रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (17:21 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन: अजित पवार म्हणतात आधी 12 आमदारांचा प्रश्न मार्गी लावा मग.

विधान परिषदेतलील बारा आमदारांच्या घोषणेचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा मगच आम्ही मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबतची घोषणा करूत.
 
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, "कॅबिनेटने एक निर्णय घेतलेला आहे. 12 नावं विधानपरिषदेची राज्यपाल महोदयांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. ऐकून घ्या, तुमचं ऐकलं, माझं ऐकून घ्या. अधिवेशन दहा दिवसांचं झालं पाहिजे असं सुधीर मुनगंटीवारजी म्हणाले. दसनंबरी झालं पाहिजे असंही म्हणाले.
 
"आणखी कुठलाही आकडा घ्या. ज्यादिवशी बारा नावं जाहीर होतील त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळ जाहीर घोषित केलं जाईल", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
 
अजित पवारांच्या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. 12 आमदारांकरता विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवलं आहे.
 
किती राजकारण? विदर्भ-मराठवाड्याचं कवच नसतं तर कसं लुटून नेलंय ते आम्ही सभागृहात वारंवार मांडलं आहे. वैधानिक विकास महामंडळं आमच्याकडे होती म्हणून तुम्हाला बजेट पुन्हा मांडावं लागलं होतं. बजेटमध्ये विदर्भ-मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. ते 12 करतील तर आम्ही हे करू असं कसं? राज्यपाल आणि तुमचा विषय आहे. सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय देणंघेणं आहे?
 
"राज्यपाल हे कुठल्या पक्षाचे आहेत का? त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. आज तुम्ही जे बोलला आहात, दादा तुम्हाला विनंती आहे की असं बोलू नका. विदर्भ-मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. बारा आमदारांकरता तुम्ही मराठवाडा-विदर्भच्या जनतेला ओलीस ठेवणार का?
 
तुम्ही दिलं नाही तर संघर्ष करून मिळवू. ही भीक नाहीये. आम्ही भिकारी नाहीयोत. आमचं हे हक्काचं आहे, जे तुम्ही नेलं आहे. तेच मागत आहोत. ते घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही वैधानिक विकासमंडळ करू किंवा करू नका. जे संविधानाने दिलेलं आहे, ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. दादांनी म्हटलेलं आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो", असं फडणवीस म्हणाले.