बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (17:11 IST)

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, शेतीचं नुकसान

शुक्रवारी संध्याकाळी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.विदर्भातील अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली.
अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील जवळपास 9 तालुक्यांना पावसाचा फटका बसलाय.
धारणी तालुक्यात गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळं गहू, चना या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी (18 मार्च) मेळघाटात पावसासह गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे शेतीचही मोठं नुकसान झालं तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा या तालुक्यांमध्येही गारपीट झाली.
यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे. या पावसामुळे रब्बी पिकांसह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.
 
मराठवाड्यातही पाऊस
मराठवाड्यातील परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद, तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे.
त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामुळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आला.
 
पावसाचा अंदाज
येत्या पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात आयएमडीने तीव्र हवामानाचे इशारा दिला असून उद्यापासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट केलं होतं.