शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कुठलीही चर्चा नाही - अशोक चव्हाण
काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर चालवलं जात आहे, पण त्यात कुठलंही तथ्य नाही, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे काही नेते दिल्लीत सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं. पण शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप काही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या चर्चेला उधाण आलं जेव्हा संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पण ही भेट दिवाळीनिमित्त घेतल्याचं राऊत यांनी लगेचच स्पष्ट केलं.
त्याआधी गुरुवारी शिवसेनेच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर पक्षाचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.