मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (10:37 IST)

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू - LIVE

देशातील 13 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 117 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचाही समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील 18 कोटींहून अधिक मतदार आहेत.
 
तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व जागा 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या.
 
कर्नाटकमधील 14 मतदारसंघातही आज मतदान होत आहे. शिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्येही महत्त्वाच्या लढती होतील.
 
केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. तर गुजरातमधील गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मैदानात आहेत. राहुल गांधी यांचा केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसचा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे. तर अमित शाह यांनी लालकृष्ण आडवानी यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवण्याचा करिश्मा करून दाखवावा लागणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे, शशी थरुर; भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे आदी नेत्यांचं भवितव्यही आज ठरणार आहे.
 
महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात आज मतदान होत आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 302 लोकसभा मतदारसंघांचा निर्णय मतपेटीत बंद झालेला असेल.
 
सकाळी 10.00 : बिहार, आसाममध्ये सर्वाधिक मतदान
सकाळच्या सत्रात आसाममध्ये 12.36 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर बिहारमध्ये 12.60 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. गोवा (2.29), गुजरात (1.35), जम्मू काश्मीर (0), कर्नाटक 1.75, केरळ (2.48), महाराष्ट्र (0.99), ओडिशा (1.32), त्रिपुरा (1.56), उत्तर प्रदेश (6.84), पश्चिम बंगाल (10.97), छत्तीसगड (2.24), दादर नगर हवेली (0), दमन आणि दिव (5.83) या राज्यांत मतदानाचा वेग कमी दिसून आला.
 
सकाळी 9.20 : भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचं मतदान
भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुण्यातील अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल इथं मतदान केलं
 
सकाळी 9.00 पुण्यात उत्साहात मतदान
पुण्यात उत्साहात मतदान सुरू झालं असल्याचे चित्र आहे. विविध मतदान केंद्रावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आईची दशक्रिया विधी असतानाही योगेश आणि विवेक सरपोतदार या बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने मतदानात सहभाग घेतला आहे.
 
सकाळी 8.35 - धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात मतदान
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांनी बाजार समिती मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
सकाळी 8.34 - अहमदनगरमध्ये काही मतदान केंद्रावर मतदान थांबले
अहमदनगरमधील बालकाश्रम आणि जामनेर तालुक्यात नानज इथं EVMमध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबवण्यात आलं आहे.
 
सकाळी 8.30 - मोदी यांचं मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथल्या रानिपमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
सकाळी 8. 19 - सुप्रिया सुळे यांचं मतदान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामती इथं मतदान केलं. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही मतदान नोंदवलं.
 
सकाळी 8. 17 - पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचं मतदान
पुण्यातील मयूर कॉलनीत 93 वर्षांचे प्रभाकर भिडे आणि 88 वर्षांच्या सुशीला भिडे यांनी मतदान केलं.
 
सकाळी 8.15 वाजता : केरळमध्ये पी. विजयन यांचं मतदान
 
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी कन्नुर जिल्ह्यातील RC अमला शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं.
 
सकाळी 8 वाजता : अमित शाह यांचं नारायणपुरा इथं मतदान
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. नारायणपुरा इथल्या मतदान केंद्रावर ते मतदान करतील.
 
सकाळी 8 वाजता : पंतप्रधान मोदी यांचं अहमदाबादमध्ये मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद इथं मतदान करणार आहेत. ते अहमदाबाद इथं त्यांच्या घरी पोहोचले असून त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.