शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (09:43 IST)

लोकसभा निवडणूक : शरद पवारांना गडकरी आणि राजनाथ यांच्या भविष्याची चिंता का वाटते?

'नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग या दोघांच्याही भविष्याची मला चिंता वाटते' असं म्हणत 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या गोटात पंतप्रधानपदावरून चाललेल्या रस्सीखेचीवर बोट ठेवलं आहे. त्यांचा रोख सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतल्या संभाव्य निकालाकडे होता. पवार यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
 
"मला तर नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह या दोघांचीही चिंता वाटते. दोघेही आमचे चांगले मित्र आहेत आणि भली माणसं आहेत. जर त्यांची नावं पंतप्रधानपदाच्या चर्चेत असतील तर मला त्यांच्या भविष्याविषयी चिंता वाटते, कारण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा या दोघांच्या बाबतीत दृष्टीकोन कसा असेल याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. त्यांच्या निवडणुकीत काय केलं असेल हे मी सांगू शकत नाही," पवार या मुलाखतीत म्हणाले. 
 
'भाजपा' आणि 'एनडीए' जर बहुमतापर्यंत पोहोचू शकले नाही आणि सरकार स्थापन करायला नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदाचा पर्याय शोधावा लागला तर गडकरी आणि राजनाथ सिंह यांची चर्चेत आहेत. गडकरी नागपुरातून आणि राजनाथ हे लखनौमधून निवडणूक लढवताहेत. 
 
जर त्यांना निवडणुकीत होऊ शकणा-या दगाफटक्याविषयी पवार बोट दाखवताहेत तर भाजपात ज्यांच्याकडे सत्ता आहे ते असं करू शकतात का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. "दुसरं कोण करणार? बाकी कोणाला त्यात काय स्वारस्य असेल? ज्यांचं काही स्वारस्य असेल किंवा ज्यांचा हेतू त्यानं सफल होत असेल तर तेच हे करू शकतात," पवार म्हणाले. म्हणजे मोदी-शाह गटाकडे त्यांचा रोख आहे का या प्रश्नावर मात्र, "ते मला माहीत नाही. भाजपामध्ये दुस-या कोणाच्या इच्छा-आकांक्षा आहेत हे मला माहीत नाही," असं उत्तर पवारांनी दिलं. 
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी 'बीबीसी मराठी आणि 'बीबीसी हिंदी'ला विस्तृत मुलाखत दिली. त्यात ते नरेंद्र मोदी पवारांवर करत असलेली टीका, माढा मतदारसंघातली त्यांची निवडणूक, राज ठाकरेंच्या होत असलेल्या सभा या सहीत अनेक विषयांवर त्यांनी विधानं केली आहेत. 
 
पंतप्रधानांचे बोलणं पोरकटपणाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या प्रचारसभांमध्ये शरद पवारांना सतत टीकेचं लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरही 'शरद पवार नेमके कोणत्या बाजूला उभे आहेत' असा प्रश्न मोदींनी पवारांना भाषणात विचारला. "दुष्काळासारखे मूळ प्रश्न जे आहे आहेत त्याबद्दल लोकांच्या मनात असलेला संताप आहे त्याचा सामना करण्याची स्थिती नाही म्हणून त्याला बगल देण्याचा हा प्रकार आहे," पवार या टीकेला उत्तर देतात. 
 
"ते जे विचारतात की तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात, हे विचारणं पोरकटपणाचं आहे. या देशातल्या जबाबदार नागरिकाला राष्ट्रीयत्वाची शिकवण ही नरेंद्र मोदींकडून घेण्याची गरज नाही. सामान्य माणसासाठीही जेव्हा जेव्हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न येतो, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा बाकीच्या कोणत्याही गोष्टी नसतात. तिथं राजकारणही येत नाही. पुलावामा हल्ल्यानंतरही जी सर्वपक्षीय बैठक झाली तिच्यात इतर कुठलाही पक्ष नाही, आम्ही सगळे सैन्याच्या सोबत आहोत, अशी भूमिका आम्ही घेतली. त्यामुळे तुम्ही कुठं उभे आहात, तुमची भूमिका काय राहणार, हा प्रश्न पोरकटपणाचा आहे,'' असं पवार मोदी यांच्या टीकेबद्दल या मुलाखतीत म्हणाले. 
 
२०१४ चा भाजपाचा पाठिंबा हा सेनेसाठी गुगली होता
भाजपासोबत, विशेषत: नरेंद्र मोदींसोबत पवारांचे संबंध केंद्रात ते सत्तेवर आल्यानंतर जवळचे राहिले होते. मोदींच्या त्यांनी अनेक वेळेस घेतलेल्या भेटींमुळे भाजपा-राष्ट्रवादीच्या मधुर संबंधाबाबत महाराष्ट्रात वारंवार चर्चाही झाली. त्यावरून राष्ट्रवादीला टीकात्मक प्रश्नही विचारले गेले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा भाजपा बहुमतापासून काही जागा लांब राहिला तेव्हा पवारांनी तत्परतेनं पाठिंबाही देऊ केला होता. पण आता दोघांची एकमेकांवर होत असलेली टीका पाहता त्यावेळेस केलेली मदत शरद पवारांना चूक वाटते का? 
 
"२०१४ मध्ये विधानसभेच्या ज्या निवडणूका झाल्या त्यामध्ये भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगळे वेगळे लढले. बहुमत कोणालाच नव्हतं. शक्यता एकच होती भाजपा आणि सेना हे एकत्र येणं. ते एकत्र येणार याबद्दल १०० टक्के खात्री मला होती. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांना सत्तेत सहभागी झाल्याशिवाय पक्ष चालवणं सोपं जात नाही. केंद्रात तर शिवसेना सत्तेत होतीच. राज्यात सत्तेत जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न होणार होता. त्याला कुठेतरी अडथळा निर्माण करावा त्यासाठी आम्ही टाकलेला तो गुगली बॉल होता.
 
"आम्हाला हे माहित होतं की हे काही आमचं फार दिवस टिकणार नाही. पण निदान ५-६ महिने तरी ते टिकलं. भाजपानं त्यांना लगेच सत्तेत घेतलं नाही. त्या कालावधीत अगदी निवडक शब्दांचा वापर करत त्यांनी एकमेकांबद्दल 'आस्था' दाखवली. अशी टीका महाराष्ट्रानं यापूर्वी कधी पाहिली नव्हती. हे व्हावं असंच आम्हाला वाटत होतं म्हणूनच ही भूमिका आम्ही घेतली होती. आता जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सेनेसोबतच जायचं होतं. देवेंद्र फडणवीसांनी शेवटी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवलं आणि सेनेला सोबत घेतलंच, जसं आम्हाला वाटलं होतं," पवार सांगतात."
 
पण त्यांच्यावर होणारी टीका जाणूनबुजून त्यांना टारगेट करून केलेली आहे असं पवार या मुलाखतीत म्हणतात. "आज भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रांचा हल्ला क्रमांक एकने माझ्यावर दिसतो आणि माझ्यानंतर, राज्यापुरतं बोलायचं असेल, तर राज ठाकरेंवर होतो. देशपातळीवर जर बोलायचं असेल तर गांधी परिवार आणि मी या दोघांना त्यांनी टारगेट केलेलं आहे. त्याचं स्वच्छ कारण हे आहे की आज या देशात पर्याय देण्यासाठीचं जनमत तयार करायला ज्यांचे अखंड प्रयत्न सुरु आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे, त्या लोकांनाच लोकांना अडवलं पाहिजे, त्यांच्यावरच हल्ला केला पाहिजे, या भावनेतनं आम्हाला टारगेट केलं जात आहे. ज्यावेळेस आपण टारगेट होतो, तेव्हा मला समजतं की आपली दिशा बरोबर आहे. आपली पावलं बरोबर पडताहेत. म्हणून मला त्याच्यात समाधान आहे,'' पवार म्हणतात.
 
माढ्यातून निवडणूक लढवणारच नव्हतो
शरद पवारांनी यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायची ठरवणं, पण त्याचवेळेस पार्थ पवार यांच्या मावळमधून निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी न लढण्याचं ठरवणं हा घटनाक्रम राष्ट्रवादी अंतर्गत आणि पवार कुटुंबीयांबाबतही चर्चेचा ठरला. कुटुंबातून एका वेळेस दोघांनीच निवडणूक लढवावी या मतामुळं मी माढ्यातून निवडणूक लढवणार नाही असं पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. पण ते माढ्यातून कधीच निवडणूक लढवणार नव्हते असा खुलासा त्यांनी 'बीबीसी'च्या या मुलाखतीत केला आहे. 
 
"मी माढ्यातनं निवडणूक लढणार होतो यात काही तथ्य नाही. तिथं आमच्या लोकांमध्ये एकवाक्यता होत नव्हती म्हणून मी म्हटलं की तुम्ही एकत्र होत नाही तर मी उभं राहतो. याचा अर्थ मी उभा राहणार होतो असा नाही. २०१४ ला मी उभा राहिलो नाही. गेल्या ५ वर्षांत मी लोकसभेमध्ये नाही. मग आत्ता मी कशासाठी उभा राहीन? गेल्या वेळेस माढ्याची जागा मी विजयसिंह मोहितेंना सोडलो होती ना? ती सोडली त्याचवेळेस मी ठरवलं की लोकसभेच्या निवडणुकीला उभं रहायचं नाही. त्यामुळं यावेळेस लढवण्याचा प्रश्नच नाही," पवार या मुलाखतीत म्हणतात.
 
त्याचवेळेस त्यांचे ब-याच वर्षांचे सहकारी असणा-या विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याच्याच प्रकरणात पवारांची साथ सोडणं यावरही पवार या मुलाखतीत बोलले. "विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे सहकारी होते. आम्ही सातत्यानं त्यांच्यासोबत उभे होते. माढ्याच्या जागेवर आम्ही काही असेसमेंट केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या मते विजयसिंह मोहितेंना निवडून येणं शक्य होतं. पण त्यांच्या चिरंजीवांसाठी जो त्यांच्या आग्रह होता, त्याला त्या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे आमदार आहेत, त्यातले एक सोडले तर कोणाचाही पाठिंबा नव्हता. त्या सगळ्यांचा पूर्णपणानं विरोध होता. त्यामुळं आम्ही आग्रह करत होतो की विजयसिंह मोहितेंनीच निवडणूक लढवली पाहिजे. पण त्यांचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आम्हाला ते मान्य करता आलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या चिरंजीवांनी दुस-या टोकाला जायची भूमिका घेतली," पवार म्हणतात.
 
'वंचित आघाडी'बद्दल मी भाष्य करणं योग्य नव्हे
प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवेसी यांच्या 'वंचित बहुजन आघाडी'बद्दल कोणतही भाष्य या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी केलं नाही. या आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला तोटा होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे. 
 
"याबद्दल मी काही फार भाष्य करणार नाही. निवडणुकीनंतर त्याचे परिणाम कळतील. काही गोष्टी या माध्यमांमधून मोठ्या केल्या जातात. काही वेळेला सत्ताधारी पक्ष मतविभागणीसाठी काही घटकांबद्दल भूमिका घेत असतात. त्यामुळं अशा गोष्टींच्याबद्दल माझ्यासारख्यानं भाष्य करणं योग्य नसतं. निवडणूक झाल्यावर काय ते कळेल आपल्याला,''असं पवार म्हणाले.
 
विधानसभेला राज ठाकरे सोबत असतील का हे ठरले नाही
राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत आणि भाजपाच्या विरोधात असलेल्या या सभांचा आघाडीला फायदा होईल असं म्हटलं जात आहे. राज ठाकरेंना आघाडीत घ्यावं याबद्दल 'राष्ट्रवादी'च्या काही नेत्यांचा आग्रहही होता. मग त्यांना सोबत का घेतलं नाही?
 
"राज ठाकरेंनी आघाडीसोबत यावं असं आमच्या सोबत यावं असं जरूर काही सहका-यांचं मत होतं, पण आघाडीत त्याबाबत एकवाक्यता होती असं म्हणता येणार नाही. आम्हीही त्याबाबत आग्रहानं पुढे गेलो नाही कारण राज ठाकरेंनी लोकसभेला उमेदवार उभे करणार नाही अशी स्वच्छ भूमिका घेतली होती. त्यामुळे, ते बरोबर आले किंवा नाही, त्यांचे उमेदवार उभे करायचे नाहीत ही स्पष्ट भूमिका होती. त्यांनी हेही आम्हाला सांगितलं की माझं लक्ष विधानसभेवर आहे. त्यामुळं आम्ही पुढे आग्रह केला नाही,'' पवार म्हणाले.
 
पण जर विधानसभा हे राज ठाकरेंचं उद्दिष्ट असेल तर त्या निवडणुकीत त्यांना सोबत घेण्यात येईल का? "आज त्याविषयी सांगता येणार नाही. त्यावेळेची परिस्थिती काय असेल हे आज समजणार नाही. आम्ही आणि कॉंग्रेसची विधानसभेच्या जागा लढवण्याची चर्चा अद्याप झाली नाही आहे. अन्य पक्ष आमच्याबरोबर येणार आहेत त्यांचं काय, या अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. अगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा करून, केवळ मी आणि राष्ट्रवादी नाही, तर इतर सगळ्यांशी संवाद साधता येणार नाही. त्यामुळं आज त्यासंबंधी भाष्य करता येणार नाही," पवार म्हणाले.
 
पण शरद पवारांची इच्छा काय आहे? राज ठाकरेंनी सोबत यावं का? "यात इच्छा वगैरे काही नाही. राजकारणात इच्छा नसतात. मी एका पक्षाचा प्रमुख आहे. माझा निर्णय असतो," पवार स्पष्ट करतात.
 
निवडणुकीअगोदर 'महागठबंधन' शक्य नव्हतं
कॉंग्रेस-राष्ट्रवादी राज्यात एकत्र लढते आहे, पण देशभरात मात्र सारे विरोधक आपापल्या राज्यांमध्ये वेगळे लढताहेत. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर 'महागठबंधन'ची चर्चा सुरु झाली. शरद पवारांच्याच पुढाकाराने त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकाही झाल्या. पण लोकसभा निवडणुकीअगोदर महागठबंधन प्रत्यक्षात आलं नाही. त्याचा भाजपाला फायदा होईल का? 
 
"आमच्या बैठका झाल्या. पण एका बाबतीत स्पष्टता होती की आम्ही गठबंधन करून आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याच्या स्थितीला पोहचू असं नाही. याचं कारण जे आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यांचं देशातल्या प्रत्येक राज्यात शक्ती होती असं नाही. कॉंग्रेस आणि बसपा यांचा काही जास्त राज्यांमध्ये विस्तात होता. त्यामुळं आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि पर्याय देऊ हे शक्य नव्हतं. पण निवडणुकीनंतर काही पर्याय देण्याच्या शक्यतेची सुरुवात निवडणुकीअगोदरच केली पाहिजे, निवडणुकीमध्ये कटुता टाळली पाहिजे हे त्या बैठकांमागचं सूत्र होतं. २००४ मध्ये असेच आम्ही वेगवेगळे लढलो होतो आणि निवडणुकीनंतर आम्ही 'यूपीए'ची स्थापना केली. त्यामुळे आजसुद्धा आमच्या मनामध्ये तीच कल्पना आहे," असं पवार या मुलाखतीत म्हणाले.  
 
पर्रिकर गोव्यात परत का गेले? 
 गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्याबद्दल केलेल्या विधानावरून शरद पवार आणि भाजपामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत वाद सुरु आहेत. पर्रिकरांनी केंद्रात संरक्षण मंत्रीपद राफेलच्या मुद्द्यावरून सोडलं होतं अशा आशयाचं विधान पवारांनी केलं. त्यावर उत्तर म्हणून पर्रिकरांच्या मुलानं पवारांना उद्देशून जाहीर पत्रही लिहिलं. या मुलाखतीत पवारांना त्यांच्या या विधानाबद्दलही विचारलं गेलं. 
 
"पर्रिकरांचा मी आदर करतो. माझ्या परिचयाचे होते. केंद्रात संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी घेतली. पण त्यानंतर लगेचच ते गोव्यात परत गेले. त्यांनी ही जबाबदारी का सोडली? त्यांच्या परिवाराचे सदस्य म्हणतात की त्यांच्या प्रकृतीचं कारण होतं. प्रकृतीचं कारणच जर असेल तर ते आजचं तर नसेल. त्यांनी जबाबदारीचा स्वीकार का केला? त्यांनी विचारपूर्वक ती जबाबदारी घेतली होती. मीही देशाचा संरक्षणमंत्री होतो. दोन्ब वर्षांनी मी जेव्हा परत आलो महाराष्ट्रात तेव्हा मला यायचं नव्हतं. पण मला मुंबईला दंगली झाल्या म्हणून परत यावं लागलं.
 
नरसिंह राव तेव्हा पंतप्रधान होते. त्यांनी मला फोर्स करून परत पाठवलं. इथं तर पर्रिकरांना कोणी तसा फोर्स केला नव्हता. त्यांना कोणी जाण्यासाठी सांगितलं नव्हतं. त्यामुळे आमच्या मनात शंका आहे की पॉलिसीबद्दल काही ना काही असणार. कारण पर्रिकर हे स्वतंत्र विचाराचे व्यक्ती होते. मी त्यांना अनेकदा भेटलो होतो. आमची अनेकदा चर्चाही व्हायची. कायम त्यांचा स्वत:चा काही दृष्टीकोन असायचा. त्यामुळे अशी व्यक्ती इतकी महत्वाची जबाबदार सोडून परत जाते, याबाबत आमच्या मनात शंका आहे. त्यामुळे काही तरी वेगळी गोष्ट असणारचं जी एक सभ्य व्यक्ती आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे ते बोलू शकले नाहीत. ती गोष्ट राफेल असून शकते, धोरणांविषयी असू शकते."