सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (15:57 IST)

रजनीकांत : राजकारणात प्रवेश तर केला, पण संधी आणि आव्हानं किती?

मुरलीधरन के
रजनीकांत यांनी तामिळ चित्रपटसृष्टी प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला ते खलनायकी भूमिका करत असत. आता तामिळ सिनेमाच्या शिखरावर विराजमान झाल्यावर ते राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत आणि मुख्यमंत्रीपद हे त्यांचं लक्ष्य आहे.
 
चित्रपटसृष्टीमध्ये यश मिळवताना त्यांनी अनेकर खडतर वाटांवरून मार्गक्रमण केलं. पण राजकारणातील त्यांचा मार्ग आणखी अवघड असणार आहे.
 
बालचंद्र यांच्या 1975 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रजनीकांत पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर अवतरले. त्या चित्रपटामधील त्यांच्या पात्राचं नाव 'अबास्वरम' असं होतं, त्याचा अर्थ "सूर चुकलेला" असा होतो. दाढी वाढवलेला, अस्ताव्यस्त केसांच्या या व्यक्तिरेखेने त्यांच्यासाठी प्रसिद्धी व कीर्तीची द्वारं खुली करून दिली आणि काहीच वर्षांमध्ये तामीळ चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या ताऱ्याचा उदय झाला. कोणालाच याचं भाकित वर्तवता आलं नसतं.
रजनीकांत खास त्यांच्या शैलीत, वेगात आणि मोहक पद्धतीने सर्वोच्च स्थानापर्यंतच्या पायऱ्या चढत गेले. एका टप्प्यावर आशियातील सर्वाधिक मोबदला मिळणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. त्यांचा चाहतावर्ग केवळ तामिळनाडूच नव्हे, तर राष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पसरलेला आहे.
1980-90 च्या दशकांमध्ये 'रजनीकांत' हे जादुई नाव होतं. 'सुपरस्टार' या स्थानापर्यंतचा त्यांचा प्रवास अद्भुतरम्य वाटावा असा आहे.
 
कंडक्टर म्हणून काम
राणोजी राव आणि रमाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शिवाजीराव गायकवाडचे बालपण बंगळुरूच्या उपनगरांमध्ये गेलं. रजनी हे त्यांच्या आईवडिलांच्या चार मुलांपैकी सर्वांत धाकटे होते. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला.
 
शिवाजीरावचं शालेय शिक्षण बंगळुरूतील कवीपुरम शाळेमध्ये आणि बसवानगुडी प्रीमिअर मॉडेल स्कूल इथे झालं. लहानपणापासूनच ते चित्रपटांचे चाहते होते. एके दिवशी, ते परीक्षांसाठी राखून ठेवलेल्या पैशातून तिकीट काढून चेन्नईला आले. अनेक छोट्यामोठ्या नोकऱ्या करूनही त्यांना काही यशाची चव चाखायला मिळाली नाही. मग ते बंगळुरूला परत गेले आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम सुरू केलं.
कंडक्टर म्हणून काम करत असतानाही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली व मोहिनी होती. क्वचितप्रसंगी त्यांनी नाटकांमधूनही कामं केली. कालांतराने ते पुन्हा चेन्नईला आले आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये भरती झाले. 1973-74 मध्ये के. बालचंदर पाहुणे व्याख्याते म्हणून इन्स्टिट्यूटला आले असताना रजनीकांत यांची त्यांच्याशी ओळख झाली.
 
पण या ओळखीतून काही त्यांनी लगेच अभिनयाची संधी मिळाली नाही. त्या वेळी तोडकंमोडकं तामिळ बोलणाऱ्या रजनीकांत यांना आधी भाषा शिकून घ्यायचा सल्ला बालचंदर यांनी दिला. चित्रपटांमध्ये काम करायची संधी न मिळाल्यामुळे रजनीकांत बंगळुरूला परत गेले, तर तिथे त्यांची बस-कंडक्टरची नोकरी काढून घेण्यात आली होती.
 
हताश अवस्थेत ते चेन्नईला परत आले आणि त्यांच्या समोर एक नवीन संधी आली. काहीच महिन्यांमध्ये त्यांना बालचंदर यांनी फोन केला आणि आगामी चित्रपटात एक छोटी भूमिका करण्याबद्दल विचारलं. यात रजनीकांत यांची निवड झाली.
 
शिवाजीराव ते रजनीकांत
शिवाजीराव गायकवाडचं नामकरण रजनीकांत असं करण्यात आलं. 'अपूर्वा रागंगल' या चित्रपटामध्ये त्यांचं पात्र गंजलेलं दार उघडताना दाखवलं आहे, त्याच वेळी ते विनासायास तामिळ लोकांच्या हृदयात प्रवेश करते झाले. 'मुंद्रू मुदिचू' आणि 'अपूर्वा रागंगल' यांसारख्या इतरही चित्रपटांमध्ये बालचंदर यांनी रजनीकांत यांना संधी दिली.
 
एमजीआर यांच्या चित्रपटांमध्ये नाम्बिआर खलनायकाची भूमिका करत असत, तेव्हा तामिळ चाहते नाम्बिआर यांना शिव्याशाप देत. पण हेच चाहते खलनायकी रूपातल्या रजनीकांत यांच्या अभिनयावर मात्र टाळ्या पिटत होते. सिगरेट उडवण्याची त्यांची शैली लोकप्रिय झाली. इथेच रजनीकांत यांचा लोकप्रियतेच्या शिखराच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
चित्रपटसृष्टीत 1975 साली आगमन झाल्यानंतर तीन वर्षांत त्यांनी 40 चित्रपटांमध्ये काम केलं. दर दिवशी ते अथकपणे तीन पाळ्यांमध्ये काम करत होते. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तणावासाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
'धर्मयुद्धम' या त्यांच्या पुनरागमनाच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा तेजस्वी प्रवास सुरू राहिला.
 
हळूहळू त्यांनी नकारात्मक भूमिका करायचं थांबवलं आणि खास त्यांच्या शैलीतील नायक उभा करायला सुरुवात केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये विनोदी प्रसंग घालणं आवश्यक झालं.
 
त्यांच्या चित्रपटांना सतत यश मिळत गेल्यावर त्यांचं एक निश्चित सूत्र ठरून गेलं. यशाची हमखास खात्री देणाऱ्या चित्रपटांचा अभिनेता, असं त्यांचं स्थान निर्माण झालं. यात त्यांना चिंता वाटण्यासारखं काहीही नव्हतं, ते त्यांच्या चाहत्यांच्या गरजा पुरेपूर पूर्ण करत होते.
 
'रजनी-कमल'युग
1970 च्या दशकाअखेरीला तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये एक मोठा बदल झाला. एमजीआर-शिवाजी यांचं युग संपलं. ती जागा रजनी-कमल या नवीन नायकांनी घेतली. 1070 च्या दशकाअखेरीपासून ते 1990 च्या दशकाअखेरीपर्यंत या दोघांनी तामिळ चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.
 
रजनीकांत यांनी तेलुगू, कन्नड व हिंदी चित्रपटउद्योगांमध्येही त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. 'पथिनारू वयाथिनिले' या चित्रपटातील भूमिकेसाठी दोन हजार रुपये इतकं मानधन मिळालेला हा अभिनेता 1990 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत विराजमान झाला.
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये वर्तमानपत्रांनी त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक प्रसंगांबद्दल वेळोवेळी बातम्या दिल्या. पण त्याकडे रजनीकांत यांनी फारसं लक्ष दिलं नाही. 1980 च्या दशकाअखेरीला त्यांनी धर्मावर उघडपणे श्रद्धा दाखवायला सुरुवात केली.
 
सोळाव्या-सतराव्या शतकातील संत 'श्री राघवेंद्र' यांच्यावरील त्याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आणि त्यात त्यांनी अभिनयही केला. यामुळे, सर्वसंगपरित्यागाच्या वाटेवरचं धार्मिक व्यक्तिमत्व, अशी त्यांची प्रतिमा झाली. 'वल्ली'सारख्या चित्रपटांनी ही प्रतिमा दृढमूल केली.
 
याच काळादरम्यान, हळूहळू राजकारणाची सावली त्यांच्या पाठोपाठ यायला लागली. 'अण्णामलाई' व 'मुथू' या चित्रपटांमधील त्यांच्या संवादांचं विच्छेदन करून त्यांचे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले. 'बच्छा' चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी आयोजित समारंभामध्ये त्यांनी केलेलं भाषण आणि 1996 च्या निवडणुकांमधील त्यांचा आवाज, यांकडे देशभरातील लोकांचं लक्ष गेलं.
 
राजकारणात प्रवेश
त्यानंतर 2017 सालपर्यंत राजकारणातील त्यांच्या प्रवेशाबद्दलची अनुमानं केवळ अनुमानंच राहिली. त्यांनी २०१७ साली राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली असली, तरी ठोस भूमिका घेतली नव्हती. त्यांची अस्वस्थता आणि टाळाटाळ करण्याची वृत्ती नवीन नाही.
 
जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाबद्दल 1996 साली राज्य पातळीवर असमाधान निर्माण झालं होतं, तेव्हा रजनीकांत यांना आघाडीवर ठेवून काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवायची होती, असं सांगितलं जातं. त्या वेळी रजनीकांत यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली, असंही म्हटलं जातं. 1996 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करायला नकार दिल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते.
1975 साली एका छोट्या पात्राद्वारे तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या रजनीकांत यांनी अनेक भाषांमध्ये विविध भूमिका केल्या. कोणतीही भूमिका निभावतांना त्यांना संकोच वाटला नाही, त्यांनी प्रत्येक पात्र स्वतःच्या विशिष्ट ढंगामध्ये केलं.
 
पण राजकारणाच्या बाबतीत मात्र संकोचून जाणं हीच त्यांची खास शैली झाली आहे. या पार्श्वभूमीवर, तामीळनाडूत दोन द्रविडी पक्षांचं वर्चस्व असताना रजनीकांत यांना कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं आहे, हाच त्यांच्या समोरचा सर्वांत मोठा प्रश्न आहे.
 
आपण 'भ्रष्टाचारमुक्त धार्मिक राजकारण' करू, असं रजनीकांत म्हणतात. कथितरित्या भ्रष्ट द्रविडी पक्षांच्या विचारसरणीमध्ये ईश्वराला किंवा धर्माला मध्यवर्ती स्थान नाही, त्यामुळे हा एक व्यवहार्य पर्याय असल्याचं रजनीकांत यांना वाटत असावं.
 
पण तामिळनाडूमध्ये भाजपनेही अशीच विचारसरणी भूमिका घेतलेली असल्यामुळे, रजनीकांत यांना त्यांच्या पक्षाचं वेगळेपण स्पष्ट करून सांगावं लागेल.
 
एकेकाळी नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जाणारे रजनीकांत कालांतराने तामिळ चित्रपटांमधील संतप्त तरुण बनले. कारकीर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्या चित्रपटांमध्ये सरंजामी आदर्शांचं प्रतिबिंब पडत होतं. स्त्रियांनी कसं वागावं, याबद्दल ते त्यांच्या चित्रपटांमध्ये खूप बोलत असत. 1990 च्या दशकात त्यांनी जयललितांविरोधात व्यक्त केलेली मतं या विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.
गतकाळात त्यांनी अनेक संमिश्र संकेत दिले होते. पण त्यांचे विचार नक्की कोणत्या धाटणीचे आहे, याचा थांग कोणालाही लागू शकला नाही. 2017 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हाच्या त्यांच्या विधानांमधूनही असेच संमिश्र संकेत मिळत होते. सरकारविरोधात लोकांनी निदर्शनं करू नयेत, असं वाटणाऱ्या नेत्यांपैकी ते आहेत की काय, अशीही शंका काहींना त्या वेळी आली.
 
रजनीकांत एमजीआर ठरतील की शिवाजी ठरतील?
आरक्षणांसाठी निदर्शनं, हिंदीविरोधी निदर्शनं, इथपासून ते जल्लिकट्टूच्या बाजूने झालेल्या निदर्शनांपर्यंत तामिळनाडूचा राजकीय इतिहास केवळ निदर्शनांनीच पुढे नेलेला आहे. या राज्यात धर्म हा मतपेढीच्या राजकारणाचा आधार कधीच नव्हता.
 
या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी पूर्णतः विसंगत विचारसरणी मांडली आहे. जिंकण्यासाठी त्यांना लोकांसमोर या विचारसरणीचं समर्थन करावं लागेल. त्यांना 2021 साली स्वतःला सिद्ध करण्याची एकमेव संधी मिळेल.
 
रजनी-कमल या जोडीने एमजीआर-शिवाजी गणेशन या नायकांची जागा घेतली, तेव्हा लोकांनी आनंदाने रजनीकांत यांची तुलना एमजीआर यांच्याशी केली, तर कमल हसन यांची तुलना शिवाजी गणेशन यांच्याशी केली. या तुलना चित्रपटांपुरत्याच मर्यादित राहिल्या होत्या. पण आता राजकारणाच्या मैदानात रजनीकांत एमजीआर ठरतात की शिवाजी गणेशन ठरतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.