मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (18:01 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन: मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून विरोधक आक्रमक

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळाची स्थापना करण्याचा मुद्दा विरोधी पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला.
 
मराठवाडा आणि विदर्भाचे लोक हे भीक मागत नाहीयेत हा आमचा अधिकार आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मराठवाडा आणि विदर्भासहित कोकण विकास महामंडळाची देखील स्थापना केली जाईल.
 
राज्यपालांचे अभिभाषण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे.
 
गेल्या वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यपालांनी मांडला. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने उत्तम काम केल्याचे त्यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामांची, मदतनिधीची, आर्थिक स्थितीची माहिती दिली.
 
यावेळी राज्यापालांनी अभिभाषणात वस्तू आणि सेवा कराच्या भरपाई रकमेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, 29 हजार 290 कोटी रुपयांची GST ची भरपाई केंद्राकडून येणं बाकी आहे.
 
"महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोना काळात जम्बो हॉस्पिटल सुरू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. कोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजना राबवली," असं राज्यपाल म्हणाले.
 
महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कर्जमाफी योजनेचा 30 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचंही राज्यपाल म्हणाले.
 
राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
19 हजार 684 कोटी रुपये शेतकरी कर्ज परतफेड केली
 
आर्थिक अडचणी असतानाही शेतकऱ्यांना मदत केली
 
1500 हेक्टर क्षेत्र कांदळवनं घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरू
 
बांधकाम मजुरांसाठी 462 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं
 
मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेली जवळपास 800 एकर आरेची जमीन राखीव केली आहे
 
शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून 2100 कोटी रुपये दिले
 
अतिजोखमीच्या नागरिकांचे विशेष संरक्षण करण्यात आले
 
राज्याचा आरोग्य नकाशा तयार करण्यात आला
 
नागरिकांच्या सहभागाने कोरोना साथरोगावर नियंत्रण मिळवलं
 
कोरोनाबाबत आपण सतत दक्ष राहण्याची आवश्यकता आहे
 
नंदुरबार इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलं आहे
 
उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी
 
राज्यात आजच्या घडीला 500 प्रयोगशाळा कार्यरत आहेत
 
कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली
 
कोरोनामुळे राज्याच्या महसुलात 35 टक्के घट झाली
 
महसुलात घट होऊनही निधी कमी पडू दिला नाही