शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (22:42 IST)

मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? पंकजा मुंडेचा सवाल

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले. या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? त्या १२ आमदारांपैकी किती मराठवाड्यामधील आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीचं वक्तव्यं केलेलं आहे. मला असं वाटतं की मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ नियुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. मराठवाड्याचा अनुशेष पाच वर्षे भरण्याचा आपण प्रयत्न करतोय, तरी पुढील १५ वर्षे लागतील मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी, ज्या पद्धतीची आर्थिक गरज मराठवाड्याची आहे, जशी मराठवाड्याची भौगोलिक रचना आहे. आणि त्याचा या १२ आमदारांशी संबंध लावणं, मला खरच कळत नाही की ही राजकीय लोकं कोणत्या बुद्धीने काम करत आहेत.”