मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (12:59 IST)

कोरोना व्हायरस : अनोळखी व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणारी 'रिअल हिरो'

-सुशीला सिंह
"मॅडम, ही वर्दीच खूप शक्ती देते."
 
हा कदाचित कोणत्या फिल्मचा डायलॉग आहे, असं वाटेल. पण संध्या शिलवंत यांच्याशी बोलताना त्यांच्यातल्या सकारात्मकता आणि उदार मनासोबतच त्यांच्यातला 'रिअल हिरो'ही दिसत राहतो.
 
मुंबई पोलिसात नाईक पदावर काम करणाऱ्या संध्या शिलवंत यांचं सध्या खूप कौतुक केलं जातंय.
 
त्यांचं कौतुक करणारं ट्वीट करताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलं होतं, "शाहूनगर पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संध्या शिलवंत यांनी एकाच दिवशी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. आजवर त्यांनी असे सहा अंत्यसंस्कार केले आहेत. 'सामाजिक बांधिलकीची जाणीव असली की, भीतीचे दरवाजे बंद होतात' हे त्यांचं वाक्य फक्त पोलीस दलासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे."
 
एकाच दिवशी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार
कोव्हिड 19 च्या साथीच्या काळात संध्या यांनी एकाच दिवशी 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यापैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह होता.
 
त्या सांगतात, "14 मे रोजी मी चार मृतदेहांवर तर 24 मे रोजी दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. 26 मे रोजी आणखी दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा मुकाबला करत असताना या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत."
 
राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार व्यक्त करताना त्या हसतमुखाने सांगतात, "हे माझं काम आहे. समाजासाठीचं माझं कर्तव्य मी करतेय. माझं कौतुक होतंय म्हणून मी असं बोलतेय असं तुम्हाला कदाचित वाटेल. मी फक्त माझी सकारात्मकता कायम ठेवते. बस!"
 
संध्या ज्या विभागात काम करतात तिथल्या कामासाठी त्यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात जावं लागतं. तिथे सगळ्या प्रकारच्या केसेस येतात. यामध्ये कोव्हिडचे रुग्णही असतात आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.
 
संध्या सांगतात, "महाराष्ट्रात केसेस वाढत आहेत. आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांच्याही टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये अनेक पोलिसांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली. मला कोरोना होऊ शकतो हे मी मनात येऊ दिलं नाही."
 
"पोलिसांमधलं कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याचं समोर येतंय. यामुळे स्टाफचा तुटवडा जाणवतोय. अशात मी घाबरून ऑफिसला येणं बंद करून कसं चालेल?"
 
तुमची मुलं लहान आहेत, असं म्हटल्यानंतर आपण मुलांशी कामाविषयी काहीही बोलत नसल्याचं संध्या सांगतात. मग तुमचा फोटो वर्तमानपत्रात आल्यानंतर तुम्ही अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपैकी एक पॉझिटिव्ह असल्याचं तुमच्या 13 वर्षांच्या मुलीला समजलं असेल, असं विचारल्यावर संध्या मुलीने "काँग्रॅट्स" म्हणत त्यांचं अभिनंदन केल्याचं संध्या सांगतात.
 
'हे तर पुण्यकर्म'
वडील आणि सासरे अशा दोघांनीही पोलीस खात्यात काम केलं असल्याने आपल्या आईला आणि सासूलाही या कामाविषयी माहिती असल्याचं संध्या सांगतात. सध्या कोव्हिडची साथ सगळीकडे पसरलेली असल्याने घरी गेल्यानंतरही त्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतात.
 
संध्या सांगतात, "मी गेली दोन वर्षं ADRचं काम पाहातेय. आतापर्यंत मी 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. माझ्यासाठी हे एक पुण्याचं काम आहे. मागच्या जन्मीचं काही असेल तर तुम्हाला असं सौभाग्य मिळतं. ज्यांचं कोणीही नाही अशांचे अंत्यसंस्कार तुम्ही करणं हे इतर होणत्याही पुण्यकर्मापेक्षा कमी नाही."
 
बेपत्ता, हरवलेल्या वा अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, की ADR विभागातल्या व्यक्तीचं काम सुरू होतं. संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेला असल्यास अनेकदा शरीराचे अवयव फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येतात. फुफ्फुसं, हृदयासारखे अवयव प्रयोगशाळेकडे घेऊन जाणं आपलं काम असल्याचं संध्या सांगतात. तपासणीनंतर त्या अंतिम शवविच्छेदन अहवाल अधिकाऱ्यांकडे सोपवतात. यादरम्यान अनेकदा मृताचे नातेवाईक येऊन शव घेऊन जातात.
 
मरण पावलेल्या ज्या लोकांचं शव घ्यायला कोणीही येत नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचं संध्या सांगतात. कोव्हिड-19मुळे सध्या त्यांना मृतदेहांवर ताबडतोब अंत्यसंस्कार करण्यास सांगण्यात आलेलं आहे. पण ज्या प्रकरणांमध्ये तपासाची गरज असते, त्या प्रकरणांमध्ये शव दीर्घ काळापर्यंतही ठेवण्यात येत असल्याचं त्या सांगतात.
 
संध्या सांगतात, "माझ्या नातलगांचा मृत्यू झाल्यावरही मी कधी स्मशानात गेले नव्हते. कारण हिंदू धर्मात महिला स्मशानात जात नाहीत. पण आता ही माझी ड्युटी आहे."
 
कोव्हिड-19 दरम्यान काम करत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचं एकीकडे कौतुक होतंय तर दुसरीकडे काही प्रकरणांमध्ये कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घ्यायला नातेवाईकांनी नकार दिल्याचं वा त्यांना आपल्या भागात दफन करायला विरोध केल्याचंही समोर आलंय.
 
तामिळनाडूमधले एक डॉक्टर सायमन हर्क्युलस यांचं प्रकरणही माध्यमांमध्ये चांगलंच गाजलं होतं. त्यांच्या पार्थिवाचं दफन करण्यासाठी आलेल्या अॅम्ब्युलन्सवर त्या भागातल्या रहिवाशांनी हल्ला केला. आणि मग पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले होते.
 
अशा सगळ्या घटना घडत असतानाच दुसरीकडे संध्या शिलवंतांसारखे लोकही आहेत ज्यांच्यासाठी कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत असे लोक आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाहीत.