शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा
'शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावं'
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.
अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही घोषणा केली आहे. 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
गेल्या 11 दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसंच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरियाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली असं राऊत म्हणाले.