1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:08 IST)

कोरोना लशींबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

कोव्हिड 19ची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी भारतासह जगातल्या अनेक देशांत लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे.
या लशीविषयीची माहिती, वेळोवेळी होणारे वाद यामुळे कदाचित तुमचा गोंधळ उडू शकतो. म्हणूनच या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामदतीने एखादी लस नेमकी कशी काम करते हे समजून घेता येईल. 
 
लस म्हणजे काय?
एखादा आजार किंवा विषाणू संसर्गासाठी कसं लढायचं हे लस तुमच्या शरीराला शिकवते.
एखाद्या रोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा कमकुवत किंवा निष्क्रीय अंश वापरून लस तयार केली जाते.
यामुळे रोग प्रतिकार शक्तीला शरीरात शिरकाव केलेल्या विषाणूला ओळखता येतं आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंड निर्माण केली जातात.
फार थोड्या लोकांवर लशीचे नकारात्मक वा दुष्परिणाम होतात, तर काही लोकांमध्ये लशीचे साईड इफेक्ट्स पहायला मिळतात. लस घेतल्यानंतर अनेकांना थोडा ताप वा कणकण येते.
लस टोचून घेतल्याच्या काही कालावधीनंतर त्या रोगाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात विकसित होऊ लागते.
औषधं रोगावर उपचार करतात. पण लस एखादा रोग होण्यालाच प्रतिबंध करत असल्याने लस जास्त प्रभावी असते, असं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)ने म्हटलंय.
लस सुरक्षित असते का?
चीनमधल्या संशोधकांनी 10व्या शतकामध्ये प्राथमिक टप्प्यातल्या लशीचा शोध लावला.
पण 1796मध्ये देवीच्या साथीदरम्यान एडवर्ड जेनर यांनी मोठा शोध लावला. देवीच्या सौम्य स्वरूपातील संसर्गाचा एक डोस आहे देवीची गंभीर लागण होण्यापासून संरक्षण देत असल्याचं त्यांना आढळलं.
याविषयी त्यांनी संशोधन केलं, स्वतःचे सिद्धांत पडताळून पाहिले. आणि दोन वर्षांनी त्यांनी काढलेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले.
व्हॅक्सिन (Vaccine) या शब्दाचा जन्म त्याचवेळी झाला. गाय असा अर्थ असणाऱ्या लॅटिन भाषेतल्या Vacca या शब्दाशी याचा संबंध आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक महत्त्वाचा शोध म्हणून व्हॅक्सिनकडे पाहिलं जातं. लशीमुळे दरवर्षी साधारण 20 ते 30 लाख लोकांचा जीव वाचतो असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.
बाजारात आणण्यापूर्वी या लशीची सखोल तपासणी केली जात असल्याचं सीडीसीने म्हटलं. आधी प्रयोगशाळेत आणि मग जनावरांवर याची चाचणी घेतली जाते. त्यानंतर लशीची ह्यूमन ट्रायल म्हणजे मानवी चाचणी होते.
बहुतेक देशांमध्ये स्थानिक औषध नियामकांनी परवानगी दिल्यानंतर लोकांना लस द्यायला सुरुवात केली जाते.
इतर औषधांप्रमाणचे लसीकणातही काही जोखीम असते. पण याचे फायदे पाहता हे धोके खूप छोटे असतात.
उदाहरणार्थ, एका पिढीला त्यांच्या बालपणात सर्रास आढळणारे आजार त्यावरची लस आल्याने झपाट्याने लुप्त झाले आहेत. जगभरात लाखोंचा जीव घेणाऱ्या देवीच्या आजाराचं जगातून आता निर्मूलन झालंय.
पण हे यश मिळण्यासाठी अनेक दशकांचा काळ लागतो. लसीकरण सुरू झाल्याच्या तब्बल 30 वर्षांनंतर अफ्रिकेला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं. पण हा कालावधी खूप मोठा आहे.
कोव्हिड 19साठी जगभरात पुरेसं लसीकरण करण्यासाठी काही महिने वा काही वर्षांचा काळ लागेल आणि त्यानंतरच आयुष्य पूर्वपदावर येऊ शकेल असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
 
लस कशी तयार करतात?
जेव्हा एखादा जिवाणू, विषाणू, परजीवी किंवा बुरशी यासारखा नवीन रोगजनक - पॅथोजेन शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला शरीराचा एक उप-भाग म्हणजेच अँटीजेन म्हटलं जातं. आणि त्याच्याशी लढण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करायला लागतं.
लशीमध्ये रोग निर्माण करणाऱ्या एखाद्या जिवाणूचे काही कमकुवत किंवा निष्क्रिय अंश असतात.
शरीरातल्या इम्यून सिस्टीम - म्हणजेच रोग प्रतिकारक शक्तीला हल्ला करणाऱ्या विषाणूला ओळखण्यासाठी ही लस मदत करते. आणि बाहेरून होणाऱ्या या हल्ल्याला रोखण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करतं. आणि शरीरामध्ये त्या आजाराच्या विरोधातली रोग प्रतिकारशक्ती तयार होते.
आता नवीन पद्धतींचा वापरही लस विकसित करण्यासाठी केला जातोय. कोरोनावरच्या काही लशीही अशाच नवीन पद्धतींनी तयार करण्यात आल्या आहेत.
 
कोव्हिड 19 लशींची तुलना
फायझर - बायोएनटेक आणि मॉडर्नाची कोव्हिडवरची लस या दोन्ही 'मेसेंजर RNA व्हॅक्सिन' आहेत. या तयार करण्यासाठी व्हायरसच्या जेनेटिक कोडमधला एक भाग वापरला जातो.
अँटीजेनच्या कमकुवत वा निष्क्रीय भागाचा वापर करण्याऐवजी ही लस कोव्हिड 19 ज्या व्हायरसमुळे होतो त्याच्या पृष्ठभागावर आढळणारं स्पाईक प्रोटीन कसं तयार करायचं ते शरीराला शिकवते.
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाची लस यापेक्षा वेगळी आहे. भारतामध्ये ती कोव्हिशील्ड नावाने उपबल्ध आहे. ही लस तयार करण्यासाठी चिंपाझींना संसर्ग होणाऱ्या एका विषाणूमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्याला कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा एक भाग जोडण्यात आला.
या तीन्ही लशींना अमेरिका आणि ब्रिटनसह जगातल्या काही देशांनी आणीबाणीच्या परिस्थितीतल्या वापरासाठी मान्यता दिली आहे.
 
आणखीन कोणत्या लशी आहेत?
चीनची औषध कंपनी सायनोव्हॅकने 'कोरोनोव्हॅक' नावाची लस तयार केली आहे. चीन, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलीपीन्समध्ये ही लस उपलब्ध आहे. पारंपरिक पद्धतीने ही लस तयार करण्यात आली असून त्यासाठी व्हायरसच्या निष्क्रिय भागाचा वापर करण्यात आलाय.
पण ही लस किती प्रभावी आहे याविषयी सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. तुर्कस्थान, इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये या लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ही लस 50.4 टक्केच प्रभावी असल्याचं शेवटच्या टप्प्यातल्या चाचण्यांनंतर संशोधकांनी म्हटलं होतं.
भारतामध्ये दोन लशी तयार करण्यात आल्या आहे. ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाची लस भारतामध्ये कोव्हिशील्ड नावाने उपलब्ध आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लशीचं उत्पादन केलंय.
दुसरी लस आहे भारत बायोटेक नावाच्या भारतीय कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सिन.
रशियाने स्पुटनिक - 5 नावाची स्वतःची लस तयार केलीय. विषाणूमध्ये काही बदल करत ही लस तयार करण्यात आलीय. अर्जेंटिनामध्येही हीच लस वापरली जातेय. अर्जेंटिनाने त्यांच्या लसीकरणासाठी या लशीचे 3 लाख डोस मागवले आहे.
आफ्रिकन युनियननेही लशीचे लाखो डोस मागवले आहेत. फायझर, अॅस्ट्राझेनका (सिरम इन्स्टिट्यूट मार्फत) आणि जॉन्सन अँड जॉन्सनला यासाठी लशीची ऑर्डर देण्यात आलीय.
 
मी लस घेतली पाहिजे का?
कोव्हिड 19साठीची लस घेणं अनिवार्य करण्यात आलेलं नाही. पण ही लस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी असा सल्ला देण्यात आलाय. आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या लोकांबद्दल अपवाद करण्यात आलाय.
या लशीमुळे फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही कोव्हिड 19पासून संरक्षण मिळणार असल्याचं सीडीसीने म्हटलंय. शिवाय ही जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठीचा हा प्रभावी मार्ग आहे.
ही जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातल्या किमान 65 ते 70 टक्के लोकांनी लस घेणं गरजेचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. याचाच अर्थ लस घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करावं लागेल.
पण ज्या वेगाने कोव्हिड 19साठीची लस तयार करण्यात आलीय, त्याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे.
एखादी लस तयार करण्यासाठी एरवी संशोधकांना अनेक वर्षांचा कालावधी लागत असला तर कोरोनाच्या साथीवर तोडगा काढण्यासाठी या संशोधनाचा वेग वाढवण्यात आलाय. यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभरातले संशोधक, कंपन्या आणि आरोग्य संघटनांसोबत मिळून काम करत आहे.
थोडक्यात सांगायचं, तर अब्जावधी लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच कोव्हिड 19चं संक्रमण थांबेल आणि जगातली हर्ड इम्युनिटी वाढेल. याच मार्गाने जगातलं आयुष्य पूर्वपदावर येऊ शकणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.