शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (12:42 IST)

के. चंद्रशेखर राव उद्धव ठाकरेंची भेट का घेत आहेत? त्यांच्या भूमिकेमागची 5 कारणं

काही दिवसांपूर्वी जवळपास सर्वच मुंबईकरांनी सकाळी-सकाळी वृत्तपत्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फोटोसह जाहिराती पाहिल्या. जवळपास सगळ्याच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली होती.
पण हे फक्त महाराष्ट्रातच घडत नव्हतं. देशभरातील सर्वच मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारची जाहिरात छापून आली होती.
 
इतकंच नव्हे तर त्याच्या पूर्वीही काही दिवस के. चंद्रशेखर राव आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड शब्दांत टीका केल्यामुळे त्याच्या सर्वच ठिकाणी बातम्या झाल्या होत्या. दरम्यान, आज (20 फेब्रुवारी) ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
 
के. चंद्रशेखर राव यांच्या गेल्या काही दिवसांतील हालचाली पाहिल्यास त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीकेची धार वाढवल्याचं सहज दिसून येईल. पण चंद्रशेखर राव यांनी अचानक ही भूमिका घेण्याचं कारण काय आहे?
एका बाजूला केंद्र सरकारवर राज्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप होत आहे. GST किंवा राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांवरून केंद्र आणि राज्य यांच्यात रोजच नवी खडाजंगी होत असल्याचं दिसून येतं.
 
या सर्व कुरघोडींचं कारण राव यांच्या नाराजीला आहे का? वरकरणी तसं वाटत असलं तरी के. चंद्रशेखर यांच्या वादाचं कारण ते असण्याची शक्यता नाही. राव यांच्या या भूमिकेमागे खालील पाच कारणे असू शकतात.
 
1. तिसऱ्या डावास सज्ज
पहिला डाव किंवा दुसरा डाव यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे. पण ही तिसरा डाव म्हणजे नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
 
पण राजकारणात काहीही अशक्य नाही, असं उगाचच म्हटलं जात नाही. खुद्द KCR यांनाही वाटलं नसेल की आपण या तिसऱ्या डावासाठी स्वतःला एक संधी घेऊन पाहू शकतो.
 
राव यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदा काढून पाहा, एक वाक्य त्यांच्या तोंडी नेहमीच आढळून येतं. ते म्हणजे, "मी जन्मलो तेव्हा आपला मुलगा पुढे जाऊन मुख्यमंत्री बनेल, असं माझ्या आई-वडिलांना वाटलं असेल का? पण राजकारणात काहीही शक्य आहे."
 
चंद्रशेखर राव हे दिवंगत नेते एन. टी. रामाराव यांचे खूप मोठे चाहते आहेत. इतकं की त्यांनी आपल्या मुलाचं नावही त्यांच्याच नावावरून ठेवलं.
 
राव यांनी आपली राजकीय कारकिर्द तेलुगू देसम पक्षातून सुरू केली. ते पक्षाचे मधल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जात. याच भूमिकेत त्यांनी कित्येक वर्षे पक्षात घालवली. हाच त्यांचा पहिला डाव होता, असं आपण म्हणू शकतो.
 
आता दुसऱ्या डावाबाबत बोलू. पुढे स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्द्यावरून के. चंद्रशेखर राव यांनी स्वतःचा तेलंगण राष्ट्र समिती (TRS) हा पक्ष स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी सुमारे 20 वर्ष संघर्ष करत विविध प्रकारच्या आव्हानांशी दोन हात केले.
 
तेलंगण राज्य स्थापन झालं, त्यावेळी राव हे केवळ मुख्यमंत्रीच बनले नाहीत, तर राज्याच्या राजकारणात धक्का लागू शकणार नाही, असं सर्वोच्च स्थानही त्यांनी काबीज केलं.
 
आता आपण ज्या तिसऱ्या डावाबाबत बोलत आहोत, त्याचा उल्लेख करता येऊ शकेल. आता चंद्रशेखर राव यांच्या नजरा दिल्लीकडे आहेत. त्यासाठीचे डावपेच त्यांनी सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं.
 
2. मोदी : नवे राजकीय शत्रू
राजकारणात कुणीही शत्रू नसतो, तिथं प्रत्येक जण हा स्पर्धक असतो, असं म्हटलं जातं. पण तेलंगण राष्ट्र समितीच्या राजकारणात नेहमीच त्यांची गाठ राजकीय शत्रूंशी पडली आहे.
 
भाजपप्रमाणेच TRS चं राजकारण काही प्रमाणात ध्रुवीकरणावर अवलंबून आहे. केवळ आपण तेलंगणासोबत आहोत. तर इतर जण तेलंगणाचे शत्रू आहेत, असं प्रचार-धोरण TRS कडून नेहमी वापरलं जातं.
मोदी यांचं वक्तव्य TRS च्या पथ्यावर पडलं होतं. "आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करून तेलंगण राज्य स्थापन करण्याचा निर्णय पारदर्शकपणे घेण्यात आला नव्हता. तेलंगणा राज्य निर्मितीचं विधेयक संसदेत बंद दरवाज्यांच्या आड पारित करण्यात आलं," असं मोदी एकदा म्हणाले होते.
 
याच वक्तव्यावरून के. चंद्रशेखर राव यांनी मोदी यांना तेलंगण राज्याचे शत्रू म्हणून संबोधणं सुरू केलं होतं.
 
याबाबत अधिक माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार जिंका नागराजू म्हणतात, "TRS च्या दृष्टीने 2009 मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेते तेलंगणचे शत्रू होते. 2014 मध्ये आंध्र प्रदेशातील नेते शत्रू होते. तर 2019 मध्ये चंद्राबाबू नायडू हे शत्रू होते. प्रत्येक निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी राव यांनी नवा शत्रू पुढे आणला. आता नरेंद्र मोदी हे त्यांचे शत्रू आहेत."
 
3. भाजपचं नवं लक्ष्य तेलंगणा
भारतीय जनता पक्ष तेलंगणात आतापर्यंत विरोधी पक्षातच होता, तर मोदी सरकारसोबतचे TRS चे संबंध सौहार्दपूर्ण होते. केंद्रातील भाजप सरकारने मांडलेल्या विधेयकांना TRS कडून पाठिंबा मिळत असल्याचं आतापर्यंत दिसून यायचं.
 
मात्र, तेलंगण भाजपची कमान जी. किशन रेड्डी यांच्याकडे आल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भाजप-TRS एकमेकांशी भिडताना दिसतं.
भाजपच्या बाजूने विचार करायचा म्हटलं तर भाजपला आता उत्तरेकडील राज्यात पक्ष वाढवण्यासाठी पुरेसा वाव नाही.
 
त्यामुळे त्यांनी आता इतर राज्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दक्षिणेकडे त्यांची विशेष नजर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालनंतर तेलंगण हे त्यांचं नवं लक्ष्य आहे.
 
याचाच एक भाग म्हणून केंद्रात मंत्री असलेले भाजपचे तरूण नेते जी. किशन रेड्डी रोजच्या रोज के. चंद्रशेखर यांच्यावर हल्लाबोल करताना दिसतात.
 
दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर नुकतेच विधानसभेच्या पोट-निवडणुकीत दोन जागा जिंकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला आहे. जातीय समीकरणही याठिकाणी बदलल्याचं पाहायला मिळतं.
 
राज्यशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक के. श्रीनिवासुलू याबाबत सांगतात, "पूर्वी भाजप इथं वेलमा-रेड्डी समाजावर अवलंबून होता. पण आता वेलमा नेतृत्वाखालील TRS ला टक्कर देण्यासाठी भाजप मागासवर्गीय समाजाचा आधार घेताना दिसतो. त्यांनी याच समाजावर लक्ष्य केंद्रीत केलेलं असल्याने TRS साठी ती धोक्याची घंटा ठरू शकते."
 
या सर्व घडामोडींमुळे तेलंगणात विरोधी पक्ष बनण्यासाठीची भाजप आणि काँग्रेसमधील लढाई शेवटाकडे चालल्याचंही दिसून येतं.
 
के. चंद्रशेखर राव यांच्या संकेतानंतर TRS नेही भाजपलाच आपला मुख्य विरोधी पक्ष गृहित धरलं आहे. येत्या काही दिवसांत राजकीय कुरघोडी वाढतील, असा अंदाज आहे.
 
4. डावपेचाच्या दोन बाजू
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजकारण करत असताना राव यांनी निवडलेली वेळही महत्त्वाची ठरू शकते.
 
सध्याच्या काळात एकाच वेळी दोन निशाणांवर त्यांचं लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणात देशात दोन भारत दिसत असल्याबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.
त्याला प्रत्युत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी राहुल यांच्या वडिलांवरून एक वादग्रस्त वक्तव्य केलं. पण त्या मुद्द्यावरून के. चंद्रशेखर राव यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.
 
त्या वक्तव्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी आलं. अशी भाषा तुम्ही वापरता का? हीच तुमची संस्कृती आहे का? त्यांना तुम्ही पक्षातून काढून टाकणार नाही का? असा प्रश्न राव यांनी उपस्थित केला.
 
या मुद्द्यावर राव यांनी आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या बोलण्यातून एक संकेत दिसून आलं. ते म्हणजे राज्यात त्यांना काँग्रेसकडून धोका नाही. शिवाय, आवश्यकता पडल्यास निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत आघाडी करण्याचे मार्ग खुले आहेत, असं दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
राजकीय तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही तिसऱ्या आघाडीला पुढे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाची मदत गरज पडणारच आहे. आगामी काळात आपण काँग्रेससोबतही आघाडी करू शकतो, असं राव यांनी दर्शवल्याचं पत्रकार जिंका नागराजू सांगतात.
 
काँग्रेससोबतची मैत्री TRS साठी नवी नाही. त्यांनी अनेकवेळा काँग्रेससोबत आघाडी केली आहे. तसंच गुलाम नबी आझाद यांच्यासोबत मिळून प्रचारही केलेला आहे.
 
इतकंच नव्हे तर भूतकाळात डोकावून पाहिल्यास तेलंगण राज्य घोषित केल्यास TRS पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू, अशी घोषणाही के. चंद्रशेखर राव यांनी केली होती.
 
तेलंगणा राज्य स्थापन केल्यानंतर सोनिया गांधी यांचे आभार मानण्यासाठी राव यांनी आपल्या कुटुंबीयांसह त्यांच्या घरी भेट दिली होती.
 
"त्यादिवशी चंद्रशेखर राव अत्यंत उत्साहित होते. आपण आता सोनिया गांधी यांचे सल्लागार बनणार आहोत. त्या आता आपल्याला उत्तर प्रदेशात पाठवणार आहेत, असं त्यांनी माध्यमांना सांगितल्याचं आपल्याला आठवतं," असं जिंका नागराजू म्हणाले.
 
5. जुनी महत्त्वाकांक्षा
राष्ट्रीय माध्यमांमध्ये चंद्रशेखर राव केंद्रस्थानी आहेत. पण त्याचा अर्थ राव पहिल्यांदाच आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा दर्शवत आहेत, असा नाही.
 
पूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या हालचाली केल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी फेडरल फ्रंट नावाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता.
काँग्रेस कमकुवत झाली आहे, प्रादेशिक पक्ष त्यांच्या-त्यांच्या राज्यांत मग्न आहेत, अशा स्थितीत बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप फळी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
 
याच दरम्यान ते पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांना भेटले. केरळचे पिनरायी विजयन, तामिळनाडूचे एम. के. स्टॅलीन, ओडिशाचे नवीन पटनायक यांचीही त्यांनी भेट घेतली होती.
 
विशेष म्हणजे, अशी महत्त्वाकांक्षा या सर्वांमध्ये जागी करणारे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचीही त्यांनी भेट घेतली. पुरेसं पाठबळ नसताना देवेगौडा यांनी युनायडेड फ्रंट सरकार स्थापन केलं होतं, त्यामुळे ही भेट त्या इतिहासातून प्रेरित होती, हे स्वाभाविक आहे.
 
पण, चंद्रशेखर राव यांचं गणित त्यावेळी जुळलं नाही. भाजपने 2019 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यामुळे राव यांच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरलं गेलं.
 
आता आगामी लोकसभा निवडणुकीला दोन वर्षाचा कालावधी उरलेला असताना पुन्हा के. चंद्रशेखर राव प्रयत्नाला लागले आहेत.
 
तिसऱ्या आघाडीला आकार देण्यासाठी ते विविध प्रादेशिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आपल्या वक्तव्यांमधून सर्व मोदीविरोधकांना एका बाजूला येण्याचा संदेश ते देत आहेत.
 
दुसरीकडे, सध्या राज्याचं राजकारण आपल्या मुलाच्या हाती सोपवण्यासाठी योग्य वेळेचीही ते प्रतीक्षा करत आहेत. सध्यातरी तेलंगणामध्ये त्यांच्या तोडीचा दुसरा कोणताच नेता आढळून येत नाही. तर राष्ट्रीय पातळीवरही ते आघाडी घेऊ शकतात. हिंदी चांगली बोलता येण्याची क्षमता हीसुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
 
लोकसभेत तेलंगणा राज्यातील जागांची संख्या कमी आहे. पण देशाच्या राजकारणात दावेदार म्हणून पुढे यायचं असेल तर चारही बाजूंनी व्यूहरचना करणं गरजेचं आहे.
 
त्यासाठी बातम्या किंवा इतर माध्यमातून सतत चर्चेच राहण्याची आवश्यकताही आहे. दरम्यान, पुढच्या दोन वर्षांत देशाच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, हेसुद्धा राव चांगलंच जाणतात.