शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (18:18 IST)

चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास असा आहे

हर्षल आकुडे
बीबीसी मराठी
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
 
या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर विरोधी बाकावरील भारतीय जनता पक्ष अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
 
या संपूर्ण प्रकरणात भाजपचा किल्ला लढवण्याची जबाबदारी एका महिला नेत्याकडे देण्यात आली आहे. या नेत्याचं नाव आहे चित्रा वाघ.
 
चित्रा वाघ यासुद्धा पक्षाकडून मिळालेली जबाबदारी अतिशय आक्रमकपणे सांभाळताना दिसत आहेत.
 
संजय राठोड यांच्यावर पहिल्यांदाच थेट आरोप
8-9 फेब्रुवारीदरम्यान पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर एकामागून एक खुलासे करण्यात येत होते.
 
त्यानंतर संजय राठोड यांचं नाव दबक्या आवाजात घेतलं जाऊ लागलं होतं. माध्यमांमध्ये नेहमी भाजपची भूमिका मांडणाऱ्या अतुल भातखळकर यांनीही याबाबत सावधगिरी बाळगत याविषयी 'राठोडगिरी' असं संबोधत शब्दांची कोटी केली होती.
 
पण चित्रा वाघ यांनीच सर्वप्रथम वनमंत्री संजय राठोड यांचं नाव स्पष्ट स्वरुपात घेतलं. इतकंच नव्हे तर संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली होती.
 
तेव्हापासून ते आजपर्यंत पूजा चव्हाण प्रकरणात भाजपची बाजू मांडण्याची, विविध प्रकारच्या मागण्या करण्याची सगळी जबाबदारी चित्रा वाघ यांनीच घेतली आहे.
 
याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (25 फेब्रुवारी) चित्रा वाघ यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्पूर्वी, त्यांनी घटनास्थळी जाऊन परिसराचा आढावाही घेतला.
 
पूजा चव्हाणचे नातेवाईक दबावाखाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्यू मोटो अंतर्गत स्वतःच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
 
यानंतर गेले दोन दिवस चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले काही फोटो व्हायरल करण्यात येत आहेत.
 
दरम्यान, त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
 
या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबद्दल जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.
 
या प्रकरणामुळे भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून चित्रा वाघ यांची ओळख तयार झाली आहे. त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे, हे पाहणंही या निमित्त्ताने महत्त्वाचं ठरतं.
 
'आम्ही साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते'
चित्रा वाघ या सध्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 2019 मध्ये जुलै महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष होत्या.
 
"20 वर्षं मी पक्षात ( राष्ट्रवादी काँग्रेस) होते. शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करत होते. साहेब असो की दादा सर्वांनी मला प्रेम दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही माझ्यावर मनापासून प्रेम केलं," असं चित्रा वाघ राष्ट्रवादीबद्दल म्हणाल्या होत्या.
 
गेल्या वर्षभरापासून माझ्यासोबत घडणाऱ्या घटनांची कल्पना मी शरद पवार आणि अजित पवार यांना दिली होती. गेला वर्षभर माझं पक्षात द्वंद्व सुरू होतं. पण त्यात काहीच सुधारणा होत नसल्याने पक्षाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं चित्रा वाघ यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
 
शिवाय, आम्ही साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पक्ष सोडला असला तरी शरद पवार यांच्यावरील नितांत प्रेम आणि श्रद्धा कायम असेल, असंही चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
 
शनिवारी (27 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांची खूप आठवण येत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
 
"मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. 2017 मध्ये जेव्हा माझ्या पतीवर पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी एफआयआरची कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावच नाहीये."
 
यावरून चित्रा वाघ यांच्या मनातील शरद पवार यांच्या स्थानाची कल्पना येऊ शकते.
 
पतीची चौकशी टाळण्यासाठी पक्षांतराचा आरोप
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे मुंबईतील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात चार लाख रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी लावण्यात आली होती.
पतीची ही चौकशी टाळण्यासाठीच चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असा आरोप त्यावेळी करण्यात येत होता.
 
पण याबाबत चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. पती किशोर वाघ हे निर्दोष असून केवळ संबंधित रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांचं नाव या प्रकरणात आलं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.
 
आपण 2016 पासून 2019 पर्यंत विविध प्रकारच्या आंदोलनात सक्रिय होतो. जर चौकशीला घाबरून घरात बसायचं असतं तर तेव्हाच बसले असते. त्यावेळीच भाजपमध्ये प्रवेश केला असता. पण आपली भाजपमध्ये प्रवेश करण्याची कारणं वेगळी आहेत. शरद पवार यांना त्याविषयी कल्पना आहे, असं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी त्यावर दिलं आहे.
 
दरम्यान, किशोर वाघ यांच्याकडच्या 90 टक्के संपत्तीचा हिशोब नसल्याचं सांगत याच प्रकरणात त्यांच्याविरुद्ध 12 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आजपर्यंतचा राजकीय प्रवास
चित्रा वाघ या 20 वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश कॉंग्रेसमध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बरीच वर्षं काम केलं आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना चित्रा वाघ या महिला आयोगाच्या सदस्य होत्या.
 
सुरुवातला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत यायला सुरुवात झाली.
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या आक्रमक आंदोलनांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीला चित्रा वाघ यांनी एक आक्रमक चेहरा दिला. टीव्हीवरील वेगवेगळ्या चर्चांमध्ये त्या कायम महिलांच्या मुद्द्या आक्रमकपणे बाजू मांडतना दिसून आल्या.
 
2019 पर्यंत चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.