शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (18:06 IST)

काय सांगता, मुलींच्या हातात मोबाईल देऊ नका, मुली पळून जातात? - ब्लॉग

अनघा पाठक
नेहमीचंच झालंय हे, कोणीतरी म्हणतं, "मुलींच्या हातात मोबाईल देऊ नका. मुली बिघडतात!" हेही मी मोबाईलवरच वाचते आणि सोडून देते. आता यावर काय लिहावं हेही कळत नाही कारण रोज मरे त्याला कोण रडे?
 
पण तरीही अशी वक्तव्य करणाऱ्यांना तिथल्या तिथे खोडून काढायला हवं हा माझ्या एका सहकाऱ्याने दिलेला (रास्त) सल्ला अमलात आणतेय.
 
आता काय तर उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी म्हटलं की मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाईल द्यायला नको.
 
त्या म्हणाल्या की, "समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे. मुली मोबाईलवर तासनतास बोलत असतात. मुलांसोबत फिरत असतात. त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत, कुटुंबियांना याची माहिती नसते. आणि मग मोबाईलवर बोलता बोलताच त्या मुलांबरोबर पळून जातात."
बाकी मुलींच्या नाशाला आईच जबाबदार असते हा पावशेर ठेवायलाही विसरल्या नाहीत. साहजिक आहे म्हणा मुलीने नाव काढलं तर वडिलांचं यश आणि मुलीचं पाऊल चुकीचं पडलं तर आईचं अपयश हेच आपल्यावर ठसवलं गेलंय.
 
पण आपल्यासाठी ही वक्तव्यं नवीन नाहीत. याआधीही अनेक किर्तनकारांनी आपल्या किर्तनात अशा प्रकारची वक्तव्यं केली आहेतच. इंदोरीकर महाराज हे त्यातलंच उदाहरण.
 
एका किर्तनात मोबाईलमुळे मुली बिघडतात असं ते म्हणतात.
 
"मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो. सायलेंट असतो. मुलीच्या मोबाईलमधला बॅलेन्स चेक करत जा. आपण तर 100 रुपये दिले होते, त्याच्यात 200 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बाबा. ही 1 जीबी आहे, 2 जीबी आहे, 4 जीबी आहे, का भूर्र जीबी (महाराज पोरगी पळून जाण्याच्या अर्थानं भूर्र म्हणत आहेत) आहे, जरा चौकशी करा."
प्रश्न फक्त याच माणसांचा नाही, ही माणसं सार्वजनिक ठिकाणी बोलली म्हणून यांची वक्तव्यं प्रकाशात आली, पण आपल्या आसपास असा विचार करणारी अनंत माणसं असतात.
 
मग मुद्द्याकडे येऊ... मुलींच्या हातात मोबाईल दिला तर असं काय आभाळ कोसळतं? की मोबाईल वापरून फक्त मुलीच बिघडतात, मुलं नाही?
 
2 जीबीचा डेटा मुलं काय बघण्यात वापरतात हे नव्याने सांगायला नको. नाहीतर जगातल्या सर्वाधिक पॉर्न वाचणाऱ्या देशात भारताचा नंबर आलाच नसता.
 
मग मुलींच्या मोबाईल वापरण्यावरच ऑबेजक्शन का?
खूप विचार केला तेव्हा अगदी सोपं उत्तर सापडलं. 'त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी.'
 
"एक वेळ अशी आली होती की मला मोबाईल उचलायचीही भीती वाटत होती," शीतल (नाव बदललं आहे). शीतलच लग्न झालंय आणि तिला एक मुलगीही आहे.
 
"माझे मिस्टर तसे उच्चशिक्षित आहेत, पण त्यांना माझं व्हॉट्सअॅप वापरणं अजिबात आवडत नाही. त्यावरून ते सतत माझ्याशी भांडण करायचे.
 
"माझ्या सासूबाईही म्हणायच्या की, त्याला आवडत नाही तर कशाला वापरतेस मोबाईल. परिस्थिती अशी होती की ते घरात असताना ते मोबाईल पाहतील पण मी मोबाईलला अजिबात हात लावलेला चालायचा नाही. व्हॉट्सअॅप पाहाणं तर फारच लांबची गोष्ट.
पुण्यात राहाणाऱ्या भावनाचा अनुभव शीतलइतका वाईट नसला तरी तिला व्हॉट्सअॅप वापरण्यावरून बोलणी खावी लागली आहेतच.
 
"लग्नाआधी मी आईची अनेकदा बोलणी खाल्लेली आहेत. ती म्हणायची की नुसती व्हॉट्सअॅप वापरत बसशील तर लग्नानंतर कसं होईल तुझं?"
 
बायका त्यांची काम सोडून, घरातल्या जबाबदाऱ्या टाळून मोबाईलवर टाईमपास करतात असा एक आक्षेप आहे. पण तो तितकासा खरा नाही.
 
"मुली सहसा त्यांना जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हाच फोन पाहातात. बाकी काम सोडून त्या दिवसभर नुसता फोनवर टाईमपास करतील असं नाही वाटत मला," भावना सांगते.
 
तिचा आक्षेप आहे की सोशल मीडिया वापरणाऱ्यावरून मुलांना कोणी काही बोलत नाही, पण मुलींना मात्र अनेक बंधनं घालतात.
 
असं का?
स्त्री-पुरूष समानतेच्या लढ्यातले कार्यकर्ते असणारे आनंद पवार सांगतात, "कुठलीही नवी टेक्नोलॉजी आपल्याकडे आली की तिचा उपयोग स्त्रियांना अधिपत्याखाली ठेवण्यासाठी कसा करता येईल यासाठीच करतो आपण. पुरुषप्रधान व्यवस्थेकडून दुसरी अपेक्षाही नाही."
 
ते पुढे म्हणतात, "ही व्यवस्था दोन स्तरावर काम करते, एक म्हणजे या नव्या टेक्नोलॉजीला बायकांच्या हाती लागू द्यायचं नाही. हे व्हॉट्सअॅपवर बंदी घालणारे फतवे, मुलींच्या हाती मोबाईल फोन देऊ नका असे खाप पंचायतींनी काढलेले आदेश त्याचंच द्योतक."
 
दुसरं म्हणजे, ती टेक्नोलॉजी त्यांच्या हातात तर द्यायची पण त्यावर हजारो चौक्यापहारे बसवायचे.
 
"मी असे भाऊ बघितलेत जे बहिणींना दर अर्ध्या तासाने आपलं लोकेशन व्हॉट्सअॅपवर पाठवायला सांगतात. आणि असे बापही बघितलेत जे मुलींच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड आपल्याकडे ठेवतात. म्हणून व्हॉट्सअॅप नको. कारण त्याने कदाचित बाहेरच्या जगाची दारं उघडतील," ते म्हणतात.
"तंत्रज्ञानाने बाहेरच्या जगाची माहिती कळते. पुरूषांना वाटतं की घरात बसवलं की बायकांना बाहेरचं काही कळणार नाही. त्या पुरूषांवरच अवलंबून राहातील."
 
पण मोबाईलने बाहेरचं जग कळतं. चांगलं वाईट समजतं. इतकंच काय, त्यांना स्वतःचे हक्कही कळतात. उद्या घरात त्यांच्यावर अन्याय झाला तर कुठे जायचं, कुठे दाद मागायची हेही त्यांना लक्षात येतं.
 
"म्हणून घरच्यांची इच्छा नसते की बायकांनी व्हॉट्सअॅप वापरावं," शीतल पोटतिडीकेनं सांगते.
 
म्हणजे मोबाईलमुळे मुली बिघडतात असं नाही, तर कदाचित मुली प्रगती करू शकतात, सगळी मेख आहे ती इथे.
 
'आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत'
मराठा आरक्षणासंबधी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "मुंबई कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरलेल्या नाही."
 
राजकीय, सामाजिक संदर्भांची चर्चा इथे नाही. परत प्रश्न तोच आहे की बांगड्या भरलेला हात कमजोर का वाटतो? बांगड्या घालणाऱ्या हातांनी सक्षमपणे राज्य केल्याची, युद्ध जिंकल्याची अनेक उदाहरणं आहेत की.
 
सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे या अशा प्रतिकांबद्दल बोलताना म्हणतात, "राजकारणातील लोकांच्या नेणीवेतच या पुरूषप्रधानतेची प्रतीकं भरली आहेत. अशी भाषा वापरून आपण स्त्रियांना कमी आणि हीन लेखतो, याचा विचारही ते करत नसतील."