गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

महाराष्ट्र सरकार स्थापना उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक, काँग्रेसचा नेता आज निवडला जाण्याची शक्यता

शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सहमती झाल्यानंतर आज अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रित पाऊल टाकलं तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.
 
रात्री उशीरा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 10 वाजता शिवससेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.
 
तसंच दुपारी 12 वाजता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसह त्यांच्या इतर मित्रपक्षांची बैठक होणार आहे. काँग्रेसने निकालानंतर आजपर्यंत आपला गटनेता निवडलेला नाही. आज दुपारी एक वाजता काँग्रेस आपला गटनेता निवडणार आहे. त्यानंतर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांबरोबर बैठक होईल.
 
गेल्या आठवड्यात मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये शिवसेनेने स्वतःसाठी मुख्यमंत्रिपद आणि दोन्ही काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रिपदं देण्याचा फॉर्म्युला सुचवल्याचं प्रसिद्ध झालं होतं.
 
तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दोनच जागांचे अंतर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही हवे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीची अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने दिल्याचं सांगण्यात येतं होतं. त्यावर शिवसेनेने आतापर्यंत स्पष्ट प्रतिसाद दिलेला नव्हता.
 
गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मागणी होत असल्याचं आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं.