शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (16:54 IST)

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: 'आफताब माझी हत्या करुन तुकडे करेल', श्रद्धाने दिली होती तक्रार

shradha valkar
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांच्या हाती नवीन माहिती आली आहे. त्यानुसार श्रद्धा वालकरला तिच्या हत्येबाबत संशय होता असं पत्र समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
श्रद्धा वालकरने 2020 च्या नोव्हेंबरमध्ये पालघर जिल्ह्यात पोलिसांकडे तक्रार दिली होती. तिने त्यात म्हटलं होतं की आफताब म्हणतो तो माझी हत्या करेन आणि माझे तुकडे करून फेकून देईल.
 
पीटीआय वृत्तसंस्थेनी सांगितले की श्रद्धाने तुळिंज पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यात तिने लिहिलं होतं की आफताब मला मारहाण करतो. आज त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याने म्हटले की तुझा खून करुन तुकडे करून फेकून देईल.
 
तक्रारीत तिने म्हटले होते की गेल्या सहा महिन्यापासून तो मला मारहाण करत आहे. तिने म्हटले की मला पोलिसांकडे येण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून मी येत नव्हते पण आता हे असह्य होत आहे त्यामुळे मी ही तक्रार देत आहे.
 
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली होती पण नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली.
 
श्रद्धा वालकर हिने 2020 मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते."
 
आफताबने दिली हत्येची कबुली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.
 
बार अँड बेंचच्या माहितीनुसार, दिल्लीतल्या साकेत कोर्टात मंगळवारी (22 नोव्हेंबर) आफताब पुनावालाला व्हीडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आलं. कोर्टासमोर गुन्ह्याची कबुली देतानाच आफताबनं म्हटलं की, "जे काही मी केलंय, ते चुकून केलंय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली."
 
आफताबनं असंही म्हटलं की, "माझ्याविरोधात जी माहिती पसरवली जातेय, ती बरोबर नाहीय. पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य मी करतोय. मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे फेकले, हे मी पोलिसांना सांगितलं."
 
माध्यमांच्या वृत्तांनुसार, आफताबने पोलीस तपासात हेही सांगितलं की, श्रद्धाला मारण्यासाठी वापरलेलं ब्लेड गुरुग्राममधील डीएलएफ फेज तीनच्या जवळील झाडांमध्ये फेकलं.
 
गेल्या शुक्रवारी दिल्ली पोलीस मेटल डिटेक्टर घेऊन गुरुग्राममध्ये गेले होते. मात्र, तिथे गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र सापडले नव्हते.
 
पुढील काही दिवस पोलीस तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. कारण या प्रकरणात पोलिसांना अद्याप कुठलेच महत्त्वाचे पुरावे सापडले नाहीत.
 
कवटी आणि हाडांचे तुकडे सापडले
दिल्ली पोलिसांना रविवारी (20 नोव्हेंबर) ला श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भात दक्षिण दिल्ली भागातून कवटीचे काही तुकडे आणि हाडं मिळाली आहेत.
 
त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीच्या मैदानगढी भागातील एक तलाव देखील रिकामा केला आहे.
 
आतापर्यंत या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोणताही मोठा पुरावा मिळाल्याचं सांगितलेलं नाही.
 
त्यामुळे तपासकर्त्यांसाठी दिवसेंदिवस अनेक अडचणी निर्माण होत आहे.
Published By -Smita Joshi