सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (17:28 IST)

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात कोव्हिड 19 च्या रुग्णांची संख्या कशी आणि का वाढते आहे?

जान्हवी मुळे आणि शादाब नाझमी
लपाछपीचा खेळ आठवतोय? त्यात ज्याच्यावर राज्य असतं तो लपून बसलेल्यांना हुडकून काढायचा प्रयत्न करत असतो. तर लपलेले त्याला चकवण्यासाठी कानोसा घेत राहतात. कसलीच चाहूल लागली नाही, तर लपलेल्या जागेतून बाहेर डोकावतात, आणि नेमके तेव्हाच पकडले जातात.
कोरोना विषाणू सध्या महाराष्ट्रात तसाच खेळ खेळतो आहे का? असा प्रश्न पडावा. कारण जरा रुग्णसंख्या कमी झाली, असं वाटत असतानाच गेल्या काही आठवड्यांपासून ती पुन्हा वेगानं वाढू लागली आहे.
साथीच्या रोगांचे तज्ज्ञ यालाच साथीची 'दुसरी लाट' असं म्हणतात. संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहिला, तर अनेकदा या दुसऱ्या लाटेत आजाराच्या प्रसाराचा वेग आणि लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. मग महाराष्ट्रात तसं होताना दिसतंय का?
राज्यात कोव्हिड-19च्या साथीची नेमकी स्थिती काय आहे? काही ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात.
 
महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वेगानं वाढ
महाराष्ट्रात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोव्हिडच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.
जानेवारीपासूनचा हा आलेख पाहा. यात तीन महिन्यांमधली दैनंदिन रुग्णसंख्या कशी वाढत गेली, हे दिसून येतं.
शुक्रवारी म्हणजेच 19 मार्चला दिवसभरात तब्बल 25,681 कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची महाराष्ट्रातली एका दिवसातली सर्वांत मोठी वाढ आहे.
 
ग्रामीण भागांत प्रादुर्भाव वाढला
महाराष्ट्रात कोव्हिडची साथ आली, तेव्हा सुरुवातीला शहरी भागांत रुग्णांचं प्रमाण जास्त होतं. आता दुसरी लाट आल्यावर पुन्हा मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरी भागांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. पण यावेळी ग्रामीण भागांत आणि विशेषतः विदर्भात रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली.
हा तक्ता कोव्हिडच्या साथीच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी दाखवतो आहे.
साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्गाचा वेग सर्वोच्च पातळीवर असताना 24 सप्टेंबर रोजी अमरावतीत जवळपास तीन हजार सक्रिय रुग्ण होते. 25 फेब्रुवारीला हा आकडा 6,740 वर पोहोचला. सध्या तिथे साडेतीन हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
ग्रामीण भागांत काही आठवड्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते. मतदानासाठी अनेकजण गावी गेले तसंच प्रवासाचं प्रमाणही वाढलं. याचा परिणाम कोव्हिडच्या प्रसारावर झाला असल्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनेक निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले, मुंबईतल्या लोकल सुरू झाल्या. तसंच कोव्हिडच्या साथीची पहिली लाट ओसरल्यावर लोकांनी काळजी घेण्यात ढिलाई दाखवली त्यामुळेही आकडे पुन्हा वाढत असल्याचं जाणकार सांगतात.
 
देशात सध्या 61 टक्के रुग्ण महाराष्ट्रात
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण आठ ते नऊ टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. पण देशात सध्या 60 टक्के कोव्हिड रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
19 मार्च 2021 रोजी देशात सक्रिय रुग्णसंख्या म्हणजे सध्या ज्याना कोव्हिडनं ग्रासलं आहे अशा लोकांची संख्या 2 लाख 68 हजार 692 एवढी होती. त्यात 1 लाख 66 हजार 353 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत.
एकूण रुग्णसंख्येचा विचार केला, तर देशात 19 मार्च 2021 पर्यंत 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 रुग्णांची नोंद झाली होती. त्यातले 23 लाख 29 हजार 464 म्हणजे जवळपास वीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत.
विशेष म्हणजे टेस्टिंगच्या आकडेवारीचा विचार केला, तर देशात 19 मार्चपर्यंत एकूण 23 कोटी 13 लाख 70 हजार 540 तपासण्या झाल्या, त्यात केवळ सात टक्के म्हणजे 1 कोटी, 79 लाख, 56 हजार 830 तपासण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
 
महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर
महाराष्ट्रातील परिस्थिती एवढी चिंताजनक का आहे, ते हा तक्ता पाहिल्यावर लक्षात येईल.
कोव्हिड रुग्णांच्या एकूण संख्येचा प्रांतवार विचार केला, तर महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. या यादीत केरळ नवव्या स्थानावर आहे. (19 मार्चची आकडेवारी)
 
महाराष्ट्रात टेस्टिंगचं प्रमाण पुन्हा वाढलं
राज्यात कोव्हिडची रुग्णसंख्या वाढू लागली, तसं तपासण्यांचं प्रमाणही पुन्हा वाढलं आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या 27 तारखेला राज्यात 1 लाख 88 हजार जणांची कोव्हिड चाचणी झाली. 24 डिसेंबर 2020 रोजी राज्यात 1 लाख 28 हजार 820 तपासण्या होत होत्या. साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर तपासण्याही कमी झाल्या. आता त्यात पुन्हा वाढ होते आहे.
पण यातल्या कितीजणांना प्रत्यक्ष कोरोना विषाणूची लागण झाली, हे सांगणारा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे.
देशभराचा विचार केला, तर सध्या टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट साधारण पाच टक्के आहे, तर महाराष्ट्रात तो 14 ते 15 टक्के आहे. बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी याच गोष्टीवर चिंता व्यक्त केली आहे.
टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट जितका जास्त, तितका धोका जास्त असं ढोबळ गणित आहे. जास्त तपासण्या करूनही रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण कमी झालं, तर साथ नियंत्रणात आली असं मानता येऊ शकतं.
साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासणीइतकंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं असतं. म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी किंवा विलगीकरण करणं. पण राज्यात पुरेसं काँटॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याची खंत केंद्रीय आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे.
 
मृत्यूंचा आकडा वाढला, पण मृत्यूदर अजूनही कमी
गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही पुन्हा वाढू लागली आहे.
पण दिलासा देणारी बाब म्हणजे कोव्हिडचा मृत्यूदर अजूनही कमी आहे. म्हणजे रुग्णांची संख्या वाढत असली, तरी मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत बरंच कमी झालं आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात राज्यात दररोज दोनशे ते तीनशेहून अधिक मृत्यूंची नोंद होत होती. सप्टेंबरमध्ये काही दिवस तर मृत्यूचा आकडा चारशेच्या पलीकडे गेला होता. पण आता हे प्रमाण पन्नास-साठच्या आसपास आहे.
म्हणजे टक्केवारीचा विचार केला, तर मृत्यूचं प्रमाण ऑक्टोबर महिन्यातील शेकडा 2.47 वरुन मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात ते 0.44 पर्यंत खाली आलं आहे.
राज्याचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे त्याविषयी फेसबुकवर लिहितात, "खरे तर एकही मृत्यू होऊ नये, कारण ज्याच्या घरात तो होतो त्याच्या करिता तो जगबुडी इतका दुःखदायक असतो. पण मृत्यूचे प्रमाण कमी होते आहे, ही सकारात्मक बाब आहे. तरीही आपण काळजी घ्यायला हवीच."
 
महाराष्ट्रात पुरेसं लसीकरण होतंय का?
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आणखी एक जमेची बाजू म्हणजे कोरोना विषाणूवर आता लशी उपलब्ध आहेत.
राज्यात जानेवारीपासून लसीकरणालाही सुरवात झाली आहे आणि वेगाने लसीकरण केलं जातंय. 18 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 38,04,142 जणांना लशीचा डोस देण्यात आला. देशातील आकडेवारीच्या तुलनेत केवळ दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे.
पण साथीवर नियंत्रण मिळवायचं, तर लसीकरणाचा वेगही आणखी वाढवायला हवा, असं जाणकार सांगतात.
 
विषाणूचं म्युटेशन, जिनोम सिक्वेंसिंगचं काय?
महाराष्ट्रात कोव्हिडच्या साथीच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रसार वेगानं होताना दिसतो आहे. यामागे विषाणूमध्ये झालेलं उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन जबाबदार नाही ना, याविषयी संशोधन करणं आवशक्य असल्याचं जाणकार सांगतात.
विषाणूंमध्ये किंवा कुठल्याही पेशींमध्ये असे बदल होतच असतात. पण नेमके काय बदल होत आहेत, हे त्या पेशीच्या गुणसूत्रातून कळतं. जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे अशा गुणसुत्रांचा नकाशा.
सातत्यानं जिनोम सिक्वेंसिंग करत राहिलं, तर विषाणूमध्ये नेमके काय बदल होत आहेत आणि त्याने आणखी किती घातक अवतार घेतला आहे याचा अंदाज बांधता येतो.
पण भारतात जिनोम सिक्वेंसिंगचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे. जानेवारीत जिनोम शास्त्रज्ञांच्या एका गटाने भारतात "1 कोटी 40 लाख केसेस असतानाही त्यापैकी केवळ 6400 जिनोम साठवण्यात आल्याचं" म्हटलं होतं.