शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (10:32 IST)

श्रीलंका स्फोटः गुप्तचर यंत्रणांचा इशारा असतानाही बेपर्वाई का?

श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटांमागे आंतराष्ट्रीय रॅकेटचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सरकारनं रविवारी झालेल्या हल्ल्यांमागे स्थानिक जिहादी गट नॅशनल तौहीद जमात असल्याचं म्हटलंय. मात्र अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाहीये.
 
यादरम्यान पूर्ण श्रीलंकेत मध्यरात्रीपासूनच आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सोमवारी याची माहिती देताना राष्ट्रपती कार्यालयानं म्हटलंय की, "राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच पूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे."
 
रविवारी कोलंबोसह अनेक ठिकाणी चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या 8 बॉम्बस्फोटांमध्ये 290 लोकांचा मृत्यू झालाय तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याआधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका चर्चबाहेर स्फोटकांनी भरलेली व्हॅन उभी होती, ती स्फोटकं निष्क्रीय करताना स्फोट झाला. ही व्हॅन हल्लेखोरांचीच होती ज्यांनी एक दिवस आधी चर्चमध्ये स्फोट घडवले होते.
 
रविवारी झाले 8 स्फोट
290 लोकांचा मृत्यू, 500 जण जखमी
3 चर्च आणि 4 हॉटेलांमध्ये स्फोट
आतापर्यंत 24 संशयित ताब्यात
कुठल्याही गटानं जबाबदारी स्वीकारली नाही
सरकारच्या माहितीनुसार आत्मघातकी हल्ले झाले, परदेशात कट रचण्यात आला
 
वाद वाढला
दरम्यान या हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही सरकारनं कुठलीही ठोस उपाययोजना किंवा काळजी न घेतल्याच्या आरोपांमुळे श्रीलंकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांचे सल्लागार शिराल लकथिलाका यांनी बीबीसीला सांगितलं की, "सरकारकडून कुठली चूक झाली आहे का, याची चौकशी केली जाईल."
 
याआधी श्रीलंकेचे वरिष्ठ मंत्री रजित सेनारत्ने यांनी कोलंबोत पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी अशा हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती, मात्र ती पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे हल्ले कुठल्याही आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मदतीशिवाय होणं शक्य नाही.
 
पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत 24 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे, मात्र या हल्ल्यामागे कोण आहे हे अद्यापही समजू शकलं नाही. मृतांमध्ये 36 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये 8 भारतीयांचाही समावेश आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी भारतीय असलेल्या लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश यांच्या मृत्युला दुजोरा दिला होता. तर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पी.एस.रासीना नावाच्या आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. याशिवाय कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जनला दल सेक्युलरच्या चार कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
 
आत्मघातकी हल्ले
बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर 24 संशयितांना ताब्यात घेतल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेले सगळे नागरीक हे श्रीलंकनच आहेत. हे लोक काही आंतरराष्ट्रीय संघटनेच्या संपर्कात होते का? याच चौकशी सुरू आहे. अजूनही कुठल्याही संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून हे सूचित होतंय की, संभाव्य हल्ल्यांची पूर्ण कल्पना पोलिसांजवळ होती, मात्र त्यांनी कॅबिनेटला याबाबत माहिती पुरवली नाही.
 
हल्ल्यानंतर अख्ख्या श्रीलंकेत रविवारी कर्फ्यू लागू करण्यात आला हा. जो सोमवारी सकाळी हटवण्यात आला आहे. सोशल मीडियावरही बंधनं टाकण्यात आली होती. श्रीलंकेचे संरक्षणमंत्री आर विजयवर्धन यांनी म्हटलंय की, "हे आत्मघातकी हल्ले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत आम्हाला सूचित केलं होतं. पण त्यांना रोखण्याआधीच स्फोट झाले. आणि हल्ल्याचा कट विदेशात रचण्यात आल्याचं दिसतंय."
 
हल्लेखोराला पाहिल्याचा दावा
नेगोम्बोमध्ये एका माणसानं एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये तो आणि त्याची पत्नी प्रार्थनेसाठी गेले होते. दिलीप फर्नांडो सांगतात की, "तिथं खूप गर्दी होती. मला तिथं उभं राहायचं नव्हतं. त्यामुळे मी दुसऱ्या चर्चमध्ये जाण्यासाठी निघून गेलो." पण दिलीप यांच्या कुटुंबातील काही सदस्य चर्चमध्येच होते. स्फोटात ते बचावले, पण त्यांचा दावा आहे की त्यांनी आत्मघातकी हल्ला करणाऱ्याला पाहिलं आहे. दिलीप यांच्या माहितीनुसार, "प्रार्थनेनंतर त्यांनी पाहिलं की, एक युवक अवजड बॅगसह चर्चमध्ये चालला आहे. त्यानं माझ्या आजोबांच्या डोक्यालाही स्पर्श केला. तोच हल्लेखोर होता."
 
हल्लेखोर कोण आहे?
हल्ले नेमके कुणी केले आहेत याबाबत कुठलीही स्पष्ट माहिती हाती आलेली नाही. ज्या लोकांना अटक करण्यात आलीय त्यांची माहितीही सार्वजनिक करण्यात आलेली नाही. श्रीलंकेचे माहिती प्रसारण मंत्री हरिन फर्नांडो यांनी बीबीसीला सांगितलं की, सरकारकडे आज झालेल्या हल्ल्याबद्दल गुप्तचर यंत्रणेचा रिपोर्ट होता. त्यांनी म्हटलं की, "या गुप्त रिपोर्टबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली नव्हती. हा रिपोर्ट गांभीर्यानं का घेण्यात आला नाही हा प्रश्नही कॅबिनेटमध्ये आला होता."
 
त्यांनी सांगितलं की, "गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की चार प्रकारे हल्ले होऊ शकतात. आत्मघातकी, हत्यारांसह, विस्फोटकांच ट्रक घुसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा चाकू हल्ला होऊ शकतो असं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर यात काही संशयितांची नावंही होती. तसंच त्यांचे टेलिफोन नंबरही देण्यात आले होते. आणि आश्चर्याची बाब म्हणजे गुप्तचर यंत्रणांकडे हा रिपोर्ट होता पण त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना नव्हती.
 
फर्नांडो यांनी पुढं म्हटलंय की, "हा रिपोर्ट एक दस्तावेज आहे आणि आता तो आमच्याजवळ आहे. यात काही नावांचा उल्लेख आहे. यात काही संघटनांचीही नावं आहेत. जे मी ऐकलंय त्यावरून अशी माहिती आहे की तपास योग्य दिशेनं सुरू आहे. हल्ल्यामागे कोण आहे आणि कुठल्या संघटनेनं हल्ला घडवून आणला याचा तपास केला जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याकडे पूर्ण माहिती असेल.
 
लोकांना भीती आहे की, अशा प्रकारचे आणखी हल्ले होऊ शकतात. श्रीलंकेत आतापर्यंत 8 ठिकाणी हल्ले झाले आहेत. ईस्टरदिवशी चर्च आणि हॉटेलांवर निशाणा साधण्यात आला आहे. आठव्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकारीही मारले गेलेत. ते एका घराची झडती घेत असतानाच तिथे हल्ला झाला.