शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (18:00 IST)

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई कशा दिसायच्या? भारतीय आणि परदेशी लेखकांनी केलेलं वर्णन

ओंकार करंबेळकर
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या लढाऊ व्यक्तिमत्वामुळे 1857 साली झालेल्या उठावाच्या स्मृती भारतीयांच्या मनामध्ये वारंवार ठळक होत राहातात. 1857 च्या उठावात लढणाऱ्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्याप्रमाणे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचं एक वेगळं स्थान आहे. त्यांच्याबद्दल अतीव आदराची भावना सर्वसामान्य भारतीयांच्या मनात असते.
उठावानंतरही एक प्रेरणास्थान म्हणून लक्ष्मीबाईंना आजही मानलं जातं. इतिहास, कादंबऱ्या, कवितांमधून त्यांचं वर्णन आलं असलं तरी त्यांना काही लोकांनी प्रत्यक्ष पाहून वर्णन लिहून ठेवलं आहे. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो.
लक्ष्मीबाईंचं मूळ नाव मनकर्णिका तांबे असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे होतं. दुसऱ्या बाजीरावांचे भाऊ चिमाजी यांच्याकडे मोरोपंत वाराणसीमध्ये काम करत होते. वाराणसीमध्येच मनकर्णिका म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. परंतु चिमाजींच्या निधनामुळे त्यांना वाराणसी सोडून दुसऱ्या बाजीरावांकडे ब्रह्मावर्त म्हणजे कानपूरजवळच्या बिठूरला यावं लागलं.
माझा प्रवास या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक विष्णूभट गोडसे आणि त्यांचे काका रामभट यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची कामकाजाची पद्धत, शौर्य, निर्णय घेण्याची शक्ती हे सर्व जवळून पाहायला मिळाले होते.
रामभट गोडसे यांनी तर मनकर्णिकेला झाशीला लग्न होऊन जाण्यापूर्वीही पाहिलं होतं. रामभट गोडसे यांनी तिचं वर्णन विष्णूभटजींकडे केलं होतं. 'ही मुलगी फार हुषार व निर्मळ, शाहाणी गौर वर्णाची, अंगानी कृष व उफाट्याची उंचीची उभारणी चांगली असे. नाक सरळ, कपाळ उंच व डोळे कमलपत्राप्रमाणे वाटोळे असून मोठमोठे व कान मुखाला शोभा देणारे असे असून मध्यभाग कंबर शरीराचे झोकाप्रमाणे बारीक होती' असं वर्णन त्यांनी मनकर्णिकेचं केलं होतं.
मनकर्णिका बिठूरला सर्वांची लाडकी मुलगी होती. तेव्हा तिला छबेली असंही म्हणत. परंतु तेव्हाच्या रितीप्रमाणं 12-13 वर्षांची होऊनही मनकर्णिकेचं लग्न झालं नव्हतं. शेवटी साधारण चाळीशी उलटलेल्या गंगाधरराव नेवाळकर या झाशीच्या राजाबरोबर तिचा विवाह झाला आणि तिचं नाव लक्ष्मीबाई असं झालं.

राणीचा पोशाख आणि इतर वर्णन
लक्ष्मीबाई राणी यांना आपल्या पदरी असणारी माणसं सुखी असावीत असं वाटत असे. त्यांचे कपडेही चांगले असावेत असं वाटायचं. गोडसे भटजींनी वर्णन केल्यानुसार त्यांचा बहुतेकवेळा पोशाख पुरुषाचा असे तर कधी स्त्रीचा पोशाखही असे.
गोडसे भटजी लिहितात, 'पायांत पायजमा, अंगात जांभऴे रंगाचा आंबव्याचा बन्यान किंवा बंडी असे. डोकीस टोपी घालून पागोट्यासारखी बत्ती बांधलेली असे. कंबरेस काच्या किंवा दुपेटा असून तरवार नेहमी जवळ असे. नवरा स्वर्गवासी जाहल्या दिवसापासून नथ वगैरे अलंकार घालीत नसे. फक्त हातांत सोन्याच्या बांगड्या दोनदोन व येकेक गोट असे. गळ्यांत मोत्यांचे पेंडे मात्र असे, हातांत हिरकणी लावलेली अंगठी घातलेली असे. वेणी न घालता बुचडा नेहमी बांधलेला असे.'
 
ऑस्ट्रेलियन वकिलानं केलेलं वर्णन
संस्थान खालसा करून कंपनीने राणी लक्ष्मीबाईंना तनखा देऊ केला होता. इंग्रजांशी आता कसा व्यवहार करावा, संस्थान पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे यासाठी सल्ला घेण्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ऑस्ट्रेलियन वकील जॉन लँग यांना आपल्या संस्थानात बोलावून घेतलं होतं. राणीने थेट लंडनमध्ये कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे विनंती करानी आणि तनखा स्वीकारायला सुरुवात करावी असा सल्ला लँगनी दिला. गव्हर्नर जनरलला पाठवण्यासाठी एक निवेदनही लँगने करुन दिले होते.
जॉन लँग एक प्रवासलेखक आणि पत्रकारही होते. त्यांनी भारतातल्या अनुभवांवर 'इन द कोर्ट ऑफ द रानी ऑफ झांसी अँड अदर ट्रॅवेल्स इन इंडिया' नावाचे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या झाशी भेटीचे आणि राणीच्या भेटीचे वर्णन केले आहे.
 
झाशीची श्रीमंती
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्याने यापूर्वी पाहिलं नव्हतं. गव्हर्नर जनरलच्या एजंटलाही तशी संधी मिळाली नव्हती. जॉन लँग यांनी राणीच्या भेटीच्या वर्णनाबरोबर झाशी संस्थानच्या श्रीमंतीचं आणि राणीच्या आदरातिथ्याचं भरपूर वर्णन केलं आहे.
जॉन लँग आग्र्याला आल्याचं समजल्यावर राणीने त्यांना झाशीत येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्यासाठी रथासारखी एक घोडागाडीही पाठवली. ही गाडी एखाद्या खोलीसारखी होती असं लँग लिहितात. गाडीत राणीचे एक मंत्री, वकील आणि एक खानसामा होता. लँग यांना जराजरी तहान लागली की तो थंड पाणी, बिअर किंवा वाईन पुढं करत असे. वरती एक पंखा होता आणि तो ओढणारा माणूस गाडीच्या बाहेर फूटबोर्डवर बसलेला होता. या गाडीचे घोडे राजेसाहेबांनी (गंगाधरराव) फ्रान्समधून मागवलेले होते असं लँग लिहितात.
झाशीतही लँग यांची राहाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. भेटीच्या दिवशी त्यांना हत्तीवर चांदीच्या अंबारीत बसवण्यात आलं. त्याच्या पायऱ्या आणि अंबारीच्या आतही लाल मखमली कापड लावलेलं आणि माहूत अत्यंत चांगल्या पोशाखात होता असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. या हत्तीच्या दोन्ही बाजूला राणीचे मंत्री अरबी घोड्यांवर होते आणि त्याबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला घोडदळातले सैनिकही होते.
 
राणीचा झाशी शहरातला महाल
अशा खास आतिथ्यासह राणीच्या झाशी शहरातल्या महालापर्यंत गेल्यावर लँग यांना राजवाड्यातील एकेक खोल्यांमधून आत नेण्यात आले. या खोल्यांमध्ये हिंदू देवतांची चित्रं काढलेली होती आणि सर्वत्र आरसे लावलेले होते असं लँग म्हणतात.
त्यानंतर एका खोलीमध्ये बूट काढून आत जाण्याची विनंती करण्यात आली. या खोलीत एका बाजूला पडदा होता. लँग लिहितात, एक उत्तम कपडे आणि आभूषणं घातलेलं मूल त्यांच्याजवळ आलं हे मूल म्हणजेच राणीचा दत्तक वारस आणि संस्थानाचे महाराज (दामोदरराव) होते.
इतक्यात पडद्याआडून थोडासा कर्कश आणि कर्णकटू आवाज लँग यांच्या कानावर आला. पडद्याआडून बोलणारी ही स्त्री म्हणजे खुद्द महाराणी लक्ष्मीबाई होत्या. पडद्याच्या त्या बाजूनेच राणी आपल्यावर आलेलं संकट लँग यांना सांगत होत्या.
हे बोलणं सुरू असतानाच त्यांच्या मुलाकडून काही काळ पडदा सरकवला गेला. तेव्हा काही क्षणांसाठी लँग यांना राणीला पाहाता आलं. तिला पाहून लँग लिहितात, 'तरुणपणात त्या अतिशय सुंदर दिसत असाव्यात. त्यांचा चेहरा माझ्या सौंदर्याच्या कल्पनेपेक्षा जरा जास्त गोल होता. त्यांचे हावभाव उत्तम व विचारी होते. डोळे चांगले होते आणि नाकाचा आकार नाजूक होता. त्या फार गोऱ्याही नव्हत्या आणि काळ्याही नव्हत्या.'
पुढे लँग यांनी त्यांच्या कपड्यांचं व दागिन्यांचं वर्णन केलं आहे. राणीने सोन्याच्या कानातल्याशिवाय कोणताही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरे मलमलचे वस्त्र परिधान केलं होतं. फक्त त्यांचा आवाज निराशावादी कर्कश होता असं मात्र लँग यांनी आवर्जून लिहिलेलं आहे.
 
व्यायाम आणि धाडसी निर्णय
लक्ष्मीबाई राणी दररोज पहाटे उठून व्यायाम, घोडेस्वारी, हत्तीवरुन फेरफटका मारत असल्याचं अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. लक्ष्मीबाईंचे पती गंगाधरराव नेवाळकर यांचा मृत्यू झाल्यावर तेव्हाच्या पद्धतीनुसार केशवपन करण्याऐवजी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला होता. केशवपनाच्या ऐवजी दररोज तीन ब्राह्मणांना तीन रुपये देण्याचं प्रायश्चित्त स्विकारलं होतं.
वैधव्य आलं तरी पतीच्या पश्चात हे राज्य टिकवण्यासाठी, सर्वांचं मनोबल टिकून राहाण्यासाठी हा निर्णय राणीने घेतला असावा. आपल्या वैधव्याचं कारण राज्यकारभारात आडवं येऊ नये तसेच युद्धासारख्या हातघाईच्या प्रसंगी लोकांचा नेतृत्वावर विश्वास राहावा यासाठी लक्ष्मीबाईंनी हळदीकुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं. धार्मिक कर्मकांडाचे नियम कठोरपणे पाळले जाण्याच्या काळात हा निर्णय घेणं धाडसाचाच म्हटला पाहिजे.
 
झाशी सोडताना
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर इंग्रजांचा वेढा फोडून किल्ला सोडण्याची वेळ आली तेव्हा ती एका पांढऱ्या घोड्यावर स्वार झाली. तिला या पोशाखात गोडसे भटजींनी पाहिले आणि वर्णन लिहून ठेवलं आहे.
ते लिहितात 'आंगावर पायजमा वगैरे सर्व पोषाग होताच. टाकीण बूट घातले होते व सर्वांगास तारांचे कवच घातले होते. बराबर अर्थ येक पैसासुद्धा घेतला नव्हता. फक्त रुप्याचा जाब म्हणजे पेला पदरी बांधून ठेविला होता. कंबरेस ज्यंब्या वगैरे हतेरे होती. खाकेत तरवार लाविली होती आणि रेसिमकाठी धोतरानी पाठीसी बारा वर्षांचा मुलगा दत्तक घेतलेला बांधून जय शंकर असा शब्द करुन किल्याखाली स्वारी उतरली आणि सर्वांसह भर शहरांतून उत्तर दरवाज्यानी बाहेर गेली.'
 
महालक्ष्मी दर्शन
नेवाळकर घराण्याची कुलस्वामिनी महालक्ष्मीचं मंदिर हे राणीच्या अत्यंत आदराचं स्थान होतं. या मंदिराची त्यांनी विशेष काळजी घेतलेली दिसते. दर शुक्रवारी आणि मंगळवारी त्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असत. यावेळेस 'तामझाम' नावाच्या पालखीतून त्या जात असत. प्रतिभा रानडे यांनी झांशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकात या महालक्ष्मी दर्शनाचं वर्णन केलं आहे.
'दोन्ही बाजूला हलगी, तुताऱ्या, कर्णे वाजवणारे वाजंत्री असत. पालखीच्या मागेपुढे शंभर घोडेस्वार तसेच दीड-दोनशे अफगाण व इतर सैनिक असत. रेशमी जरीकाठी लुगडी, पैठण्या नेसून दासी' याबरोबर जात असत. किल्ल्यातून बाहेर पडून दर्शन होऊन राणी परत येईपर्यंत किल्ल्यात चौघडा वाजवला जाई, असं त्या लिहितात.
राणी जेव्हा मर्दानी वेशामध्ये भरधाव घोड्यावरुन देवदर्शनाला जाई तेव्हा तिच्या पागोट्याचा रेशमी पदर वाऱ्यावर उडत असे असं वर्णन रानडे यांनी केलं आहे. या सर्व वर्णनांमधून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं व्यक्तिमत्व किती प्रभावी असेल याचा अंदाज येतो. उठावाच्यावेळेस अनेक लढायांमध्ये तलवार हातात घेऊन लढणाऱ्या राणीला पाहून इतरांना नक्कीच स्फूर्ती मिळत असावी.