- ओंकार करंबेळकर
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून सेनेत असणाऱ्या राणे यांचं आत्मचरित्र 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) प्रसिद्ध झालं आहे. गेल्या चार दिवसांमध्ये या पुस्तकावर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.
राणे यांनी पुस्तकात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सेना नेते सुभाष देसाई यांच्यांवर थेट आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षेमुळेही युतीला सत्तेपासून दूर राहावे लागलं, असं त्यांनी लिहिलं आहे.
राणे यांच्या पुस्तकामुळे सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा युतीचं पहिलं सरकार आणि त्यापुढील घटनांकडे गेलं आहे.
1999 साली उद्धव ठाकरे यांनी उमेदवार निवडीत ढवळाढवळ केल्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांचा पुन्हा सत्तेत येण्याचा मार्गात अडथळा आला, असा थेट उल्लेख नारायण राणे यांनी केला आहे.
1999 साली उद्धव ठाकरे यांनी काय केलं? राणेंच्या मते...
"महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. 1995 पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना 171-117 असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले.
"शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासही 'सामना'मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नावं बदलली आणि आम्हा सर्वांना अंधारात ठेवून निर्णय घेतला, असं राणे यांनी पुस्तकात नमूद केलं आहे."
"6 ऑक्टोबर 1999 रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या 161 पैकी 69 उमेदवारांचा, भाजपाच्या 117 पैकी 56 उमेदवारांचा विजय झाला होता. काँग्रेसला 75 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 56 जागा मिळाल्या होत्या."
राणे यांच्या मते काही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने युतीचा आकडा 136वर गेला होता. मात्र तरीही बहुमतासाठी 9 जागा कमी पडत होत्या (विधानसभेतील बहुमताचा आकडा 145).
'ते' 11 आमदार सेनेत असते तर…
सत्ता स्थापनेपासून युती लांब राहाण्यात उद्धव ठाकरे यांचा वाटा जास्त आहे, हे सांगताना राणे लिहितात. "ज्या 15 जणांची नावं उद्धव यांनी यादीतून काढली होती, त्या उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या 15 जणांपैकी 11 उमेदवार विजयी झाले होते. हे 11 आमदार शिवसेनेत असते तर सेना-भाजपा युतीचे अपक्षांच्या मदतीने सहज सरकार स्थापन झालं असतं."
अॅलेक्झांडर यांचा इशारा आणि गोपीनाथ मुंडेंचा दावा
निकाल लागल्यानंतर बराच काळ कोणत्याही पक्षाने किंवा सर्वांत मोठ्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता. तेव्हा तत्कालीन राज्यपाल पी. सी. अॅलेक्झांडर आपल्याला वारंवार 'राणेजी, क्लेम करो' असं सांगत होते. मात्र कुणीही दावा केला नाही, त्यामुळे 12 ऑक्टोबरनंतर अलेक्झांडर थोडेसे त्रस्त दिसू लागले.
18 ऑक्टोबरपर्यंत सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर आपण राष्ट्रपती राजवटीसारखा पर्याय निवडू, असा राज्यपालांनी इशारा दिला होता.
त्यानंतर एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी आता गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. त्यांना यामध्ये यश येईल का, असा प्रश्न मला विचारल्याचं राणे लिहितात.
त्यावर, मुंडे यशस्वी होतील की नाही हे माहिती नाही, परंतु युतीकडे पुरेसे पाठबळ आहे, असं आपण सांगितल्याचं राणे सांगतात.
त्याच प्रमाणे "(मुंडे यांच्या) सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णायाला माझा पाठिंबा असेल, मात्र मुंडे यांनी न्याय्य पद्धतीचा मार्ग न अवलंबल्यामुळं मी त्यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही," असं आपण बाळासाहेब ठाकरे यांना सांगितल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
विलासराव देशमुखांचे सरकार पाडण्याचं नियोजन फसलं?
2002 विलासराव देशमुख यांच्या सरकारचा पाठिंबा काही अपक्ष आणि लहान पक्षांनी काढल्यावर विरोधी पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या हालचालींबद्दल राणे यांनी पुस्तकात विस्तृत लिहून ठेवलं आहे.
काही अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना गोरेगावच्या 'मातोश्री' क्लबमध्येही ठेवण्यात आलं होतं. परंतु संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सर्व काही बदललं.
दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असं काही नाही. या सरकार पाडण्याला आपला पाठिंबा नाही,' असं स्पष्ट केलं. या सर्व घडामोडींमागे उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, जॉर्ज फर्नांडीस होते, असं राणे यांनी लिहिलं आहे.
'उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सेनेला भविष्य नाही'
राणे यांनी या आत्मचरित्रात आणखी एक मत व्यक्त केलंय - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला भविष्य नाही.
"उद्धव आजूबाजूच्या काही होयबांना विचारून निर्णय घेतात. ते माणूस म्हणून चांगले आहेत, पण ते एक terrible leader आहेत. उद्धव हस्तीदंती मनोऱ्यात राहत असल्यामुळं त्यांचं लोकांशी नातं जुळू शकत नाही," असं त्यांचं मत आहे.
2014 मध्ये शिवसेनेला 63 जागा मिळाल्याचं यश उद्धव स्वतःकडे घेतात, याशिवाय चूक काहीही नाही, असं राणे म्हणतात. शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढली असली तरी पडद्याआडून त्यांची भाजपाशी हातमिळवणी आहे, हे लोकांना माहिती होतंच त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असलेल्या लाटेमुळे पक्षाला फायदा झाला, असं राणे यांनी पुस्तकात लिहिलं आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विविध नेत्यांवर केलेल्या आरोपांबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, "हे पुस्तक वाचलं नसल्यामुळे अभिप्राय देणं योग्य होणार नाही," अशी प्रतिक्रिया बीबीसी मराठीला दिली.
'भाजपानं पत्र द्यायला विलंब केला'
1999 साली युतीचे सरकार स्थापन न होण्यामागे भाजपची आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे यांची भूमिका कारणीभूत होती, असं 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात.
1999 सालच्या निवडणुकीत उमेदवारांची नावं बदलण्याबाबत प्रधान म्हणतात, "साधारणतः प्रत्येक पक्षाचे दहा-पंधरा टक्के उमेदवार बदलले जातात. मात्र ती नावं बदलण्यात उद्धव यांची भूमिका किती होती हे सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतः सर्व निर्णय घ्यायचे. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले."
1999 साली भाजपनं पाठिंबा द्यायलाही विलंब केल्याचंही प्रधान सांगतात.
2002 सालचं सरकार पाडण्याचं ऑपरेशन अयशस्वी होण्यामागे अनेक कारणं होती; त्यात भाजपची आग्रही भूमिका होती, असं प्रधान यांनी सांगितलं.
"भाजपला सत्ता स्थापनेत इंटरेस्ट होता. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीचे संबंध होते. तसच मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही संबंध होते. सदस्यत्व जाण्याच्या भीतीने सरकारमधून फुटलेल्या सदस्यांनी पुन्हा स्वगृही जाण्याचं कारणही यामागे होतं," असं प्रधान सांगतात.
'जॉर्ज यांचं नाव प्रथमच'
राणे यांच्या पुस्तकातील माहितीबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आपलं मत मांडलं.
ते म्हणाले, "यातील बरीचशी माहिती तेव्हा वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती. पण आता पुन्हा इतक्या वर्षांनी ते लिहून राणे यांना काय साधायचं आहे, हे समजलं नाही. तसच त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कसे आहेत, हे देखील सर्वांना माहिती आहे. मात्र 2002 साली घडलेल्या घडामोडींमध्ये जॉर्ज फर्नांडीस यांचं नाव पहिल्यांदाच वाचायला मिळालं आहे."
'उद्धव यांची पक्षावर पकड यायला सुरुवात झाली होती'
उद्धव ठाकरे यांची साधारणतः 1998-99 या काळात पक्षावर पकड यायला सुरुवात झाली होती, असं मत 'बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना' पुस्तकाचे लेखक वैभव पुरंदरे सांगतात.
ते सांगतात, "राणे यांनी 1999च्या निवडणुकीबद्दल तसेच सत्ता स्थापनेबाबत लिहिलेल्या गोष्टी चार दरवाजांच्या आड झाल्या होत्या. त्यामुळे या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत आता काहीच स्पष्ट सांगता येणार नाही."