1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (12:51 IST)

तेजस उद्धव ठाकरे राजकारणात एंट्री करत आहेत का?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी (20 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीच्या फोटोंमध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेही दिसत होते.
 
इतक्या महत्त्वाच्या राजकीय बैठकीत तेजस ठाकरे कशासाठी उपस्थित होते? तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत का? असे प्रश्न या बैठकीनंतर उपस्थित होऊ लागले.
 
तेजस ठाकरे बैठकीत काय करत होते?
तेजस ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या प्रचारात उतरलेले पहायला मिळाले होते. ते राजकीय बैठकांमध्ये कधी फारसे दिसले नाहीत. उद्धव ठाकरेंनी अनेकदा त्यांच्या भाषणात तेजस हा जंगलात - निसर्गात रमणारा माणूस आहे असं म्हटलं आहे.
 
मग तेजस ठाकरेंना आता राजकारणात रस निर्माण झाला आहे का? का राजकारणात येण्याची हीच ती योग्य वेळ आहे ?
याबाबत बोलताना शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणतात, " ते थेट बैठकीत होते की त्यांची ठाकरेंचं कुटुंब म्हणून ओळख करून दिली याची कल्पना नाही. पण तेजस ठाकरे यांनी पर्यावरणामध्ये काही शोधसुद्धा लावलेले आहेत. त्याचं कुतूहल म्हणून सुद्धा के चंद्रशेखर राव हे तेजस ठाकरे यांना भेटले असतील. राहिला प्रश्न तेजस ठाकरे राजकारण येण्याचा, तर आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तेजस ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्या प्रचारात ते सहभागी झाले होते. त्यामुळे जर ते राजकारणात आले तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे."
 
जेव्हा आदित्य ठाकरेंचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरेंचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेना ही तोडफोड सेना असेल."
 
जेष्ठ पत्रकार संदीप प्रधान याचं विश्लेषण करताना म्हणतात, "आज मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी बैठक होती. त्याच बैठकीत उपस्थित राहण्याचं तेजस यांचं काय कारण आहे? यातून एक राजकीय अर्थ असा दिसतो की, तेजस ठाकरे राष्ट्रीय राजकारणात रस घेताना दिसत आहेत. इतक्या महत्वाच्या बैठकीतच ते कसे उपस्थित राहिले? आदित्य एकीकडे राज्यभर दौरे करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे पवार घराण्यात सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात अशा अघोषित वाटण्या आहेत. तसच आदित्य ठाकरे राज्यात आणि तेजस केंद्रात असं करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार असू शकेल. "
घराणेशाहीला असणाऱ्या बाळासाहेबांच्या विरोधाचं काय?
बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीच्या राजकारणाला कायम विरोध केला आहे. वर्षानुवर्षे बाळासाहेब ठाकरे हे सांगत राहिले की, आमच्या पक्षात घराणेशाही नाही. कॉंग्रेसला संबोधताना 'संजय गांधी आणि कंपनी' असा उल्लेख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक भाषणात आहे. मग ठाकरे कुटुंबातील तिसर्‍या व्यक्तीचं राजकारणात सक्रिय होणं हे योग्य आहे का?
 
याबाबत बोलताना शिवसेना आमदार आणि प्रवक्ता मनिषा कायंदे म्हणतात, "अनेक आमदार, खासदारांची मुलं-मुली राजकारणात येतात. पण त्यांना काम हे करावं लागतं. जर लोकांची कामं केली नाहीत तर ते बाहेर फेकले जातात. याची अनेक उदाहरणं राजकारणात आहेत. त्यामुळे तेजस ठाकरे हे जरी आले तरी त्यांना कामातून सिध्द करूनच पुढे जावं लागेल. आदित्य ठाकरे आज आले, उद्या आमदार झाले असं नाही झालं. त्यांनी युवा सेनेचे 10 वर्षे काम केलं. ते विधीमंडळाच्या कामकाजात लक्ष घालायचे. अनेक बैठकांना उपस्थित असायचे मग ते आज आमदार आणि मंत्री झाले. तेजस ठाकरे आले तरी हेच होईल. त्यांनी पर्यावरणात लावलेल्या शोधातून स्वत:ला अनेकदा सिध्द केलय. "
 
घराणेशाहीला विरोध करताना ठाकरे घराण्यातच घराणेशाही सुरू झाली. बाळासाहेबांसोबत राज ठाकरे हे राजकारणात होतेच. त्याचबरोबर नंतर उद्धव ठाकरे ही राजकारणात आले. उद्धव ठाकरे नंतर त्यांची तिसरी पिढी म्हणजे आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या उपस्थितीत राजकारणात प्रवेश केला.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "विरोध करायचा म्हणून हा मुद्दा ठीक आहे. पण जेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे राजकारणात आले तेव्हाच हे तत्व मागे पडलं. त्याला आता इतकासा अर्थ उरला नाही".
 
कोण आहेत तेजस ठाकरे?
तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. त्यांचं वन्यजीव प्रेम अनेकदा अधोरेखित झाले आहे.
 
2014 साली त्यांनी एक पाल शोधली. मात्र, गेली पाच वर्षं ही पाल खरंच वेगळ्या प्रजातीची आहे का, यावर संशोधन झालं आणि अखेर प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तेजस आणि त्यांच्या टीमने या पालीवर तयार केलेला शोधनिबंध 'झुटाक्सा' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नलमध्येही प्रसिद्ध झालं.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पश्चिम घाटातच सापाची एक नवी प्रजाती शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं. गोड्या पाण्यातल्या खेकड्याचीही दुर्मिळ जात त्यांनी आणि त्यांच्या टीमने शोधून काढली होती.
 
लहानपणापासूनच तेजसला प्राण्यांची आवड असल्याचं कात्रजच्या स्नेक पार्कचे संस्थापक नीलिमकुमार खैरे सांगतात. स्वतः उद्धव ठाकरे यांनाही प्राण्यांची आवड होती. ते तेजसला घेऊन अनेकदा कात्रज स्नेक पार्कला जायचे. तिथेच तेजस आणि खैरे यांची ओळख वाढली.
 
सापाची जी नवी प्रजाती तेजस यांनी शोधून काढली त्याबद्दल सांगताना खैरे म्हणतात, "मी वर्षानुवर्षं हा साप बघत होतो. मी, तेजस आणि इतर काही जण आंबोलीला गेलो होतो. त्या सापाकडे बघून तो मला म्हणाला, अण्णा तुम्हाला काय वाटतं, हे काय असेल. मी म्हणालो, काहीतरी वेगळं आहे. खरंतर मी ते रोजच बघत होतो. पण हा साप वेगळा आहे, ही नजर त्याच्याकडे होती. जे आमच्या नजरेतून सुटलं ते त्याला बरोबर सापडलं. म्हणून मी म्हणेन की तेजस फक्त वन्यप्रेमी नाही तर तो संशोधक आहे."
 
पण ते राजकारणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात.