेच. मला तर याच गोष्टीचा जास्त आनंद होता की जे पदक मिळवण्याचा मी कधी विचारही केला नव्हता ते मला मिळालं आहे. तेव्हापासून तर आयुष्यच बदललं आहे. 2019 साली मी वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकले. इथे 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्हर मेडलही जिंकली आहेत."
 
मात्र, हा विजय सोपा नव्हता. सिंधूने गोपीचंद यांच्या मार्गदरशनाखाली कसून सराव केलाच. इतकंच नाही तर 21 वर्षांच्या सिंधूला अनेक महिने तिचा मोबाईलही देण्यात आला नाही. आईसक्रीम खाण्यासारखे छोटे-छोटे आनंदीही तिच्यापासून लांब होते.
 
तुमच्यापैकी अनेकांना तो व्हायरल व्हिडियो आठवत असेल ज्यात रियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर सिंधू आईसक्रीम खात होती.
 
"मी केवळ ऑलिम्पिक पदक जिंकले नव्हते तर गोपी सरांकडून आईसक्रीम खाण्याचा आपला हक्कही जिंकले होते," सिंधू खिदळून सांगत होती.
 
सिंधू आणि तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांचं नातंही खास आहे.
 
"मी दहा वर्षांची असताना गोपी सरांसोबत सुरूवात केली आणि आता 24 वर्षांची आहे. आताही त्यांच्याकडूनच प्रशिक्षण घेत आहे."
 
सिंधूने अगदी साधेपणाने सांगितलेली ही बाब दोघांच्या घट्ट रुजलेल्या नात्याची साक्ष पटवणारं आहे.
 
सिंधू सांगते, "ते उत्तम प्रशिक्षकच नाही तर चांगले मित्र आहेत. प्रशिक्षक म्हणून ते कठोर आहेत. मात्र, कोर्टच्या बाहेर अगदी सहज. खेळाडू म्हणून ते मला ओळखून आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा गेम सुधारला आहे."
 
सिंधूचं प्रत्येक उत्तर एका स्मितहास्याने संपायचं. मग विषय अडचणींचा असो किंवा अपयशाचा.
 
सिंधूने अमाप यश मिळवलं असलं तरी तिचे टीकाकारही आहेत. सिंधू ज्या मोठ्या फायनल्स हरली, त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, सिंधू शब्दाने उत्तर देणाऱ्यातली नाही.
 
ती म्हणते, "अनेक जण म्हणायचे की हिचं फायनलमध्ये काय होणार? सिंधुला फायनल फोबिया आहे. पण मला वाटलं की मी माझ्या रॅकेटने उत्तर द्यावं. मी स्वतःला सिद्ध केलं आहे." तिचा इशारा 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मिळवलेल्या गोल्ड मेडलकडे होता. त्यापूर्वी 2017 आणि 2018 ची फायनल ती हरली होती.
 
सिंधू भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, सोबतच सर्वांत जास्त कमावणाऱ्या महिला खेळांडूंपैकीही ती एक आहे.
 
फोर्ब्सच्या यादीत समावेश
फोर्ब्सने 2018 साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिंधुच्या नावाचा समावेश केला होता. सिंधू आज स्वतः एक ब्रँड आहे आणि अनेक ब्रँड्सचा चेहराही आहे.
 
2018 साली कोर्टवर खेळून तिने 5 लाख डॉलर कमावले होते. तर जाहिरातींमधून तिला 80 लाख डॉलर्स मिळाले. म्हणजेच दर आठवड्याला कमीत कमी 1 लाख 63 हजार डॉलर्स. ही रक्कम अनेक क्रिकेट खेळाडूंच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.
 
सिंधू एक यशस्वी खेळाडू तर आहेच. पण एक व्यक्ती म्हणूनही तिला तिच्या पात्रतेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या खांद्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याची तिला पूर्ण कल्पना आहे. मात्र, असं असूनदेखील ती तिच्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगते.
 
सरावाचं शेड्युल, जगभरात खेळण्यासाठी जाणं-येणं, बिजनेस, जाहिराती.... एका 24 वर्षांच्या मुलीसाठी हे ओझं तर नाही?
 
मात्र, गेमप्रमाणेच तिच्या विचारातही स्पष्टता आहे. ती म्हणते, "मी हे सगळं खूप एन्जॉय करते. लोकं विचारतात की तुझं पर्सनल लाईफ तर उरतच नसेल. पण माझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण तुम्ही कायमच लाईमलाईटमध्ये असाल, असं गरजेचं नाही. मी आयुष्यात काही मिस करतेय, असं मला कधीच वाटलं नाही. बॅडमिंटन माझी पॅशन आहे."
 
तर अशा आनंद आणि उत्साहाने ओतप्रोत सिंधुच्या यशाचा मंत्र काय? ती म्हणते, "काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. हीच माझी ताकद आहे. कारण तुम्ही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी खेळत असता. स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो."
 
तुम्हाला वाटत असेल की जग्गजेत्ती असण्याचा अर्थ अखंड मेहनत आणि थोडा कंटाळा तर सिंधू इथेही सगळ्यांचा चुकीचं ठरवते.
 
'नेल पॉलिश कुठून घेतलंस?'
खेळासोबतच ती फॅशन आईकॉनही बनत आहे. आपल्या पर्सनॅलिटीच्या या पैलुविषयी सांगताना ती एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे खिदळत सांगते, "मला चांगले कपडे घालणं, नटणं-मुरडणं आवडतं." तिच्या नखांवर लावलेलं नेलपेंट याला दुजोरा देत होतं.
 
तिच्याशी बोलताना एकवेळ तर मला वाटलं की हे नेलपॉलिश कुठून घेतलं हे विचारावं.
 
पण, स्वतःला आवरलं. सिंधू पुढे सांगत होती, "बिलबोर्डवर, जाहिरातींमध्ये स्वतःला बघणं छान वाटतं."
 
बॅटमिंटनव्यतिरिक्त तिला संगीत ऐकायलाही खूप आवडतं. आपल्या भाच्यासोबत खेळणं तिच्यासाठी सर्वांत मोठा स्ट्रेस बर्स्टर आहे.
 
'बिर्याणीची फॅन'
आणि हैदराबादची असल्यामुळे ती हैदराबादी बिर्याणीची फॅन आहे.
 
खादाडी, फॅशन आणि कुटुंब हे सगळं तर आहेच. पण सध्या तिनं टोकियो ऑलिम्पिक 2020वर लक्ष केंद्रित केलं आहे. ऑलिम्पिक मेडल (दुसऱ्यांदा) जिंकणं तिचं स्वप्न आहे. यावेळी सिंधुला गोल्ड हवं आहे. भारताची पहिली महिला ऑलिम्पिक गोल्ड विजेती.
 
अशाप्रकारे सिंधुशी रंगलेल्या गप्पा संपत आल्या. शेवटी सिंधू तिची ट्रेडमार्क स्माईल देत म्हणाली, "लोकांना माझ्यापासून प्रेरणा मिळते, हे बघून आनंद वाटतो. अनेकांना बॅडमिंटनमध्ये करियर करायचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही मेहनत काही आठवड्यांची नाही तर वर्षानुवर्षांची आहे. यश कधी सहज मिळतं?"