शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (21:54 IST)

'आमच्यावरच डॉक्टर ओरडले, तुम्हाला बेडची इतकी घाई असेल तर दुसरीकडे जा'

-प्रवीण मुधोळकर, नितेश राऊत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आठवड्याभरात झपाट्याने वाढली आहे. त्यातही ऑक्सिजन सपोर्ट असलेले बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने काही हॉस्पिटल्समध्ये विदारक चित्र दिसतंय.
 
आशिया खंडातलं वाखाणण्याजोगं मोठं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि नामवंत एम्स हॉस्पिटल नागपूरमध्ये आहे. त्यामुळे नागपूर हे मध्य भारतातील मेडिकल हब समजलं जातं. पण आज कोरोनाच्या काळात हा मेडिकल हब परिस्थितीमुळे बेजार झाल्याचं चित्र आहे. वाढत्या रुग्णांमुळे नागपूर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय.
 
'हॉस्पिटलमध्ये बेडच मिळेना'
नागपूरमधील काटोलच्या सुरेश पाटील यांच्या 70 वर्षांच्या काकींना गेल्या आठवड्यात कोरोनाची लक्षणं दिसायला सुरुवात झाली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ऑक्सिजनची पातळी खाली घसरल्याने कांतीबाईंना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला.
 
मधुमेह असल्याने कांतीबाईंना नातेवाईंकांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये 9 एप्रिलला दाखल केलं. पण कोव्हिड कक्षात बेड नसल्याने तीन दिवस त्यांना अपघात विभागात ठेवण्यात आलं. तीन दिवस ऑक्सिजन दिल्यानंतर अखेर तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी त्यांना कोव्हिड कक्षात बेड मिळाला.
 
त्यानंतर सुरेश पाटील यांना कांतीबाईंच्या प्रकृतीविषयी काही कळलेलं नाही.
 
"आम्ही तीन दिवस डॉक्टरांना विनवणी करत होतो की त्यांना कोव्हिड कक्षात पाठवा. तोपर्यंत त्यांच्यावर योग्य उपचार होणार नाहीत. पण डॉक्टर सतत सांगत होते की- तुम्हाला इतकीच घाई आहे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा"- सुरेश पाटील यांनी बीबीसी मराठीशी झालेल्या फोनवरील संभाषणात सांगितलं.
 
एकाच बेडवर दोन रुग्ण?
नागपूरच्या याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवर दोन कोव्हिडचे रुग्ण असल्याचे व्हिडिओ पुढे आले आहेत. प्रशासनाने याविषयी स्पष्टीकरण दिलंय.
 
"कोरोनाच्या पेशंटना रांगेत उभं ठेवता येत नाही. त्यामुळे जेवढे पेशंट येतात त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करुन घेतो. ज्यांची ऑक्सिजन पातळी, सॅचुरेशन चांगलं आहे, त्यांना एका बेडवर दोघं अशा पद्धतीने बसवतो. मग त्यांना वार्डात हलवतो," असं हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितलं आहे.
 
रुग्णांची गर्दी आहे असे व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून पसरवू नये असं आवाहन डॉ. गावंडे यांनी केलंय. शासकीय रुग्णालयात गरीब वर्गातील रुग्ण येत असल्याने ते अफवा पसरल्याने घाबरतील असंही त्यांचं म्हणणं आहे.
 
नागपूरचे रुग्ण अमरावतीमध्ये?
हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय हे नागपूर जिल्हा प्रशासनानेही मान्य केलंय.
 
हॉस्पिटलवरील वाढता ताण लक्षात घेता नव्या रुग्णांना अमरावती जिल्ह्यात पाठवण्यात येतंय.
 
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी या सरकारी रुग्णालयात नागपूरचे रुग्ण पाठवण्यात येत असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
 
नागपूर जिल्ह्यातले अनेकजण आजूबाजूच्या जिल्ह्यात मिळेल तिथे रुग्णालय शोधतायत.
 
काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर प्रकृती झालेल्या रुग्णांची अमरावतीमध्ये शिफारस करण्यात येतेय.
 
रुग्णांचे संतापलेले नातेवाईक
गंभीर स्वरुपाच्या कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असल्याने त्यांच्या नातेवाईकांना शोधाशोध करावी लागतेय.
 
साहजिकच त्यामुळे नागपूरच्या खाजगी हॉस्पिटलवरही ताण येतोय. रुग्णाच्या नातेवाईकांकडून खासगी रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या. उत्तर नागपूरमधील होप हॉस्पिटल कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी जाळण्याचा प्रयत्न केला. तर रविवारी म्हणजे 11 एप्रिलला 'व्हिनस हॉस्पिटल केअर'वर दगडफेक करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला.
 
'एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही'
नागपूरमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे 63 जणांचा मृत्यू झालाय. पण बेडस मिळत नसल्याने लोकांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे.
 
नागपूर महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीवरुन शहरात गेल्या तीन दिवसांपासून एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं स्पष्ट होतंय. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 7 हजार 201 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही गेल्या वर्षभरापासून चर्चा होत असलेलं जम्बो कोव्हिड हॉस्पिटल कुठे आहे, असा सवाल नागपूरकर विचारतायत.
 
नागपूरच्या मोहम्मद इलियास यांचे जावई मगसुख खान यांची गेल्या आठवड्यात कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. पण दोन दिवस उलटून गेले तरीही नागपूरमध्ये त्यांना व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही.
 
"जावयांची प्रकृती ढासळत चाचली होती. आम्हाला दोन दिवसांनंतर अमरावतीत बेड उपलब्ध असल्याचं कळलं, त्यानंतर आम्ही इथे आलो." अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट सरकारी हॉस्पिटल बाहेर मोहम्मद इलियास आपली कैफियत सांगत होते. आता मगसुख खान यांची प्रकृती स्थिर आहे.
 
'साठ टक्के रुग्ण बाहेरुन'
नरखेडच्या अमित ठाकरे यांनाही अशाच अनुभवाला सामोरं जावं लागलं. 8 एप्रिलला अमित यांच्या तरुण असलेल्या बहिणीची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यानंतर एका दिवसात ऑक्सिजनची पातळी खाली घसरली. वरुडमधील रुग्णालयातून जवळपास किलोमीटरवर असणाऱ्या नागपूर शहरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. अमित यांनी आपल्या बहिणीला व्हेंटिलेटर बेड मिळावा म्हणून नागपूरमधली अनेक हॉस्पिटल्स पालथी घातली. आता नुकतंच तिला अमरावतीच्या सरकारी हॉस्पिटमध्ये दाखल केलंय.
 
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 11 एप्रिलपर्यंत इतर जिल्ह्यातून आलेले जवळपास 35 रुग्ण दाखल झाले. मध्य प्रदेशमधूनही इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होतायत. अॅक्सऑन (Axon) या खासगी रुग्णालयात सध्या 60 टक्के रुग्ण इतर जिल्ह्यांमधले आहेत, असं हॉस्पिटलचे डॉ. शशांक चिटमुलवार यांनी सांगितलंय.
 
"बहुतांश रुग्ण वर्धा, यवतमाळ, नागपूर तसंच मध्य प्रदेश, छिंदवाडा, संसर, बैतूल, मुलताई या भागातून आलेले आहेत. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातले आहेत." अशी माहिती डॉ. चिटमुलवार यांनी दिली.
 
अमरावतीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांवर निर्बंध लावावे लागतील अस जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी म्हटलंय.
 
विदर्भातील नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढलेला दिसतोय.